अतिवृष्टीमुळे बाधित शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे सदोष करा ः थोरात जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाच्या अधिकार्‍यांची आढावा बैठक

नायक वृत्तसेवा, नगर
जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून लसीकरणाचा वेग वाढवावा. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे सदोष करण्यात यावेत, अशा शब्दांत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी (ता.17) जिल्हा प्रशासनाला सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या सर्व विभागाच्या अधिकार्‍यांची आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, मनपा आयुक्त शंकर गोरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता जे.डी.कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, उपजिल्हाधिकारी डॉ.अजित थोरबोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनील पोखरणा, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर, जिल्हा कृषी अधीक्षक शिवाजी जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, जिल्हा नियोजन अधिकारी नीलेश भदाने, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वीरेंद्र बडदे, आमदार लहू कानडे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना महसूल मंत्री थोरात म्हणाले, जिल्ह्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशावेळी गणपती विसर्जनाला कोठेही गर्दी होणार नाही. यासाठी प्रशासनाने नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. प्रत्येक तालुक्यात नियमितपणे कोविड चाचणी होत आहेत अशावेळी आरोग्य प्रशासनाने दिवसाला जास्तीत जास्त कोरोना चाचणी करण्याचे उद्दिष्ट ठेवावे. कोरोना सोबत चिकनगुणिया, डेंग्यू यांसारखे साथीचे आजार वाढत आहेत. यावर आरोग्य प्रशासनाने सतर्क राहून शहरांमध्ये आरोग्य फवारणी करावी, अशा सूचनाही थोरात यांनी आरोग्य प्रशासनाला दिली.

याचबरोबर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे बाजरी, सोयाबीन, कांदा आदी पिकांचे तसेच फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. हजारांच्या संख्येने पशुधन पुरात वाहून गेले आहे. जिल्ह्यातील 23 हजार 928 हेक्टर क्षेत्रावर या अतिवृष्टीचा परिणाम झालेला आहे. तेव्हा स्थानिक स्तरावरील महसूल प्रशासनांच्या लोकांनी शेतकर्‍यांच्या पिकांचे पंचनामे त्वरीत करावेत. ई-पीक पाहणीच्या कामाला गती देणे आवश्यक आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी बंद असलेला वाळू लिलाव तत्काळ सुरू करणे आवश्यक आहे. सर्वांनी महसूल सप्तपदीचे पालन करावे, अशा प्रशासनाला सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले म्हणाले, आजपर्यंत अहमदनगर जिल्ह्यात 23 लाख नागरिकांचे कोरोना लसीकरण झालेले आहे. 1594 गावांपैकी 894 गावे कोरोना मुक्त झाले आहेत. ‘ई-पीक पाहणी’ अ‍ॅपवर जिल्ह्यातील 2 लाख हेक्टरवरील पिकांची नोंद झालेली आहे. बैठकीपूर्वी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीच्या बांधकामांची पाहणी केली. या इमारतीचे लवकरात लवकर व गुणवत्तापूर्ण काम करण्याच्या बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना सूचना दिल्या.

Visits: 95 Today: 1 Total: 1109940

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *