उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेला संगमनेरात खिंडार! जुने सैनिक शिंदे गटाच्या वाटेवर; आगामी निवडणुकांमध्ये चुरस वाढणार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिवसेनेत उभी फूट पडून वर्षाचा कालावधी लोटला आहे, मात्र आजही ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटाकडे जाणारे रस्ते वाहतेच असल्याचे दिसून येत आहे. असाच प्रकार आता संगमनेरातूनही समोर आला असून ‘काहींच्या’ अंतर्गत राजकारणाला वैतागून संगमनेरात शिवसेनेची पाळेमुळे रुजविणार्या काही जुन्या शिवसैनिकांनी शिंदे गटाची वाट धरली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत एकसंघ वाटणार्या स्थानिक शिवसेनेला संगमनेरात मोठे खिंडार पडणार असून त्याचा परिपाक आगामी कालावधीत होणार्या स्थानिक स्वराज्य संस्थांसह अन्य निवडणुकांमध्येही बघायला मिळणार आहे. शिंदे गटात जाणार्या शिवसैनिकांच्या पक्षप्रवेशाची तारीख अद्याप निश्चित नसली तरीही प्राथमिक चर्चेसाठी आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठकही होत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

गेल्या वर्षी २० जून रोजी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या कोट्यातून नगरविकास मंत्री असलेल्या एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत काम करणे म्हणजे सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची प्रतारणा असल्याचे सांगत पक्षातील चाळीस आमदारांना सोबत घेत राज्यात राजकीय भूकंप घडवला होता. त्यानंतरच्या वर्षभरात निवडणूक आयोगाने शिवसेना नावासह पक्षाचे चिन्हही शिंदे गटाला सुपूर्द केले. त्यासोबतच अनेक आजी-माजी खासदार, आमदार, नगरसेवक आणि शिवसैनिकांनी टप्प्याटप्प्याने शिंदे गटात प्रवेश केला. मात्र गेल्या वर्षभराच्या कालावधीत अनेकदा चर्चेच्या वावड्या उठूनही संगमनेरातील मूळ शिवसेना वरकरणी एकसंघच असल्याचे दिसत होते. अर्थात प्रत्येक जिल्ह्यात आपले कार्यकर्ते आणि गटाचे नाव असावे या हेतूने मध्यंतरी शिंदे गटाकडून तालुका व शहरातील काहींना पदांची खैरातही वाटण्यात आली, मात्र त्यांचा मतदारांवर प्रभाव पडत नसल्याने जुन्या शिवसैनिकांना गळाला लावण्यासाठी विविध प्रयत्न सुरु होते. त्याला अखेर आता यश मिळत असल्याचे दिसू लागले आहे.

स्थानिक शिवसेनेकडे कटाक्ष टाकल्यास दीड दशकापर्यंत संगमनेरातील प्रमुख विरोधी पक्ष म्हणून शिवसेनेकडे पाहिले जाते. दोन हजार सालच्या दशकात तर पालिकेत शिवसेना आणि भाजपा युतीचे अर्धाडझन नगरसेवक निवडून येत असतं. सुरुवातीच्या कालावधीत राजेंद्र जोर्वेकर, जयवंत पवार, आप्पा केसेकर, रावसाहेब गुंजाळ, कैलास वाकचौरे यांच्यासारख्या कितीतरी निष्ठावान शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करुन संगमनेर तालुक्यात शिवसेनेची पाळेमुळे रुजविली. मात्र गेल्या दहा-पंधरा वर्षात त्यांच्यासह अनेक शिवसैनिकांचा अन्य पक्षातून आलेल्या नवशिवसैनिकांशीच संघर्ष सुरु झाला आणि त्यातून काही महत्त्वकांक्षी नवशिवसैनिकांनी संगमनेरात शिवसेनेची पाळेमुळे रुजविणार्या निष्ठावान शिवसैनिकांचे प्रतिमा हनन सुरु केले. त्यातून वरिष्ठ पातळीपर्यंत तक्रारीही झाल्या, मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही.

त्यामुळे मागील दशकभरापासून स्थानिक शिवसेनेतील जुन्या घटकाला निष्क्रियता धारण करुन आपणच वाढवलेल्या पक्षाची अधोगती पाहण्याशिवाय गत्यंतर उरला नव्हता. मात्र असे असतानाही गेल्या वर्षभरात त्यांच्याकडून शिंदे गटाची कास धरण्याचा प्रयत्न झाल्याचे ऐकीवात नाही. असे असतानाही त्यांच्या नावाचा शिमगा करण्याची संधी मात्र सोडली गेली नाही. त्यामुळे जनमतावर थेट प्रभाव असलेला शिवसेनेतील हा मोठा गट एकाकी झाल्याने स्थानिक शिवसेनेचे मोठे नुकसान झाले. आता स्थानिक स्वराज्य संस्थांसह लोकसभा आणि त्यांनतर विधानसभेच्या निवडणुकांचे वातावरण निर्माण होवू लागले आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाकडून गेल्या अनेक वर्षांपासून नाराज असलेल्या अशा शिवसैनिकांसाठी रेड कार्पेट अंथरण्यास सुरुवात झाली असून त्याची पहिली झलक दैनिक नायकच्या हाती लागली आहे.

मागील काही दिवसांपासून अशा शिवसैनिकांना एकत्रित करण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे यांनी मोठी पराकाष्ठा केली असून त्याचे फळ आता समोर येत आहे. त्यातूनच काही जुन्या शिवसैनिकांनी एकमताने शिवसेनेच्या (शिंदे गट) शहर प्रमुखपदासाठी नावाची निश्चितीही केली असून उर्वरीत पदाधिकार्यांची नावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच्या चर्चेनंतर निश्चित केली जाणार आहेत. याबाबतच्या प्राथमिक बोलणीसाठी खासदार लोखंडे यांच्यासह जुन्या शिवसैनिकांचा एक गट मुंबईच्या दिशेने रवाना झाला असून आज होणार्या बैठकीतून चित्र स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आगामी कालावधीत आत्तापर्यंत पडद्यामागे असणारे जुने शिवसैनिक आता राजकीय मंचावर अवतरणार असून त्याचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांसह अन्य निवडणुकांमध्ये बघायला मिळेल.

आप्पा केसेकर यांची भूमिका अस्पष्ट!
दैनिक नायकला प्राप्त झालेल्या माहितीनुसार संगमनेरातील बहुतेक जुने शिवसैनिक शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. मात्र माजी शहरप्रमुख आप्पा केसेकर यांच्याबाबत निश्चित माहिती प्राप्त झालेली नाही. आत्तापर्यंत झालेल्या बैठकांमध्येही त्यांचा सहभाग नसल्याने त्यांची भूमिकाही उघड झालेली नाही. मात्र केसेकर यांना पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची ऑफर देवून त्यांनाही गळाला लावण्यासाठी खलबते सुरु असून त्याला ते कसा प्रतिसाद देतात यावर बरेच काही अवलंबून असणार आहे. केसेकर यांना मानणारा मोठा वर्ग शहरासह तालुक्यात आहे, त्यामुळे त्यांना पक्षात सहभागी करुन घेण्यासाठी खासदार सदाशिव लोखंडे आग्रही असल्याचीही माहिती मिळाली आहे.

