कोतूळमध्ये एकाच रात्री सात ठिकाणी घरफोड्या 58 हजारांचा ऐवज लुटला; अद्याप काही ऐवज समजण्याचा बाकी

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील कोतूळ येथे शनिवारी (ता.2) एकाच रात्री सात ठिकाणी घरफोड्या झाल्याची घटना घडली आहे. याबाबत अकोले पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, कोतूळ येथील मुळा व्हॅली या इंग्रजी माध्यमाच्या शाळेच्या प्राचार्या तिलोत्तमा कर्डिले यांच्या शनिवारी पहाटे 2 ते 4 वाजेच्या सुमारास राहत्या घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असे 58 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लांबवला आहे. मात्र, सातपैकी एकानेच तक्रार दिल्याने नेमका किती ऐवज गेला याचा अंदाज आला नाही. तिलोतमा कर्डिले यांचे पती विलास दत्तात्रय भोत (वय 42) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अकोले पोलिसांनी गुरनं.386/2021 भादंवि कलम 457, 380 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

याचबरोबर श्री दत्त मंदिर, ग्रामीण रुग्णालय व सौभाग्य मंगल कार्यालय परिसरातही चोरी घडली आहे. प्राचार्य तिलोत्तमा कर्डिले यांचे 20 हजार रुपयांचे कानातील झुमके, 12 हजार रुपयांचे पेंडल, 12 हजार रुपयांची हाताच्या बोटातील अंगठी, 1 हजार रुपयांची मुरणी, 6 हजार रुपयांचे कानातले सोन्याचे दागिने व 7 हजार रुपये रोख असा एकूण 58 हजार रुपयांचा ऐवज लांबविला आहे. याच रात्री चोरट्यांनी ग्रामीण रुग्णालयाच्या समोर राहत असणार्या शिक्षिका भारती शंकर काळे यांच्या राहत्या घरातील 25 हजार रुपये लांबविले. त्यांच्या शेजारी राहणार्या ऋषीकेश विलास बोराडे यांच्या घरात शिरून सामानाची उचकापाचक केली. तसेच जवळच राहणारे श्री.गोडे यांच्या घरातही त्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र हे घर तीन वर्षांपासून बंद असल्यामुळे त्यांना काहीच हाताला लागले नाही.

महावितरण कार्यालयासमोरील श्री. शिंदे यांच्या घरात चोरट्यांनी प्रवेश करुन सामानाची उचकापाचक केली. ते बाहेरगावी असल्याने येथील चोरीचा अंदाज आलेला नाही. चोरी करताना शेजारी राहणारे महावितरणचे कर्मचारी सचिन पाटील यांच्या घराला बाहेरुन चोरट्यांनी कडी लावली होती. जाताना पाटील यांचे बाहेर असणारे बूट चोरून नेले. ज्या-ज्या ठिकाणी चोरीचा प्रयत्न केला त्या-त्या ठिकाणी शेजारी राहणार्या घरांना बाहेरून कड्या लावून आपल्या चोरीचा डाव चोरट्यांनी साधला. एकाच रात्री या परिसरात सात ते आठ ठिकाणी घरे फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र एकानेच फिर्याद दिली. यामुळे चोरी गेलेल्या ऐवजाचा अंदाज लागू शकला नाही. घटनेची माहिती मिळताच ग सरपंच भास्कर लोहकरे, उपसरपंच संजय देशमुख, पोलीस पाटील सतीश देशमुख, ग्रामविकास अधिकारी सुभाष जाधव, ग्रामपंचायत सदस्य हेमंत देशमुख व राजेंद्र देशमुख यांनी पोलीस अधिकार्यांसमवेत घटनेची पाहणी केली.
