जे निरंतर आहे तेच सत्यस्वरुप आहे ः उपाध्ये महाराज पुरुषोत्तम मासानिमित्ताने भंडारी कार्यालयात भागवत कथेचे आयोजन


नायक वृत्तसेवा, संगमनेर
श्रीमद्भागवत कथेचे श्रवण करण्यापूर्वी त्याचे महात्म्य जाणून घेण्याची आवश्यकता आहे. त्याशिवाय या कथेचा रस घेतला जावू शकत नाही. आपण बाजारातून एखादी वस्तू खरेदी करण्यापूर्वी त्याची इत्यंभूत माहिती मिळवतो, त्यातून आपल्याला त्या वस्तूविषयी आकर्षण निर्माण होते आणि त्यानंतरच आपण ती खरेदी करण्यासाठी उत्सुक होतो. भगवान श्रीकृष्णांचे चरित्र जाणून घेण्यासाठीही आपल्याला आधी भगवंताकडे आकर्षित व्हावे लागेल, त्याशिवाय आपण भगवंताच्या भक्तिरसात चिंब होवू शकत नाही, असे प्रतिपादन भागवताचार्य गोपाल महाराज उपाध्ये यांनी केले.

पुरुषोत्तम मासाचे निमित्त साधून संगमनेरातील पुरुषोत्तम जोशी महाराज यांनी उपाध्ये महाराज यांच्या भागवत कथेचे आयोजन केले आहे, याप्रसंगी शुभारंभाच्या दिवशी ते बोलत होते. तत्पूर्वी सकाळी जगदीश मंदिरापासून भागवत ग्रंथाची शोभायात्रा काढण्यात आली होती. जगदीश मंदिरापासून भंडारी मंगल कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या शोभायात्रेचे भाविकांनी जागोजागी फुलांची उधळण करीत स्वागत केले. बुधवार १६ ऑगस्टपर्यंत दररोज दुपारी ३ ते सायंकाळी साडेसहा यावेळेत होत असलेल्या या कथा महोत्सवाच्या पहिल्या दिवशी भाविकांची मोठी उपस्थिती होती.

कथेच्या पहिल्या दिवसाचे पुष्प गुंफतांना उपाध्ये महाराज पुढे म्हणाले की, भगवान श्रीकृष्णाचे वय सव्वाशे वर्ष असतानाही ते नित्य निरंतर सोळा वर्षाच्या तेजस्वी तरुणाप्रमाणे दिसतं, याचाच अर्थ भगवंत चिरतरुण होते. जे निरंतर असते तेच सत्य असते. जो प्रकाशमान आहे, सर्वज्ञ आहे तोच परमात्मा आहे. त्याला जाणून घेण्यासाठी अशा कथांचे श्रवण आवश्यक असल्याचे सांगताना त्यांनी भक्तिमार्गाचेही विवेचन केले.


संगमनेरातील नावाजलेले आचारी पुरुषोत्तम महाराज जोशी यांनी या कथेचे आयोजन केले आहे. भागवताचार्य गोपाल महाराज उपाध्ये हे राष्ट्रसंत, श्रीराम जन्मभूमी न्यासाचे खजिनदार पूज्य गोविंददेव गिरीजी महाराज यांचे शिष्य असून संगमनेरात त्यांची पहिल्यांदाच कथा होत आहे. गुरुवार १० ते बुधवार १६ ऑगस्टपर्यंत चालणार्‍या या ज्ञानयज्ञाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Visits: 95 Today: 1 Total: 1100438

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *