सॅनिटरी पॅडवरुन शोधले महिलेचे मारेकरी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची कौतुकास्पद कामगिरी

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील कातळापूर शिवारात एका २५ वर्षीय महिलेचा मृतदेह मिळून आला होता. या अनोळखी महिलेचा खून झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आल्याने या महिलेची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले. मृतदेहाजवळ पोलिसांना पर्समध्ये सापडलेले सॅनिटरी पॅड व पायातील पैंजणावरुन शोध सुरू केला. महिलेच्या पर्समध्ये सापडलेल्या सॅनिटरी पॅडवर फॉर यूज ओन्ली जिल्हा परिषद अहमदनगर असे लिहिलेले आढळून आल्याने पोलिसांनी त्यावरून तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

या प्रकरणात पोलिसांनी मृतदेह हा अकोले तालुक्यात सापडल्याने तेथील गावागावात महिलेच्या ओळखीसाठी एक संदेश तयार करुन व्हायरल केला. मात्र तरी देखील शोध लागला नाही. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक थेट जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात गेली. तेथील अधिकार्यांकडून या सॅनिटरी पॅडची माहिती घेतली. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणार्या आशासेविका, अंगणवाडी ताई अशा काही ग्रुपवर हे पोलिसांचे संदेश व महिलेचे छायाचित्र पाठविण्यात आले. त्यानंतर वांबोरी येथून एक फोन आला आणि ती महिला कल्याणी महेश जाधव असल्याचे निश्चित झाले आणि पुढील तपासाला दिशा मिळत गेली.

कल्याणीचे लग्न जिल्ह्यातील राहुरीतील वांबोरी येथे राहणार्या महेश जाधवशी झाले होते. मात्र महेश आपल्या पत्नीवर संशय घेत असे. त्यातूनच त्याने आपला भाचा मयूर अशोक साळवे (रा. राहुरी) याला बरोबर घेऊन पत्नी कल्याणीला भंडारदरा परिसरात फिरायला घेऊन गेला आणि कातळापूर परिसरात निर्जनस्थळी तिचा गळा आवळून खून करुन मृतदेह तिथेच टाकून पसार झाला होता. मात्र एका सॅनिटरी पॅडमुळे या खुनाला वाचा फुटली असून पोलिसांनी महेश आणि त्याचा भाचा अशोक साळवेला अटक केली आहे. त्यांनी देखील गुन्हा कबूल केल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांमधून कौतुक होत आहे.
