दिलासादायक; अहमदनगर जिल्ह्याची कोविड रुग्णसंख्या पुन्हा घटली! संगमनेरलाही मिळाला मोठा दिलासा; सलग दुसर्‍या आठवड्यात जिल्हा प्रथम स्तरात

नायक वृत्तसेवा, नगर
अहमदनगर जिल्ह्यात या आठवड्यातील (ता.4 ते 10 जून) बाधित रुग्णदर हा 2.63 टक्के आणि ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता आणि प्रत्यक्ष ऑक्सिजनची आवश्यकता असलेल्या रुग्णांच्या संख्येचा दर हा 12.77 टक्के इतका असल्याने जिल्ह्याचा स्तर एकमध्येच समावेश करण्यात आला आहे. याबाबत जिल्हा प्रशासनाने 6 जून, 2021 रोजी पारित केलेले आदेशच लागू राहतील, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. आज (शनिवार ता.12) जिल्ह्यात 672 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर संगमनेरलाही मोठा दिलासा मिळाला असून, 47 रुग्ण आढळले आहेत. अद्यापही संकट टळलेले नसून, कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्या-त्या भागासाठी आस्थापना बंदच्या वेळांसंदर्भात घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी, असे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हावासियांनी नियमांचे पालन केल्यास आपण जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव नक्की संपुष्टात आणू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

कोरोना उपाययोजनांबाबत आज जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी संदीप निचित, नोडल अधिकारी उपजिल्हाधिकारी डॉ.अजित थोरबोले, जयश्री आव्हाड, रोहिणी नर्‍हे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुनील पोखरणा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदीप सांगळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ.वीरेंद्र बडदे हे जिल्हा मुख्यालय तर तालुका स्तरावरील महसूल, पोलीस, ग्रामविकास, आरोग्य आणि नगरविकास विभागाचे अधिकारी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

राज्य शासनाने 4 ते 10 जून दरम्यानचा रुग्णबाधित दर आणि ऑक्सिजन बेड्स उपलब्धता यावर जिल्ह्यांचे स्तर ठरविले आहेत. त्यात अहमदनगर जिल्हा प्रथम स्तरमध्ये असल्याने आपल्याकडे यापूर्वीच 6 जून रोजी जारी केलेले आदेश कायम राहतील. नव्याने कोणतेही आदेश जारी करण्यात आलेले नाहीत, असे जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांनी स्पष्ट केले. मात्र, निर्बंध शिथिल झाल्याने जिल्ह्यात काही नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात तसेच ग्रामीणभागातही गर्दी वाढल्याचे चित्र दिसत आहे. तसेच विनामास्क फिरतानाही काही नागरिक दिसत आहेत. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव वाढू नये यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी तेथील व्यापारी, उद्योजक आस्थापनांच्या प्रमुखांशी चर्चा करुन त्या-त्या शहरांसाठी दुकाने सुरु आणि बंद करण्याच्या वेळा निश्चित केल्या आहेत. त्याप्रमाणे त्यांनी कार्यवाही करावी. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जावी, असे त्यांनी स्पष्ट केले.

कमी चाचण्या होणार्‍या नगरपालिका अथवा ग्रामीण रुग्णालयांनाही चाचण्या वाढविण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. सार्वजनिक ठिकाणी कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन होत आहे किंवा नाही, हे पाहण्यासाठी यंत्रणांनी पथके नेमून कारवाई करावी. ज्याठिकाणी अशा नियमांचे उल्लंघन होत असलेले दिसेल, तेथे तात्काळ कारवाई करावी. कुठल्याही परिस्थितीत कोरोना प्रादुर्भाव पुन्हा वाढणार नाही, याची दक्षता सर्वांनी घेण्याची गरज आहे. त्यामुळे संबंधित आस्थापनांच्या चालकांनीही त्यांच्या दुकानात येणारे ग्राहक अथवा दुकानात काम करणारे कामगार कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करीत असल्याबाबत खात्री करावी असेही जिल्हाधिकार्‍यांनी सूचित केले आहे.

आज 672 नवे रुग्ण आढळले..
जिल्ह्याची रुग्णसंख्या दिवसेंदिवस घटत असल्याचे दिसून येत आहे. आज जिल्हा प्रयोगशाळा, खासगी प्रयोगशाळा आणि रॅपिड अँटीजेन तपासणीतून 672 रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये कर्जत 77, पारनेर 71, पाथर्डी 54, राहुरी व श्रीगोंदा 53, राहाता 48, संगमनेर 47, कोपरगाव 45, नेवासा 44, शेवगाव 41, अकोले व जामखेड 31, श्रीरामपूर 23, नगर ग्रामीण 20, महापालिका क्षेत्र 18, इतर जिल्हा 16 असा समावेश आहे. यामुळे जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या 2 लाख 71 हजार 871 तर संगमनेरची 22 हजार 426 झाली आहे.

Visits: 199 Today: 4 Total: 1100035

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *