पढेगाव परिसरातील विहिरीमध्ये विवाहितेचा मृतदेह आढळला माहेरच्यांकडून सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप; पोलिसांचा सर्व बाजूंनी तपास सुरू

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
तालुक्यातील पढेगाव परिसरात एका विहिरीमध्ये विवाहितेचा मृतदेह आढळल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काही महिन्यांपूर्वीच या तरुणीचे लग्न झालं होतं. एकीकडे तरुणीने आत्महत्या केल्याचं सांगितलं जात असताना, तिच्या माहेरच्यांनी मात्र सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणी पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत.

पुजा सागर मापारी (वय 24) या तरुणीचा मृतदेह गुरुवारी (ता.3) सकाळी कोपरगाव तालुक्यातील पढेगाव परिसरात असलेल्या विहिरीत आढळला. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मयत पुजा हिचे लग्न सहा महिन्यांपूर्वीच झाले होते. पण अचानक तिच्या मृत्यूमुळे संशयाचं वाचावरण निर्माण झालं आहे. पुजाने आत्महत्या केली असल्याच्या चर्चांनाही उधाण आलेलं आहे, मात्र तिच्या माहेरच्यांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. उलट त्यांनी या प्रकरणी पुजाच्या सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच या प्रकरणात कोणतंही पत्र, चिठ्ठी देखील आढळलेली माहिती अद्याप नाही.

सहा महिन्यांपूर्वी पुजा हिचा विवाह झाला होता. पण तिच्या सासरच्या लोकांनी वारंवार पैशाची मागणी केल्याचा आरोप पुजाच्या माहेरच्या मंडळींनी केला आहे. पैशांची मागणी करत तिच्यावर अनेकदा मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याची तक्रारही तिच्या माहेरच्या लोकांनी केली आहे. त्यामुळे आमच्या मुलीने आत्महत्या केली नसून तिचा घातपात केल्याचा आरोप सासरच्या लोकांवर त्यांनी केला आहे.

या प्रकरणी आरोपींना लवकरात लवकर कडक शिक्षा व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी या सर्व घटनेची माहिती घेतली असून, मृत्यू नेमका कसा झाला, आत्महत्या आहे की घातपात याचा तपास घेण्यास सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास कोपरगाव ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलत जाधव हे करत आहे.

Visits: 171 Today: 1 Total: 1966235

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *