महेश पतसंस्थेला दोन कोटी अकरा लाखांचा निव्वळ नफा! सीए. कैलास सोमाणी; पारदर्शी कारभारातून वर्षभरात ठेवींमध्ये लक्षणीय वाढ


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील छोट्या व्यावसायिकांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करुन देणार्‍या महेश नागरी सहकारी पतसंस्थेला गेल्या आर्थिक वर्षात 2 कोटी 11 लाख रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. कोविड संक्रमणात अडचणीत आलेल्या व्यापार क्षेत्राला नवसंजीवनी देण्यासाठी संस्थेने आजपर्यंत सुमारे 75 कोटी रुपयांचे कर्ज वितरीत केले असून ही रक्कम मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत 27 टक्क्यांहून अधिक आहे. गेल्या वर्षभरात संस्थेने अतिशय पथदर्शी कारभार केल्याने संस्थेच्या ठेवींमध्येही जवळपास 36 टक्क्यांनी वाढ झाली असून ठेवींचा आकडा शंभर कोटींच्या पार गेल्याची माहिती संस्थेचे चेअरमन सीए. कैलास सोमाणी व व्हा. चेअरमन योगेश राहातेकर यांनी दिली.

संगमनेरातील पतसंस्था क्षेत्रात नावजलेल्या महेश नागरी पतसंस्थेने स्थापनेपासूनच शहरातील व्यापार-उदीमाची भरभराट व्हावी, छोट्या व्यापार्‍यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावे यासाठी कमी दरात कर्ज उपलब्ध करुन देण्याची परंपरा जोपासली आहे. त्याशिवाय संस्थेच्यावतीने ज्येष्ठ सभासदांसाठी पेन्शन ठेव योजना, सभासदांसाठी वैद्यकीय साहाय्य, सातत्याने 15 टक्के लाभांशाचे वाटप आणि योग्य आणि प्रमाणिक कर्जदारांच्या बळावर थकबाकीवर नियंत्रण या संस्थेच्या जमेच्या बाजू आहेत. संस्थेने एनपीएसाठी आवश्यक असलेल्या एकूण तरतूदीपेक्षा दुप्पट तरतूद केली आहे हे विशेष.

स्वर्गीय मोहनलालजी मणियार यांच्या दूरदृष्टीतून उभ्या राहिलेल्या आणि डॉ. शशिकांत पोफळे, अनिल अट्टल, श्रीकांत (लाला) मणियार यांच्यासारख्या ज्येष्ठ संचालकांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षभरात संस्थेच्या ठेवींमध्ये 36 टक्के वाढ झाली असून एकूण ठेवी 100 कोटी 80 लाखांच्या वर गेल्या आहेत. संस्थेने 74 कोटी 80 लाख रुपयांचे कर्ज वितरीत केले असून 175 कोटी 60 लाखांचा विक्रमी एकत्रित व्यवसाय केला आहे तर 2.65 टक्के इतकी नाममात्र थकबाकी राखण्यात संस्थेने यश मिळविले आहे. 31 मार्चअखेर संस्थेचा एकूण निधी 13 कोटी 24 लाखांवर गेला असून सर्व खर्च, घसारा, एनपीए व अन्य तरतुदी वजा करुन संस्थेने निव्वळ 2 कोटी 11 लाखांचा नफा मिळवला आहे.

सभासद, ठेवीदार व ग्राहकांचा विश्वास कायम ठेवून पुढील आर्थिक वर्षातही संस्थेची घोडदौड अशीच कायम राहील असा विश्वास संस्थेचे व्हा. चेअरमन योगेश राहातेकर, संचालक सर्वश्री अनिल अट्टल, डॉ. शशिकांत पोफळे, आनंद तापडे, योगेश जाजू, श्रीकांत मणियार, ज्योती कासट, अनिल कलंत्री, नानासाहेब शेरमाळे, संतोष चांडक, सरला आसावा, नीलेश बाहेती, दिनेश सोमाणी, विशाल नावंदर, मोरेश्वर कोथमिरे, सुदर्शन लाहोटी, राजेश लड्डा, जयप्रकाश भुतडा व व्यवस्थापक दिगंबर आडकी यांनी व्यक्त केला आहे.

Visits: 130 Today: 1 Total: 1098251

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *