शिवसेनेच्या संगमनेर शहरप्रमुखांना ‘तो’ आरोप भोवला! भाजपाध्यक्षांची पोलिसांत तक्रार; न्यायालयात तीस लाखांचा दावाही ठोकणार..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर येथील हिंदू स्मशानभूमीच्या (अमरधाम) विकास व सुशोभिकरणाच्या कामात 34 लाखांचा अपहार करण्याचा प्रयत्न झाल्याचा घणाघात करीत गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शहर भाजपाने आंदोलन छेडले होते. त्यातून शहर भाजपाने नगराध्यक्षांसह चार नगरसेवक व तिघा अधिकार्यांवर अपहाराचे आरोप केलेले असताना प्रत्यक्षात मात्र केवळ दोघा अधिकार्यांवरच गुन्हा दाखल झाल्याने संगमनेर शिवसेनेचे (ठाकरे गट) शहरप्रमुख अमर कतारी यांनी उर्वरीत नावे कमी करण्यासाठी भाजपाचे शहराध्यक्ष श्रीराम गणपुले यांनी 30 लाखांची लाच घेतल्याचा जाहीर आरोप केला होता. मात्र आता त्यांची ही कृती त्यांना कायदेशीर अडचणींच्या दिशेने घेवून निघाली असून त्याचा पहिला अध्याय मंगळवारी शहर पोलीस ठाण्यात लिहिण्यात आल्यानंतर आता या प्रकरणी 30 लाखांच्या अब्रु नुकसानीचा दावाही ठोकला जाणार असल्याने अमर कतारी यांचा पाय खोलात गेला आहे.
याबाबत भाजपाचे शहराध्यक्ष अॅड.श्रीराम गणपुले यांनी मंगळवारी (ता.11) शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार संगमनेर नगर परिषदेच्यावतीने सुरु असलेल्या अमरधाममधील विविध विकास व सुशोभिकरणाच्या कामात झालेल्या कथीत अपहाराबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे. अब्रु नुकसानीच्या प्रकरणातील फिर्यादी हे भाजपाचे शहराध्यक्ष तर आरोपी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहरप्रमुख आहेत. या प्रकरणातील फिर्यादी श्रीराम गणपुले यांनी यापूर्वीही आरोपी अमर कतारी यांच्या विरोधात न्यायालयात विविध गुन्हे दाखल केलेले आहेत.
या सर्वांचा राग मनात धरुन अमर कतारी यांनी 19 सप्टेंबर रोजी पत्रकार परिषद घेवून कथीत अमरधाम अपहार प्रकरणात दाखल तक्रारीतून नगरसेवकांची नावे वगळण्यासाठी त्या सर्वांकडून 30 लाख रुपयांची लाच घेतल्याचे जाहीर वक्तव्य करुन हेतू ठेवून आपली समाजात बदनामी केल्याचा आरोप गणपुले यांनी या तक्रारीतून केला आहे. त्यावरुन संगमनेर शहर पोलिसांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहरप्रमुख अमर कतारी यांच्या विरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 500 प्रमाणे अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे. या वृत्ताने संगमनेरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
गेल्या महिन्यात 19 सप्टेंबर रोजी शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी त्यांनी कथीत अमरधाम अपहार प्रकरणाबाबत थेट आरोप करताना डिसेंबर 2021 मध्ये या प्रकरणाला सुरुवात झाली तेव्हा तेव्हा भाजपाने नगराध्यक्षांसह चार नगरसेवक, तत्कालीन मुख्याधिकारी व बांधकाम विभागाचे विद्यमान नगर अभियंता व कनिष्ठ अभियंता यांच्यावर अपहाराचे आरोप केलेले असताना प्रत्यक्षात गुन्हा मात्र केवळ बांधकाम विभागातील दोघा अधिकार्यांवरच दाखल झाल्याकडे त्यांनी या पत्रकार परिषदेतून पत्रकारांचे लक्ष्य वेधण्याचा प्रयत्न केला होता.
या प्रकरणात असे आरोप करण्यासाठी भक्कम पुराव्यांची आवश्यकता असल्याबाबत पत्रकारांनी विचारणा केल्यानंतर शिवसेनेच्या शहरप्रमुखांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे संगमनेर शहराध्यक्ष दीपेश ताटकर यांच्याशी झालेल्या फोनवरील संवादाचा संदर्भ देत हाच पुरावा महत्त्वाचा असल्याचाही दावा केला होता. सदरील व्यक्ती भाजपाशी संलग्न असलेल्या संघटनेचा शहराध्यक्ष असल्याने सदरील पत्रकार परिषदेनंतर ते यापासून अलिप्त होण्याचा पवित्रा घेण्याची शक्यता व्यक्त करीत त्यांनी यापूर्वीच आपण याबाबत संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्यांकडे निवेदन सादर केल्याची माहितीही पत्रकारांना दिली होती.
या पत्रकार परिषदेनंतर घडलेही तसेच. 20 सप्टेंबर रोजी भाजयुमोचे शहराध्यक्ष दीपेश ताटकर यांनी आपण केलेल्या वक्तव्याला काहीही अर्थ नसल्याचे सांगत गैरसमजातून घडलेल्या प्रकाराचे शिवसेनेच्या शहरप्रमुखांनी राजकीय भांडवल केल्याचा उलट आरोप अमर कतारी यांच्यावरच केला. त्यामुळे 30 लाखांच्या लाचेच्या आरोपाने संगमनेरच्या अमरधाम प्रकरणात निर्माण झालेल्या गुढाचा फुगा एका क्षणात फुटला आणि भक्कम नसतानाही तोच पुरावा महत्त्वाचा मानून त्यांनी केलेला आरोप त्यांच्याच अंगलट येणार हे निश्चित झाले, याबाबत 22 सप्टेंबर रोजी दैनिक नायकने सविस्तर वृत्तही प्रसिद्ध केले होते. दैनिक नायकच्या ‘त्या’ वृत्तावर मंगळवारी एकप्रकारे शिक्कामोर्तब झाले असून भाजापाचे शहराध्यक्ष अॅड.श्रीराम गणपुले यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे शहरप्रमुख अमर कतारी यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदविल्यानंतर आता त्यांनी संगमनेरच्या न्यायालयात 30 लाख रुपयांच्या अब्रु नुकसानीचा दावा दाखल करण्याची तजबीज केली आहे. त्यामुळे कतारी यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून त्यांचा पाय आता खोलात गेला आहे. या वृत्ताने संगमनेरच्या राजकीय वर्तुळात थांबलेल्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या असून नागरीकांमध्ये अमरधाम विषय खमंगपणे चर्चीला जावू लागला आहे.
सदर प्रकरणी आपण घेतलेल्या पत्रकार परिषदेत 30 लाखांच्या लाचेबाबत माहिती देणार्या संबंधित पदाधिकार्याशी झालेले संभाषण पत्रकारांना ऐकविले होते. सदरच्या लाच प्रकरणाची माहिती देणार्या पदाधिकार्यावर भविष्यात दबाव येण्याची व त्यातून त्यांची माघार होण्याची शक्यता असल्याने आपण यापूर्वीच उपविभागीय अधिकार्यांकडे निवेदन सादर करुन त्यांना आपल्याकडील पुरावेही सादर केले होते. मात्र त्यांच्याकडून या प्रकरणातील चौकशी अद्यापही प्रलंबित आहे. ती पूर्ण झाल्यानंतरच या विषयी आपली पुढील भूमिका जाहीर करणार आहे.
– अमर कतारी
शहरप्रमुख – शिवसेना (ठाकरे गट)