‘वंचित’च्या अर्जभरणी मिरवणुकीने दोन्ही उमेदवारांना फुटला घाम! तरुणांची लक्ष्यणीय उपस्थिती; उत्कर्षा रुपवतेंची दोघांवरही खरपूस टीका..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या तीनपिढ्यांपासून काँग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहुनही न्याय मिळत नसल्याचा ठपका ठेवून ‘वंचित’मध्ये प्रवेश करणार्या उत्कर्षा रुपवते यांनी बुधवारी आपली उमेदवारी दाखल केली. यावेळी त्यांच्या समर्थकांची लक्ष्यणीय उपस्थिती आणि त्यात तरुण मतदारांचा भरणा यामुळे विरोधात असलेल्या दोन्ही उमेदवारांना घाम फुटला आहे. अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या पहिल्याच सभेत रुपवते यांनी खासदार लोखंडेंना ‘मिस्टर इंडिया’ तर माजी खासदार वाकचौरेंना ‘निवृत्त’ अशा शेलकी उपमा देत त्यांची खिल्ली उडवली. शिर्डीत कोणी तेल-तूप खाल्ले हा जिव्हाळ्याचा प्रश्न नसून शेतकरी, शिक्षण, बेरोजगारी, गरीबी आणि महागाई ही मोठी समस्या आहे. त्यासाठी आपण काय करणार आहोत हे सांगण्यासाठी मतदारांपर्यंत पोहोचा असे आवाहन करीत त्यांनी आपल्या प्रचाराची दिशाही निश्चित केली. एकंदरीत रुपवतेंना मिळत असलेला प्रतिसाद ‘नोटा’ पेक्षा ‘बरा’ असेच दर्शवणारा असून मतदारांना अपेक्षित असलेला पर्याय ‘वंचित’च्या माध्यमातून समोर आल्याने शिर्डीत चुरस वाढल्याचे चित्र दिसू लागले आहे.
जागावाटपाच्या मुद्द्यावरुन सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाल्यापासूनच चर्चेत असलेल्या शिर्डी मतदार संघात विविध नाट्यमय घडामोडीही घडल्या. सुरुवातीला अंतर्गत सर्वेक्षणातून विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्याबाबत मतदारांमध्ये नाराजी असल्याचा मुद्दा उपस्थित करीत भाजपने त्यांना विरोध केला. मात्र सरतेशेवटी अडचणीच्या काळात सोबत केलेल्यांना वार्यावर सोडणार नाही या मुख्यमंत्र्यांच्या भावनिक मुद्द्यावर लोखंडेंनी तिकीटं मिळण्याची शक्यता नसतानाही उमेदवारी पदरात पाडून घेतली. उबाठा गटाच्या भाऊसाहेब वाकचौरे यांचीही अवस्था यापेक्षा वेगळी नव्हती. गेल्या दशकभरात जिल्ह्यात असलेल्या सगळ्याच मोठ्या पक्षांना वळसा घालून ते स्वगृही परतले. मात्र त्यांचे पुनरागमन हाडाच्या शिवसैनिकांसह मतदारांनाही रुचले नसल्याचेच आत्तापर्यंत दिसून आले आहे. त्यातच एकाच पक्षाच्या दोन भागात विभागालेल्या कार्यकर्त्यांमधील वर्चस्ववाद आणि त्यातून निर्माण झालेली गटबाजीही आजी-माजी खासदारांसाठी डोकेदुखी ठरणार हे निश्चित आहे.
या सगळ्या डळमळीत स्थितीचा अंदाज घेत निवडणुका जाहीर झाल्यापासूनच शिर्डीची जागा काँग्रेसकडे घेण्याचा आग्रह उत्कर्षा रुपवते यांनी लावून धरला होता. मात्र जिल्ह्यातील काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याने त्यांच्या मागणीकडे लक्ष दिले नाही. परिणाम कधीकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला उत्तर नगरजिल्हा उबाठागटाने राखण्यात यश मिळवले आणि रुपवतेंची नाराजी त्यांना घेवून थेट राजगृहावर पोहोचली. त्यानंतरही पंधरवड्याचा कालावधी मिळूनही जिल्हा काँग्रेसच्या कोणत्याही पदाधिकार्याने आणि नेत्याने रुपवतेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे अॅड.प्रकाश आंबेडकर यांच्या पहिल्या भेटीनंतर तब्बल 15 दिवसांचा कालावधी उलटल्यानंतर त्यांनी ‘वंचित’मध्ये प्रवेश केला.
यापूर्वी दिवंगत प्रेमानंद रुपवते यांनीही 2009 मध्ये काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने शिर्डीची जागा पक्षानेच लढवावी अशी जोरदार मागणी केली होती. मात्र त्यावेळी आघाडीत असलेल्या आरपीआयसाठी शिर्डी सोडल्याने नाराज झालेल्या रुपवतेंनी अपक्ष उमेदवारी दाखल करुन निवडूक लढवली. मात्र त्या निवडणुकीत त्यांना अवघी 22 हजार मतं मिळाली. बरोबर पंधरा वर्षांनंतर रुपवतेंच्या त्या निर्णयाची पुनरावृत्ती त्यांच्या कन्येकडून झाली आहे. मात्र मागील अनुभव विचारात घेवून त्यांनी अपक्ष पेक्षा पक्षच बरा या धोरणानुसार वंचितमध्ये प्रवेश केला. प्रेमानंद रुपवतेंच्या ‘त्या’ पराभवाचा अनुभव विचारात घेता कदाचित उत्कर्षा रुपवते बंडखोरी करणार नाहीत असाच काँग्रेस नेत्यांचा समज असावा. मात्र तो त्यांनी साफ खोडून थेट वंचितमध्येच प्रवेश केल्याने शिर्डीतील आघाडीचे गणितं चुकले आहे.
भाजपने कलम 370 पासून श्रीराम मंदिरापर्यंतचे वेगवेगळे मुद्दे चर्चेत आणून निवडणुकीची दिशा ठरवण्याचा प्रयत्न केला. मात्र अद्यापपर्यंत त्यात त्यांना अपयशच आल्याने सद्यस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चेहरा पुढे करुन 18 वी लोकसभा मोदी विरुद्ध गांधी अशी होणार असल्याचे चित्र रंगवले जात आहे. त्यातच विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्या ‘गायब’ स्वभावामूळे मतदारांमधील नाराजी आजही कायम असल्याने काल-परवापर्यंत नाईलाजाने का असेना पण उबाठाच्या भाऊसाहेब वाकचौरे यांचे पारडे काहीसे जड वाटतं होते. मात्र आता अकोल्याच्या भूमीपूत्र असलेल्या उत्कर्षा रुपवते यांनी वंचितकडून शिर्डीत शड्डू ठोकल्याने आजी-माजी खासदारांवरील मतदारांच्या नाराजीला नवा पर्याय उभा राहीला आहे. त्याचा सर्वाधीक मोठा फटका उबाठाच्या उमेदवाराला बसण्याची शक्यता असून भाजपची पारंपरिक विरोधी मतं रुपवतेंकडे वळाल्यास आश्चर्य वाटायला नको. अर्थात मागणी करुनही रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवलेंना शिर्डीत उमेदवारी नाकारली गेली, त्यामुळे बौद्ध समाजातील मोठा वर्ग भाजपसह महायुतीवर नाराज आहे, त्याचा फटका शिर्डीतून वंचितच्या अपेक्षा उंचावणारा ठरु शकतो याकडेही दुर्लक्ष करुन चालणार नाही.
बुधवारी (ता.24) उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतरच्या पहिल्याच जाहीर सभेत उत्कर्षा रुपवते यांनी विद्यमान खासदार व महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा उल्लेख ‘मिस्टर इंडिया’ असा तर, माजी खासदार व आघाडीचे उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांना ‘निवृत्त’ असा शेलकी टोला लगावून आपल्याला कोणी तेल-तूप खाल्ले या भानगडीत पडायचे नाही, तर मतदारांचे प्रश्न समोर ठेवून आपण त्यावर कसे काम करणार आहोत हे लोकांना सांगण्याचा सल्ला देत आपल्या प्रचाराची दिशाही निश्चित केली आहे. त्यामुळे येणार्या कालावधीत आरोप-प्रत्यारोप आणि विकास या मुद्द्यांवरच शिर्डीची निवडणूक केंद्रीत होईल असा अंदाज असून उत्कर्षा रुपवतेंच्या माध्यमातून समोर आलेल्या पर्यायाने निवडणुकीतील चुरसही वाढल्याचे चित्र दिसू लागले आहे.
वारंवार पक्ष बदलणारा नेता अशी ओळख निर्माण झालेले माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि निवडणुकीनंतर ‘गायब’ होण्याची परंपरा अव्याहतपणे जोपासणारे विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्याबाबत मतदारांमध्ये नाराजीचा सूर आजही कायम आहे. मात्र कालपर्यंत या दोघांमधील एकाशिवाय शिर्डीला पर्याय नसल्याचे चित्र दिसत होते. मात्र आता वंचितच्या माध्यमातून उत्कर्षा रुपवते यांची उमेदवारी आणि पहिल्याच दिवशी त्यांनी खेचलेली गर्दी पाहता शिर्डीला तिसरा पर्यायही उपलब्ध झाल्याची चर्चा असून लढतीची रंगतही वाढली आहे. एकंदरीत सुरुवातीला दुरंगी वाटणारी लढत अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी तिरंगी झाल्याने त्यातून होणार्या मतविभाजनातून शिर्डीत अनपेक्षित निकाल लागल्यास आश्चर्य वाटायला नको.