संगमनेर तालुक्यात विकासकामे सुरूच राहणार ः थोरात राजापूर – घुलेवाडीसह विविध रस्त्यांची कामे होणार


नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील जनता व पक्ष नेतृत्वाच्या विश्वासामुळे राज्यभरात काम करण्याची संधी मिळाली व त्यातून निळवंडेसह अनेक मोठमोठी विकासकामे मार्गी लावली. मात्र सरकार बदलले आणि विकासकामांना शिंदे सरकारने स्थगीती दिली. विधानसभेत आवाज उठवून आपण ती स्थगिती उठवली. अडचणी आल्या त्या सोडवल्या जात असून तालुक्यातील विकासकामे यापुढेही सुरूच राहतील, असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले केले.

आमदार थोरात यांच्या पाठपुराव्यातून मंजूर झालेल्या घुलेवाडी फाटा ते गुंजाळवाडी – राजापूर ते चिकणी व राजापूर ते चिखली फाटा या रस्त्याच्या कामाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आर. एम. कातोरे, संपत डोंगरे, अजय फटांगरे, सीताराम राऊत, संतोष हासे, नवनाथ अरगडे, चंद्रकांत कडलग, विष्णूपंत रहाटख, विलास वर्पे, आर. बी. सोनवणे, भारत वर्पे, माधव हासे, बाबासाहेब गायकर, आनंद वर्पे, सरपंच निर्मला राऊत, सरपंच ज्योती कडलग, उपसरपंच प्रमोद कडलग, सी. के. मुटकुळे, डी. एम. लांडगे, सोमनाथ गोडसे, अतुल कडलग, प्रकाश कडलग आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले, राजापूर – घुलेवाडी रस्त्याची मागणी खूप दिवसांची होती ती आता पूर्ण होत आहे. संगमनेर तालुका खूप मोठा आहे. विकासकामे करताना ओढाताण होतच असते. तालुक्यातील प्रत्येक गावाला, वाडीला निधी द्यावा लागतो त्यातून कामे होत असतात. मात्र विकासकामे करताना आपण कधीही कमी पडलो नाही. सत्ता नसली तरी सर्वांच्या सहकार्याने कामे मार्गी लावत असतो. मात्र दृष्ट लागावी यासाठी एखादा लागतोच. त्याचेच काही खबरी त्रास देत आहे. साधे गाईच्या गोठ्यात मुरूम टाकायचा तरी हे खबरी ट्रॅक्टर पकडून देतात, कनोलीच्या तलाठ्याला मंत्री स्वत: फोन करतात की वाळू वाहतूक करून देवू नका, गौण खनिजाचा वापर सामान्य लोकांच्या विकासकामासाठीच होतो. मात्र त्याच्यावरही बंदी हे कसले राजकारण अशा राजकारणाचा आपल्या तालुक्यात काहीही उपयोग नाही. हा होणारा त्रास गणेशच्या निवडणुकीमुळे थोड्याफार प्रमाणात कमी झाला आहे. निळंवडे धरण व कालव्यांची कामे आपण अनेक अडचणीवर मात करून पूर्ण केली, पिचडांनी मदत केली. मात्र ज्याचे योगदान नाही त्यांनी पाटाचे पाणी बंद केले. जनतेचा आनंद त्यांना बघवला नाही. रस्त्याची कामे गुणवत्तापूर्ण झाली पाहिजे. यासाठी तुम्ही गावकर्‍यांनी लक्ष दिले पाहिजे. प्रास्ताविक प्रकाश कडलग यांनी केले. यावेळी परिसरातील नागरिक व विविध संस्थाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Visits: 12 Today: 1 Total: 114675

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *