तरुणीला संगमनेरात बोलावून अधेडाकडून विनयभंग! चुकून ‘मेसेज’ गेला; बसस्थानक चौकातच पीडितेसह जमावाने चोपला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
नोकरीनिमित्त नाशिकमध्ये राहणार्या एका २३ वर्षीय विवाहितेकडून मैत्रिणीला पाठवायचा ‘मेसेज’ चुकून लोणीच्या एका अधेडाच्या मोबाईलवर गेला. त्यावर म्हातारं चळावलं आणि थेट व्हिडिओ कॉलच करुन टाकला. त्यातून चूक लक्षात येताच ‘त्या’ महिलेने ‘काका चुकून..’ म्हणतं माफीही मागितली. पण बावचाळलेल्या म्हातार्याला काही चैन पडेना, त्यातून ओळख आणि नोकरीची निकड लक्षात घेवून बोलबच्चन करीत त्याने तिला संगमनेरात बोलावलं. अन् चक्क बसस्थानकाच्या गजबजलेल्या प्रवेशद्वारातच ‘तू मला खूप आवडतेस, मला तुझा किस घ्यायचाय..’ वगैरे म्हणतं थेट तिचे फोटोच काढले. या प्रकाराने संतापलेल्या त्या तरुणीने क्षणात रुद्रावतार धारण केला आणि त्याच्या हातातील मोबाईल हिसकावत त्याच्या ठिकर्या उडवल्या. त्याचवेळी पायताण हातात घेत यथेच्छ चोपायलाही सुरुवात केली. हा प्रकार प्रचंड वर्दळीच्या चौकात घडल्याने बघ्यांची आणि पन्नाशीतील त्या म्हातार्यावर पडणार्या हातांची संख्याही वाढली. या दरम्यान पीडितेने ११२ क्रमांक डायल केल्याने काही मिनिटांत शहर पोलीस हजर झाले आणि त्यांनी लोणीच्या किरण किसन आहेर या बावचळलेल्या अधेडाला ताब्यात घेत पोलीस ठाणे गाठले.

घडले असे की, नाशिकमध्ये राहणारी एक २३ वर्षीय विवाहिता तेथील एका खासगी रुग्णालयात नोकरी करते. खासगी कंपनीत सेवेत असलेले पती आणि एक मुलगी अशा सुखाच्या संसारात रमलेल्या या विवाहितेने साधारणतः २० दिवसांपूर्वी आपल्या मैत्रिणीला ‘हाय’ असा मेसेज पाठवला. मात्र चुकून तो वेगळ्याच नंबरवर गेला आणि काही वेळातच त्या क्रमांकावरुन थेट ‘व्हिडिओ कॉल’च आला. त्यावर दिसणारे ‘काका’ पाहून झालेली चूकही तरुणीच्या लक्षात आली, आणि तिने ‘काका, मैत्रिणीऐवजी नजर चुकीने तुम्हाला मेसेज पाठवला गेला, सॉरी!’ असे म्हणतं त्या तरुणीने दिलगिरीही व्यक्त केली. एकंदरीत झाला प्रकार गैरसमजातून झाल्याचे स्पष्ट असल्याने या विषयावर पडदा पडायला हवा होता, मात्र तसे काही घडले नाही.

या प्रकाराच्या दुसर्याच दिवसापासून ५२ वर्षीय किरण किसन आहेर या अधेडाने ‘त्या’ तरुणीला गुड मॉर्निंगपासून गुडनाईटपर्यंत वेगवेगळे संदेश पाठवण्यास सुरुवात केली. त्यावर त्या तरुणीने संदेशाद्वारेच आपण कोण आहात, कोठे असता व काय करता असे प्रश्न उपस्थित केले. त्यावर त्याने आपण लोणीत राहणारे असून आपले नाव किरण किसन आहेर पाटील असल्याचे शिर्डीत आपल्या शाळा व महाविद्यालये असल्याची फुशारकी मारली. त्यावर चांगल्या नोकरीच्या शोधात असलेल्या त्या विवाहित तरुणीने ‘तुमच्या महाविद्यालयात मला नोकरी मिळेल का?’ असा भाबडा प्रश्न केला. त्यानेही; हो, मिळेन ना! तसे, संगमनेरातही माझे अनेक मित्र आहेत, त्यांच्याकडेही तुला जॉब मिळू शकेल अशी आमिषाची शाब्दिक बतावणी करीत तिला जाळ्यात ओढले.

त्याचा गैरफायदा घेत त्याने गेल्या मंगळवारी (ता.२५) त्या विवाहित तरुणीला संदेश पाठवून ‘उद्या संगमनेरला बायोडाटा, आधारकार्ड आणि फोटो घेवून ये’ असा निरोप पाठवला. त्यावर होकार मिळताच ‘त्या’ अधेडाने ‘प्लॅनिंग’ सुरु केले. बुधवारी (ता.२६) दुपारी बाराच्या सुमारास त्याने तिला फोन करीत ‘निघालीस का?’ म्हणून विचारणाही केली. त्यानंतर काही वेळाने त्याने पुन्हा संदेश पाठवून ‘तू संगमनेरातील डॉ.***’ यांना भेट, तुझे कागदपत्रे मला व्हाट्सअॅपवर पाठवं’ असा निरोप धाडला. त्यानंतर काही वेळाने एका दंतचिकित्सकाचे नाव घेत त्याला भेटण्याचा संदेश पाठवला. दुपारी चारच्या सुमारास थेट फोन करुन मुलगी खरंच संगमनेरात आलीय का याची खात्री केली आणि लागलीच ‘दहा/पंधरा मिनिटांत मीच येतो, तुला हॉस्पिटल दाखवतो’ असा टर्न घेत त्याने पुढची योजना कार्यान्वित केली.

ठरल्याप्रमाणे सदरील विवाहित तरुणी संगमनेर बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावरील चहाच्या दुकानाबाहेर उभी राहिली आणि त्याची वाट पाहू लागली. काही वेळातच चारचाकीत तेथे आलेल्या किरण आहेर या अधेडाने तिला गाडीत बसण्यास सांगितले. मात्र तसे करण्यास त्या विवाहितेने स्पष्ट नकार दिल्याने तो चारचाकीतून खाली उतरला. यावेळी तो थेट त्या विवाहितेच्या शेजारी जावून उभा राहिला आणि ‘तू मला खूप आवडतेस, मला तुझा किस घ्यायचा आहे. तू माझ्यासोबत हॉटेलवर चल, तू इतकी छान दिसतेस की तुला काम करण्याची गरज नाही..’ असे म्हणतं असतानाच त्याने त्याच्या मोबाईलमध्ये तिच्यासह फोटोही काढण्यास सुरुवात केली. हा प्रकार पाहून आपली चूक लक्षात आलेल्या त्या विवाहितेने क्षणाचाही विलंब न लावता त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेत जमीनीवर आपटला आणि क्षणात त्याच्या ठिकर्या उडवल्या.

भलतीच अपेक्षा घेवून आलेल्या ‘त्या’ अधेडाला काही समजण्याच्या आतच दुर्गेचा अवतार घेतलेल्या त्या तरुणीने हातात पायताण घेत त्याचे तोंड झोडायला सुरुवात केली. या दरम्यान त्याचे संपूर्ण दूष्कृत्यही ती ओरडून सांगत असल्याने तेथे जमलेल्या जमावातील काहींनी त्याचा ताबा घेत त्याला लोळवायला सुरुवात केली. या दरम्यान त्या विवाहितेला काहीशी उसंत मिळताच तिने आपल्या मोबाईलवरुन ११२ क्रमांकावर फोन करीत मदत मागितली. त्यावरुन काही वेळातच शहर पोलिसांचे वाहन तेथे पोहोचले आणि त्यांनी किरण किसन आहेर (वय ५२, रा.लोणी, ता.राहाता) याला ताब्यात घेत त्या महिलेला तक्रार देण्यासाठी पाचारण केले. नाशिकमध्ये राहणार्या त्या विवाहितेच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी आरोपी विरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम ३५४ (अ), (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेतून महिलेने प्रसंगी रुद्रावतार धारण केल्यास समाज आपोआप पाठिशी उभा राहत असल्याचे दाखवून दिले.

या घटनेत लोणीचा लिंगपिसाट किरण किसन आहेर याने संगमनेरातील एका हाडांच्या डॉटरचे व एका दंतचिकित्सकाचे नावे घेतले आहे. त्यांच्या नावाचे संदेशच त्याने पीडित विवाहितेला पाठवले आहेत. सध्या आरोपी शहर पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी सुरु आहे. त्यातून त्याचे संगमनेरातील या दोन्ही डॉटरांशी खरोखरी संबंध आहेत की त्याने त्या विवाहितेला फसवण्यासाठी त्यांच्या नावाचा वापर केला यावर प्रकाश पडणार आहे.

