पठारभागातील रस्त्यांची पावसामुळे झाली चाळण दररोज ये-जा करताना नागरिकांना होतोय मनःस्ताप


नायक वृत्तेसवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असणार्‍या रस्त्यांची पावसामुळे अक्षरशः चाळण झाली आहे. यामुळे नागरिकांसह शेतकर्‍यांना दररोज ये-जा करताना मनःस्ताप सहन करावा लागत आहे. त्यासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन रस्त्यांची कामे मार्गी लावावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

सद्यस्थितीत घारगाव, बोरबन, कोठे बुद्रुक, वनकुटे ते पिंपळदरी या रस्त्यांची गेल्या अनेक वर्षांपासून अतिशय दयनीय अवस्था झालेली असून खड्ड्यांमुळे अक्षरशः चाळण झालेली आहे. घारगाव ते अकलापूर, बोटा ते कुरकुटवाडी यांसह वाड्या-वस्त्यांवरील रस्त्यांची पावसामुळे वाट लागली आहे. परिणामी वाहनचालकांसह नागरिकांना रस्त्यावरून ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे.

गेल्या वर्षीही या परिसरात प्रचंड पाऊस झाल्याने हीच अवस्था झाली होती. आता देखील पावसाळ्यात असाच अनुभव येत असल्याने नागरिक वैतागले आहेत. संबंधित विभागाकडून केवळ तात्पुरती मलमपट्टी होत असल्याने परिस्थिती जैसे थे होत आहे. परंतु, आता मलमपट्टी न करता रस्त्यांचे डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

याभागाचे लोकप्रतिनिधी आमदार डॉ. किरण लहामटे यांच्याकडे या रस्त्यासंदर्भात अनेकवेळा मागणी केली आहे, मात्र रस्त्याचे काम होत नाही. सध्या आमदार पक्ष बदलण्यात व्यस्त आहे. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नाही. यापूर्वी माजी आमदार वैभव पिचड यांना निवडून दिले होते, पण पुन्हा ते पठारभागाकडे फिरकलेच नाही म्हणून मतदारांनी डॉ. किरण लहामटे यांना निवडून दिले आहे. मात्र ते देखील दुर्लक्ष करत आहे.
– शांताराम वाकळे (माजी संचालक-कृषी उत्पन्न बाजार समिती संगमनेर)


घारगाव ते पिंपळदरी हा डांबरी रस्ता दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यातच पिंपळदरी येथे येडूआईचे मोठे देवस्थान आहे. त्यामुळे राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविकांना दर्शनासाठी याच रस्त्याने पिंपळदरीला जावे लागते. रस्त्याच्या दुरावस्थेमुळे भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सरकार म्हणतेय की, शासन आपल्या दारी. मग या रस्त्यांकडे का दुर्लक्ष केले जात आहे.
– ज्ञानदेव गडगे (माजी सरपंच-बोरबन)

Visits: 12 Today: 1 Total: 79408

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *