अहमदनगरमधील गुन्हेगारीचा मुद्दा थेट विधीमंडळाच्या अधिवेशनात आमदार थोरातांच्या मागणीवर गृहमंत्री फडणवीसांकडून कारवाईचे आश्वासन
नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी अंकुश चत्तर यांच्यावर सत्ताधारी भाजपसंबंधित असलेल्या काही जणांनी जीवघेणा हल्ला केला. यात गंभीर जखमी झालेल्या चत्तर यांचा मृत्यू झाला. अलिकडील काळात जिल्ह्यात टोळ्यांची मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. हा मुद्दा मंगळवारी (ता.18) अधिवेशनात गाजला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नगरमधील गुन्हेगारीवर वचक बसवण्याची आणि गुन्हेगारांवर कडक कारवाईची मागणी विधीमंडळात केली.
काँग्रेस विधीमंडळ पक्षनेते थोरात म्हणाले, नगरमध्ये अलिकडच्या काळात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंकुश चत्तर या पदाधिकार्याची हत्या करण्यात आली. हे हत्याकांड सत्ताधारी भाजपसंबंधित असलेल्या दहा जणांनी केली. नगरमध्ये खासदार, आमदार सत्ताधारी पक्षाचेच आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना सत्ताधार्यांचा आधार मिळतो की काय अशी भावना लोकांची झालेली आहे. परिणामी अहमदनगर जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुन्हेगाराला जात नसते, धर्म नसतो आणि पक्ष सुद्धा नसतो, हे सत्ताधार्यांच्या तोंडून एकायचे आहे. चत्तर यांच्या हत्याकांडातील सर्व गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी. राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करावेत.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केलेला अहमदनगरमधील गुन्हेगारीचा मुद्दा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजून घेतला. यानंतर त्यांनी थोरात यांना आश्वस्त केले, की गुन्हेगाराची जात, धर्म आणि पक्ष न पाळता त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल. तसे निवेदनही आज सादर करणार आहे. चत्तर यांच्या हत्येनंतर नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी पोलिसांवर नाराजी व्यक्त केली. त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांचे त्यांच्या अखत्यारीतील पोलीस ठाण्यांवर नियंत्रणाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शहरात वारंवार होणारे हल्ले, हाणामार्या, चैन स्नॅचिंग, लूटमार अशा घटना घडतात. याला शहरातील अवैध धंदे कारणीभूत आहेत. कामात कुचराई करणार्या अधिकार्यांवर कारवाईचे आदेश देण्याची सूचना करणार असल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले होते.