साकूर सराफा दरोड्यातील दोघांच्या मुसक्या आवळल्या! संयुक्त तपास पथकांची कामगिरी; 52 लाखांचे दागिने केले होते लंपास..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
सोमवारी भरदुपारी दीडच्या सुमारास पठारावरील साकूरमध्ये घडलेल्या दरोड्यातील दोघांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांच्या संयुक्त तपास पथकांना यश आले आहे. या घटनेनंतर दरोडेखोरांच्या मागावर गेलेल्या घारगाव पोलिसांना पारनेर पोलिसांची साथ मिळाली होती. त्यामुळे या दोन्ही पथकांनी वासुंदे (ता.पारनेर) पर्यंत त्यांचा पाठलाग केला. मात्र ऐनवेळी दरोडेखोरांनी दुचाक्या सोडून दरीत उड्या घेतल्या. मात्र पोलिसांनी रात्रभर संपूर्ण परिसर पिंजून काढीत आज पहाटेच्या सुमारास सुरुवातीला एकाला आणि नंतर दुसर्याला ताब्यात घेतले आहे. या घटनेत साकूरमधील कान्हा ज्वेलर्समधून बंदुकीच्या धाकावर तब्बल अर्धाकिलो सोन्याचे दागिने लांबवण्यात आले होते.
सोमवारी (ता.11) दुपारी दीडच्या सुमारास सदरचा धक्कादायक प्रकार घडला होता. साकूर बसस्थानकाच्या परिसरात संकेत सुभाष लोळगे यांचे कान्हा ज्वेलर्स नावाचे सराफा दुकान आहे. घटनेच्यावेळी ते एका ग्राहकाशी बोलत असताना अचानक तोंडाला स्कार्प गुंडाळलेले पाचजण त्यांच्या दुकानात शिरले आणि त्यांनी दोघांनाही बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील अर्धाकिलो वजनाचे सोन्याचे दागिने चोरुन नेले. हा प्रकार सुरु असताना दुकानाच्या बाह्य बाजूस असलेल्या काहींना त्याची कुणकुण लागल्याने दुकानाबाहेर गर्दी जमा होवू लागली. त्यामुळे दरोडेखोरांनी अगदी दोन-अडीच मिनिटांतच आपला कार्यभाग उरकला.
मात्र दुकानातून बाहेर पडल्यानंतर आसपास मोठी गर्दी दिसू लागल्याने घाबरलेल्या दरोडेखोरांनी दोनवेळा बंदुक दाखवताना त्यातून हवेत गोळाबार करीत विनाक्रमांकाच्या दोन दुचाकीवरुन तेथून पोबारा केला. हा प्रकार सुरु असतानाच याबाबत घारगाव पोलिसांनाही कळवण्यात आल्याने पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांनी आपल्या सहकार्यांसह लागलीच साकूरकडे धाव घेतली. मात्र पोलीस येईस्तोवर दरोडेखोर पसार झाले होते.त्यामुळे साकूरमध्ये येताच घारगाव पोलिसांनी दरोडेखोर पळालेल्या पारनेरच्या दिशेने पाठलाग सुरु केला. या दरम्यान या घटनेची माहिती पोलीस मुख्यालयासह पारनेर पोलिसांनाही देण्यात आल्याने आणि गावोगावी त्याची चर्चा झाल्याने रस्त्यात अनेक ठिकाणी सुसाट वेगाने पळून जाणार्या दरोडेखोरांना ग्रामस्थानी अडवण्याचा प्रयत्न केला.
अखेर घारगाव पोलीस आणि पारनेर पोलिसांच्या संयुक्त पथकाने वासुंदेपर्यंत त्यांचा पाठलाग केला. रस्ताच संपल्याने दरोडेखोरांनी आपल्या दोन्ही दुचाकी सोडून देत डोंगरातून पळ काढला. त्यातच रात्र झाल्याने तपास पथकासमोर अडचणी निर्माण झाल्या. या दरम्यान पोलीस अधिक्षक राकेश ओला, गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी साकूरला भेट देत स्थानिक गुन्हे शाखेकडून समांतर तपास सुरु केला. घारगाव, पारनेर आणि गुन्हे शाखेच्या पथकांनी दरोडेखोरांनी दुचाकी सोडल्या तेथून डोंगररांगात तपास सुरु केला. त्यांना स्थानिक गावकर्यांनीही साथ दिली आणि अखेर रानात दडून बसला एकजण भल्या सकाळी पोलीस आणि ग्रामस्थांच्या हाती लागला, तर त्यांनतर काही वेळातच दुसराही सापडला.
सध्या या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून उर्वरीत तिघांसह चोरुन नेलेला मुद्देमाल शोधण्याचे काम सुरु आहे. संपूर्ण तालुक्यात खळबळ उडवून देणार्या या घटनेनंतर अवघ्या 18 तासांतच पोलिसांनी पाच दरोडेखोरांमधील दोघांना ताब्यात घेण्यात यश मिळवल्याने परिसरातून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.