दोघे सराईत कसाई वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार! संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्‍यांची कारवाई; दोघांवर दोन डझन गुन्हे


नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू असतानाही बेकायदा गोवंशाची वाहतूक करणे, त्यांची हत्या करुन मांस विक्री व वाहतूक करणे अशा प्रकारच्या कृत्यात वारंवार सहभागी झालेल्या शहरातील दोघा कसायांना वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. याबाबत संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षक कार्यालयाकडून उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकार्‍यांना प्रस्ताव सादर करण्यात आला होता. आता तो मंजूर करण्यात आला असून भारतनगरमध्ये राहणार्‍या नवाज कुरेशी व अब्दुल वाहिद कुरेशी या दोघांना वर्षभरासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.

राज्यात 2015 साली गोवंश हत्याबंदी कायदा लागू करण्यात आला. त्यापूर्वीपासून संगमनेर शहरातील भारतनगर, जमजम कॉलनी, कोल्हेवाडी रोड, मदिनानगर, मोगलपुरा अशा विविध भागात बेकायदा गोवंश जनावरांची हत्या करुन त्याचे मांस विकण्याचा धंदा तेजीत होता. राज्यात गोवंशाच्या हत्येला व मांस विक्रीला बंधने आल्यानंतरही संगमनेरातील हा उद्योग कधीही थांबला नाही. त्यामुळे संगमनेर शहर पोलिसांनी या भागात वारंवार छापे घालून आजवर हजारो किलो गोवंशाच्या मांसासह आजपर्यंत शेकडो जिवंत जनावरांचीही सुटका केली. अशाप्रकारच्या कारवायांमध्ये पोलिसांनी दोनशेहून अधिक गुन्हे दाखल करताना अनेकांना या प्रकरणांमध्ये आरोपी केले. मात्र याउपरांतही हा उद्योग थांबला नाही.

गेल्या वर्षी गांधी जयंतीच्या दिनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर त्यांनी श्रीरामपूरचे पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांना कारवाई करण्यास संगमनेरात धाडले होते. त्यांनीही अहमदनगर पोलिसांच्या मदतीने थेट भारतनगरमध्ये छापा घालीत राज्यात गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाल्यानंतरची सर्वात मोठी कारवाई करताना तब्बल 32 हजार किलो गोवंशाच्या मांसासह 72 जिवंत जनावरे असा एकूण एक कोटी पाच लाख रुपयांचा मुद्देमालही हस्तगत केला होता. या प्रकरणात पहिल्यांदाच पोलिसांनी कसायांचे पंटर वगळून थेट मुख्य कसायांवरच गुन्हे दाखल केल्याने व त्यानंतर प्रशासनाने शहरातील अनधिकृत गोवंश कत्तलखाने जमीनदोस्त केल्याने हा उद्योग बंद होईल असाच अनेकांचा कयास होता.

मात्र इतक्या मोठ्या कारवाईनंतरही संगमनेरात लपूनछपून गोवंश हत्येचे प्रकार सुरुच राहिले. त्यामुळे पोलिसांनी आता अधिक आक्रमक होत येथील कसायांचे कंबरडे मोडण्याचा चंग बांधला आहे. त्यानुसार संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांनी नवाज जावेद कुरेशी व अब्दुल वाहिद अब्दुल करीम कुरेशी (दोघेही रा. भारतनगर) या दोघांवर कठोर कारवाई करण्याच्या हेतूने त्यांच्या हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागाीय अधिकारी तथा दंडाधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे यांना पाठविला होता. त्याला त्यांनी मंजुरी दिली असून वरील दोघाही कसायांना आता वर्षभरासाठी अहमदनगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. यातील अब्दुल वाहिद अब्दुल करीम कुरेशी याच्यावर गोवंश हत्याबंदी कायद्यान्वये शहर पोलीस ठाण्यात एकूण 13 गुन्हेग दाखल आहेत. त्यात 2016 मध्ये एक, 2017 मध्ये सात, 2018 मध्ये तीन व 2020 मध्ये दोन गुन्हे तर नवाज जावेद कुरेशी याच्यावर 2016 मधील एक, 2017 मधील दोन, 2018 मधील एक, 2019 मधील दोन व 2021 मधील दोन गुन्ह्यांसह एकूण नऊ गुन्हे दाखल आहेत. या कारवाईने संगमनेरच्या कसायांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

Visits: 27 Today: 2 Total: 116301

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *