साडेबारा वर्षाच्या चिमुरडीवर नराधमाचा अत्याचार! बाळेश्वराच्या पायथ्याशी घडला प्रकार; आरोपी मात्र पसार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अधिक श्रावणमासात निर्माण झालेल्या धार्मिक वातावरणामुळे तालुक्यातील विविध शिवालयांमध्ये भाविकांची गर्दी वाढत असतांना संगमनेर-अकोले तालुक्यातील हजारों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बाळेश्वराच्या टेकडीवरुन मात्र अत्यंत संतापजनक वृत्त समोर आले आहे. या प्रकरणात दुचाकीवरुन घरी सोडण्याचा बहाणा करुन एका वासनांध नराधमाने अवघ्या साडेबारा वर्ष वयाच्या चिमुरडीला पवित्र बाळेश्वर मंदिराच्या परिसरातील झाडाझुडपांमध्ये नेवून दिवसभर तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेनंतर चार दिवसांनी पीडित मुलीच्या वडिलांनी तालुका पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिसांनी पंकज शरद दुबे या नराधमाविरोधात अपहरण व बलात्कारासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्यातील (पोक्सो) कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. या घटनेपासून नराधम दुबे पसार झाला असून पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.

याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार गेल्या शुक्रवारी (ता.14) सकाळी 11 ते सायंकाळी 5 या कालावधीत पेमगिरी ते शिरसगाव धुपे मार्गावरील बाळेश्वराच्या टेकडीवरील जंगलात घडला. त्यानुसार पेमगिरी येथे राहणारा नराधम आरोपी पंकज शरद दुबे याने एका साडेबारा वर्ष वयाच्या मुलीस आपल्या दुचाकीवरुन घरी नेवून सोडण्याचा बहाणा केला. मात्र त्याच्या मनात आधीपासूनच वासना दाटून आलेली असल्याने त्याने तिला आडमार्गाने हजारों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बाळेश्वर मंदिराच्या टेकडीवरील झाडाझुडपात नेले.

यावेळी त्या लहानशा मुलीने त्याला वारंवार विचारणा आणि विरोधही केला. मात्र निर्जन परिसर असल्याने हिंमत वाढलेल्या ‘त्या’ पिसाटाने त्याकडे दुर्लक्ष करीत तिला बळजोरीने आडोशाला नेवून दिवसभर तिच्यावर शारीरिक अत्याचार केले. आपल्या मनातील वासनेचा सैतान शांत झाल्यानंतर सायंकाळी त्याने पीडित मुलीला तिच्या घरी नेवून सोडले व तो पसार झाला. या घटनेने घाबरलेली मुलगी घरी गेल्यानंतर कोणाशीही बोलली नाही. मात्र झाल्या प्रकाराने तिला प्रचंड त्रास होवू लागल्याने अखेर तिने घटनेच्या चौथ्या दिवशी घडला प्रकार आपल्या पालकांना सांगितला.

ते सगळं ऐकून मानसिक धक्का बसलेल्या पीडितेच्या पालकांनी त्यातून सावरत यावेळी दुर्लक्ष केले केले तर आरोपीचे मनोबल वाढेल या विचाराने तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी (ता.18) पीडितेसह तिच्या वडिलांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात येवून प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक शिरीष वमणे यांना घडला प्रकार सांगितला. त्यावरुन त्यांनी तत्काळ गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यावरुन तालुका पोलिसांनी आरोपी पंकज शरद दुबे (रा.पेमगिरी) याच्या विरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 376 (3), 363, 366 (अ) सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्या कायद्याचे कलम 4 व 6 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. या प्रकरणाचा तपास उपअधीक्षक वमणे यांनी आपल्याकडे घेतला आहे.

सध्या पुरुषोत्तम (अधिक) मास सुरु असल्याने तालुक्यातील विविध शिवालयांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे. संगमनेर तालुक्यातील बाळेश्वर, रामेश्वर, खांडेश्वर, निझर्णेश्वर, दुधेश्वर, कणकेश्वर अशा वेगवेगळ्या ठिकाणी भाविकांचा राबता वाढल्याचे दिसत असतांना संगमनेर व अकोले तालुक्यातील हजारों भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या बाळेश्वर मंदिराच्या परिसरातून सदरचा प्रकार समोर आल्याने भाविकांचा संताप झाला असून पोलिसांनी आरोपीच्या लवकरात लवकर मुसक्या आवळण्याची मागणी होत आहे.

