संगमनेरच्या पत्रकारांसाठी प्राणवायूच्या सुविधेची दोन बेड आरक्षित! राज्यातील पहिलाच प्रयोग ठरणार पत्रकार संघटनांसाठी पथदर्शी
नायक वृत्तसेवा, संगमनेर
शासन आणि समस्या यामधला दुवा असलेला पत्रकार समाजाच्या जागृतीसाठी अविरतपणे परिश्रम घेत असतो. गेल्या साडेपाच महिन्यातील कोविड काळात समाजाला घरातच थांबण्यासाठी जागृत करण्याचे मोठे काम याच घटकाने केले आहे. त्यामुळे पत्रकारही कोविड योद्धाच असल्याने समाजाने त्यांचीही काळजी घेणं क्रमप्राप्त ठरते. दुर्दैवाने गेल्या काही कालावधीत राज्यातील काही पत्रकारांना उपचार मिळण्यात अडचणी निर्माण झाल्या, अशी वेळ संगमनेरच्या पत्रकारांवर येवू नये यासाठी सामाजिक दायित्त्वाच्या भावनेतून तांबे हॉस्पिटलच्यावतीने संगमनेरच्या पत्रकारांसाठी कोविड असेपर्यंत प्राणवायूची सुविधा असलेले दोन बेड उपलब्ध करुन देत असल्याची घोषणा तांबे हॉस्पिटलचे व्यवस्थापक डॉ.अंकुश केशरवाणी यांनी केली.
संगमनेर तालुक्यातील वाढत्या कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरातील एखाद्या पत्रकाराला कोविडची लागण झाल्यास त्याला शाश्वत उपचार मिळावेत यासाठी पत्रकार मंचने पत्रकारांसाठी प्राणवायुची सुविधा असलेले दोन बेड उपलब्ध करुन देण्याची विनंती तांबे हॉस्पिटल व्यवस्थापनाला केली होती. त्याला प्रतिसाद देत हॉस्पिटलने सोमवारी दोन बेड उपलब्ध करुन देत असल्याचे पत्र पत्रकार मंचच्या हाती सोपविले. यावेळी बोलताना त्यांनी वरील भावना व्यक्त केल्या. यावेळी मंचावर डॉ.चेतन जैन, डॉ.संदीप जाधव, पत्रकार मंचचे अध्यक्ष श्याम तिवारी, पत्रकार सुनील नवले आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ.केशरवाणी पुढे म्हणाले की, लोकशाहीत पत्रकारांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र सध्याची स्थिती बिकट असल्याने पत्रकारांनीही आपल्या आरोग्याची योग्य काळजी घेण्याची गरज आहे. तांबे हॉस्पिटलमध्ये प्राणवायूची सोय आहे, मात्र व्हेंटीलेटर नसल्याने दुर्दैवाने ते वापरण्याची वेळ आल्यास संबंधिताची परवड होवू नये यासाठी रुग्णालयाच्यावतीने शहरातील पत्रकारांना प्रत्येकी दीड लाख रुपयांचे ‘कोविड कवच’ही प्रदान करण्यात येणार आहे. त्यामुळे एखाद्या पत्रकारावर अन्य रुग्णालयात उपचार करण्याची वेळ आली तरीही त्यांची आर्थिक परवड होणार नाही.
श्याम तिवारी यांनी पत्रकारांच्या काळजीपोटी तांबे हॉस्पिटलने राबविलेल्या उपक्रमाबद्दल व्यवस्थापनाचे आभार व्यक्त करताना दिवंगत पत्रकार पांडुरंग रायकर यांच्यासारखी दुर्दैवी घटना पुन्हा घडू नये यासाठी पत्रकार मंचने हा पथदर्शी उपक्रम राबविल्याचे सांगितले. राज्यातील बहुधा हा पहिलाच प्रयोग ठरणार असल्याने अन्य ठिकाणच्या पत्रकार संघटनांनाही यातून प्रेरणा मिळेल व भविष्यातील वेदनादायी प्रसंग टाळता येतील असे ते म्हणाले. संगमनेर शहरातील जे पत्रकार वृत्तपत्रात अथवा वृत्तवाहिन्यांमध्ये कार्यरत आहेत त्यांच्यासाठी ही सुविधा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
गौतम गायकवाड यांनी पत्रकार समाजासाठी लढत असतो, समाजाने त्याची अशा पद्धतीने दखल घेतल्याचे पाहून मनस्वी आनंद झाल्याचे सांगितले. एकीचे बळ मोठे असते, संघटनेच्या माध्यमातून ज्या पद्धतीने पत्रकारांच्या आरोग्याची काळजी घेतली गेली तशाच पद्धतीने अन्य समस्या सोडवण्याचाही प्रयत्न भविष्यात होईल अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकार सुनील नवले, विकास वाव्हळ, नितीन ओझा, शेखर पानसरे, गोरक्ष नेहे, नीलिमा घाडगे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला श्याम तिवारी, नितीन ओझा, गोरक्षनाथ मदने, सुनील नवले, आनंद गायकवाड, शेखर पानसरे, गौतम गायकवाड, गोरक्ष नेहे, सोमनाथ काळे, विकास वाव्हळ, सुनील महाले, अंकुश बुब, सचिन जंत्रे, अमोल मतकर, नीलिमा घाडगे, सतीश आहेर, संजय अहिरे, धीरज ठाकूर, संजय साबळे, बाळासाहेब गडाख, सुकदेव गाडेकर, विनोद पाळंदे आदी पत्रकार बांधव उपस्थित होते.