अमरनाथ यात्रेसाठी गेलेले जिल्ह्यातील भाविक सुखरूप परतीचे जोरदार प्रयत्न सुरू; ३१ भाविकांमध्ये पंधरा महिलांचा समावेश

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
अमरनाथ ते जम्मूपर्यंत पावसाचा हाहाकार सुरू असून श्रीनगरपासून जवळच असलेला रामबन पूल कोसळल्याने या मार्गावरची वाहतूक बंद झाल्याने अमरनाथ यात्रेसाठी गेलेले श्रीरामपूर, राहाता तालुक्यातील सुमारे 31 भाविक येथे अडकले असून यात 15 महिलांचा समावेश आहे. यातील 22 जण एकट्या बेलापूर-केसापूरचे आहेत. अन्य श्रीरामपूर, कोल्हार, लोणी येथील आहेत. हे सर्व भाविक सुखरूप असल्याचे समजते. गत चार दिवसांपासून ते मिलिटरी कॅम्पमध्ये पाहुणचार घेत असून त्यांच्या परतीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत.

अमरनाथ यात्रेसाठी दरवर्षी अहमदनगर जिल्ह्यातून भाविक मोठ्या संख्येने जात असतात. यावर्षीही अनेकांनी जाण्याबाबत नियोजन केले. श्रीरामपूर, राहाता तालुक्यातील सुमारे 31 भाविकांनी वैष्णोदेवी आणि अमरनाथ दर्शनासाठी जाण्याचा बेत आखला. ठरल्यानुसार 30 जून रोजी पत्रकार गोविंद साळुंके, शशिकांत पुजारी यांच्या नेतृत्वाखाली शारदा साळुंके, सोनाली साबळे, प्रकाश मेहेत्रे, लता मेहेत्रे, भाऊसाहेब मेहेत्रे, उषा मेहेत्रे, गीता मेहेत्रे, रतन घोगरे, सविता पुजारी, दीपक अंत्रे, विजया अंत्रे, संग्राम अनाप, साक्षी अनाप, पुजारी गीते, संतोष पगारे, प्रियांका पगारे, योगेश प्रधान, ऋषिकेश जानवे, योगिता प्रधान, पवन भांड, संगीता मिसाळ, सोनाली साबळे, सार्थक अनाप, जगन्नाथ भगत, विजय भगत, राजेंद्र शिंदे, शोभा बोडखे, बाळासाहेब शिराडकर, अलका शिराडकर हे सर्वजण श्रीरामपूर येथे रेल्वे स्थानकावरून झेलम एक्सप्रेसने रवाना झाले. हे सर्वजण जम्मूत उतरले. तेथून कटारा येथे गेले. तेथे गेल्यानंतर सर्वांनी वैष्णोदेवीचे दर्शन घेतले. त्यानंतर अमरनाथ यात्रेचा खडतर प्रवास सुरू झाला.

अडचणींना तोंड देत शिवलिंगचे दर्शनही घेतले. त्यानंतर ही मंडळी पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाली. त्याचवेळी या परिसरात धो-धो पाऊस कोसळत होता. कुठे पूर परिस्थिती होती. तर काही ठिकाणी दरडी कोसळत होत्या, अशातच ही मंडळी येत असतानाच जम्मू-श्रीनगर या महामार्गावरील रामबन पूल पावसाच्या पाण्याने कोसळला. त्यामुळे वाहतूक बंद झाली. परिणामी हे भाविक तेथेच अडकले. घटनेची माहिती कळताच, तेथील प्रशासनाने हालचाल करून या भाविकांना अनंतबाग येथील लष्कराच्या मीर बाजार बेस कॅम्पमध्ये नेवून त्यांची राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था केली. यावेळी अन्य ठिकाणचे भाविकही होते. दरम्यान, अहमदनगर जिल्हयातील भाविकांवर संकट ओढवल्याने काहींनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे आणि जिल्हाधिकार्यांशी संपर्क केला. त्यानंतर त्यांनी तातडीने दखल घेऊन या सर्वांना सुखरूप घरी आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू केल आहे. आज ही सर्व मंडळी तेथून मार्गस्थ होण्याची शक्यता आहे.
