घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिव्यांग तरुणीवर अत्याचार..! संतापजनक घटना; माहिती मिळताच पोलिसांनी नराधमाला ठोकल्या बेड्या..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
आई-वडील व भाऊ रोजंदारीसाठी बाहेर गेल्याची संधी साधून घारगाव परिसरातील एका 32 वर्षीय नराधमाने हाताने अपंग असलेल्या एका वीसवर्षीय तरुणीवर बळजोरीने अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार सोमवारी समोर आला. या घटनेनंतर पीडितेच्या आई-वडिलांनी ‘त्या’ नराधमाच्या घरी जावून जाब विचारला असता उलट त्यानेच हातात काठी घेत पीडितेच्या आईला मारहाण करण्यासह ‘तुम्ही कुठवरही जा, मी तुम्हाला मोडून काढील’ अशी धमकी दिली. याप्रकरणी मध्यरात्री गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर घारगाव पोलिसांनी वेगाने तपासाची चक्र फिरवून नराधम सचिन ठका खंडागळे याला बेड्या ठोकल्या असून आज दुपारी त्याला न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. या घटनेने पठारभागात संताप निर्माण झाला असून एका दिव्यांग तरुणीवर तिच्या असाहाय्यतेचा फायदा घेत अत्याचार करणार्‍या नराधमावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार सदरची संतापजनक घटना सोमवारी (ता.10) घारगाव पोलीस ठाण्यापासून सात किलोमीटर अंतरावरील एका गावात घडली. या घटनेत दिवसभर घरात आपल्या लहान भावासोबत एकटीच असलेली व एका हाताने दिव्यांग असलेली 20 वर्षीय तरुणी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास स्वयंपाकासाठी चूल पेटवत होती. त्याचवेळी मनात वासनेचा सैतान घेवून अकलापूरात राहणारा सचिन ठका खंडागळे हा नराधम तिथे आला. यावेळी परिस्थितीचा अंदाज घेवून पीडितेच्या घरात कोणी नसल्याचे ताडीत त्याने सोबत असलेल्या आपल्या लहान मुलाला पीडितेच्या भावासोबत खेळण्यासाठी घराच्या मागे जाण्यास सांगितले, त्यानुसार ते दोघेही पाठीमागील बाजूस गेले.

त्यानंतर आरोपी खंडागळेने पीडितेच्या घरात घुसून आतून दरवाजा बंद केला. हा प्रकार पाहून घाबरलेल्या पीडितेने त्याला प्रतिकार करण्याचाही प्रयत्न केला. मात्र शरीराने आडदांग असलेल्या त्या नराधमाने एका हाताने दिव्यांग असलेल्या पीडितेचा प्रतिकार मोडून काढला आणि तो तिच्या हाताला पकडून फरफटतच तिला घरातील मोरीजवळ घेवून गेला. यावेळी त्याच्या तावडीतून सुटण्यासाठी पीडितेने त्याला चावा घेत त्याला बाजूला सारण्याचाही प्रयत्न केला. मात्र त्याने पीडितेचे तोंड दाबून आपल्या मनातील वासनेच्या सैतानाची आग शमवलीच. या घटनेनंतर नराधम खंडागळे घराबाहेर पडून आपल्या मुलासह तेथून निघून गेला, तर पीडित तरुणी आपल्या लहान भावासह आई-वडिलांच्या घरी येण्याची वाट पाहू लागली.

सायंकाळी साडेसातच्या सुमारास पीडितेचे आई-वडील व भाऊ घरी येताच तिने आपल्या आईला मिठी मारली व रडतरडत घडला प्रकार कथन केला. त्यानंतर पीडितेसह तिच्या आई-वडिलांनी आरोपीच्या घरी जावून ‘आमच्या मुलीसोबत असे का केलेस?’ असा प्रश्न विचारला असता उलट त्यानेच जवळ पडलेली काठी उचलून पीडितेच्या आईला मारहाण केली. यावेळी पीडितेच्या वडीलांनीही त्याला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र माजलेल्या वळूसारखी शरीरयष्टी असलेला तो नराधम त्यांच्या आवाक्यात आला नाही. त्यामुळे याच्याशी भांडण्यात अर्थ नसल्याचे समजून ते सर्वजण तेथून माघारी निघाले असता शिरजोर झालेल्या सचिन खंडागळेने ‘तुम्ही कुठवरही जा, मी तुम्हाला मोडून-तोडून काढील’ असा सज्जड दमही भरला.

यानंतर रात्रीच पीडितेसह तिच्या आई-वडिलांनी जवळच्याच गावात राहणार्‍या आपल्या नातेवाईकांना सोबत घेत घारगाव पोलीस ठाणे गाठले व घडला प्रकार कथन केला. सदरचा संतापजनक प्रकार ऐकून पोलिसही तत्काळ अ‍ॅक्शन मोडमध्ये आले. याबाबत पीडित वीसवर्षीय तरुणीच्या फिर्यादीवरुन आरोपी सचिन ठका खंडागळे (वय 32, रा.अकलापूर) याच्या विरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 376 (2) (ब), 452, 324, 506 सह अपंग व्यक्ती अधिकार अधिनियमाच्या कलम 92 नुसार गुन्ह्याची नोंद करीत आरोपीच्या शोधासाठी पथक रवाना केले. आज (ता.11) पहाटे नराधम खंडागळे पोलिसांच्या हाती लागला असून त्याच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. आज त्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार असून पोलीस कोठडीची मागणीही होणार आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमेश पतंगे करीत आहेत. या घटनेने संपूर्ण पठारभागात संताप निर्माण झाला असून आरोपीला कठोर शासन करण्याची मागणी होत आहे.

Visits: 7 Today: 2 Total: 23176

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *