निळवंडे येथील महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक
निळवंडे येथील महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी एकाला अटक
नायक वृत्तसेवा, संगमनेर
भावाला पैसे देण्यासाठी सोबत नेलेल्या इसमानेच परतीच्या प्रवासात आडवाटेला नेवून अत्याचार केल्याची घटना तालुका पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून समोर आली आहे. या प्रकरणी निळवंडे येथील 25 वर्षीय महिलेच्या फिर्यादीवरुन तालुका पोलिसांनी सतीश संतु केरे याच्या विरोधात अत्याचाराचा गुन्हा नोंद करीत त्याला अटक केली आहे. या प्रकरणानंतर निळवंडे परिसरात उलटसुलट चर्चा सुरू असून पोलीसही त्यादृष्टीने तपास करीत आहेत.
याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी (ता.5) निळवंडे येथील 25 वर्षीय महिलेने त्याच गावात राहणार्या सतीश संतु केरे याला विनंती करीत आपल्या भावाचे पैसे देण्यासाठी सिन्नर येथे येण्याची विनंती केली. त्यानुसार आरोपीने संबंधित महिलेला आपल्या दुचाकीवरुन सिन्नरमध्ये नेले व तेथून मुसळगाव स्टेडियमकडे नेले व ‘तुझ्या भावाचे पैसे त्याच्या खात्यात भरतो’ असा भरवसा देत तेथून पुन्हा संगमनेरच्या दिशेने प्रवास सुरू केला. सायंकाळी साडेसातच्या सुमारास त्यांची दुचाकी कर्हे परिसरात आली असता आरोपीने नवीन रस्ता सोडून जुन्या मार्गाने दुचाकी नेत निर्मनुष्य ठिकाणी वाहन थांबवून तिच्याशी बळजोरी केली. तिने त्याचा विरोध केला असता आरोपीने हाताने तिच्या तोंडावर चापटी मारुन तिला दमबाजी करीत बळजबरीने तिच्या मनाविरुद्ध तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याचीही धमकी दिली.
दुसर्या दिवशी संबंधित महिलेने तालुका पोलीस ठाणे गाठून घडला प्रकार कथन केला. त्यावरुन पोलिसांनी आरोपी सतीश संतु केरे (रा.निळवंडे) याच्या विरोधात भा.दं.वि.कलम 376, 323, 504, 506 प्रमाणे गुन्हा नोंद करीत आरोपीला तात्काळ अटक केली. सध्या तो पोलीस कोठडीत असून पोलीस या प्रकरणातील सत्यता तपासून पाहत आहेत. या प्रकरणाने निळवंडे परिसरात एकच खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चांना अक्षरशः उधाण आले आहे.