शहरापाठोपाठ आता पठारभागातही महिलांच्या धर्मांतरणाचा प्रयत्न! सख्खा मामाच झाला धर्मप्रसारक; हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्याच्या घरातच घडला प्रकार..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या आठवड्यात चक्क भगव्या ध्वजाखाली उभे राहून फळविक्रेत्या महिलेला ख्रिश्‍चन धर्म स्वीकारण्याचा आग्रह धरण्यावरुन संताप उसळला असतानाच आता तसाच प्रकार पठारभागातही सुरु असल्याचे समोर आले आहे. या घटनेत आदिवासी-भील्ल समाजातील महिलांना लक्ष्य करुन त्यांच्यावर धर्मांतर करण्याचा दबाव निर्माण केला जात असून त्यासाठी वेगवेगळ्या आमिषांसह थेट कुटुंबालाच जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात आहेत. गेल्या वर्षभरापासून आपल्या मामाकडूनच सुरु असलेल्या या धक्कादायक प्रकाराला वैतागलेल्या 22 वर्षीय विवाहितेने अखेर हिंदुत्त्ववादी कार्यकर्त्यांच्या मदतीने चिंचपूरमध्ये राहणार्‍या गंगाराम पवार नावाच्या ख्रिश्‍चन धर्मप्रसारकावर धार्मिक भावना दुखावल्यासह शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्यावरुन भारतीय न्यासंहितेतील विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे यातील तक्रारदार महिलेचा पती हिंदुत्त्ववादी संघटनेशी संबंधीत असल्याचे माहिती असतानाही हा प्रकार घडल्याने आश्‍चर्यही निर्माण झाले आहे.


याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या वर्षभरापासून दरेवाडीतील दोन महिलांसोबत सुरु असलेल्या या प्रकरणाची तक्रार शुक्रवारी (ता.28) दाखल झाली. दरेवाडीत आदिवासी-भील्ल समाजाची मोठ्या प्रमाणात घरे असून त्यातील बहुतेकजण मोलमजुरी करुन आपले जीवन जगतात. त्यातीलच एका कुटुंबाला हेरुन चिंचपूरच्या गंगाराम नवनाथ पवार या ख्रिश्‍चन धर्मप्रसारकाने आपला अजेंडा राबवण्यास सुरुवात केली. त्यासाठी गेल्या वर्षभरापासून तो वारंवार पठारभागात येवून ‘त्या’ कुटुंबातील दोन महिलांना त्याच्या धर्माची महती सांगताना तो कसा श्रेष्ठ आहे याच्या कथाही सांगू लागला. मात्र त्याचा कोणताही परिणाम त्यांच्यावर होत नसल्याने त्याने वेगवेगळे आमिषही दाखवले.


या उपरांतही दोन्ही महिला ‘ठाम’ राहिल्याने त्याचा संताप होत गेला आणि अखेर त्याने काल शुक्रवारी (ता.28) दुपारी दोनच्या सुमारास पुन्हा दरेवाडीत येवून त्या महिलांचे घर गाठले. अर्थात सदरचा इसम तक्रारदार महिलेचा नात्याने मामा असल्याने त्याच्या येण्याजाण्यावर कोणतेही निर्बंध नव्हते. यावेळी त्याने पुन्हा ‘त्या’ 22 वर्षीय विवाहितेशी बोलतांना ‘तुम्ही ख्रिश्‍चन धर्म स्वीकारा. जर तुम्हाला तुमचा धर्म सोडायचा नसेल तर, तुमच्या संपूर्ण कुटुंबाला जीवे ठार मारील‘ अशी धमकीही त्याने भरली. त्यानंतर काही क्षणातच त्याने त्या विवाहितेच्या हाताला बळजबरीने ‘धागा’ बांधून ओठांतल्या ओठांत काहीतरी पुटपूट करीत पाणी शिंपडले.


बळजबरीचा हा प्रकार पाहून ती महिला संतापल्याने तिने आरडाओरड केली. त्यामुळे तिची जावही तेथे धावली. तिला पाहुनही त्या निर्लज्ज धर्मप्रसारकाने ‘तुम्ही ख्रिश्‍चन धर्म स्वीकारा, नाहीतर तुला मी नांदू देणार नाही, तुझ्या बापाच्या घरी सोडून येईल’ असा सज्जड दम भरला आणि तो शिवीगाळ करीत तेथून निघून गेला. घडल्या प्रकाराने ‘त्या’ महिलेच्या धार्मिक भावना दुखावल्याने तिनेही तत्काळ आपल्या पतीला फोनद्वारे सगळं काही सांगून टाकलं. हा प्रकार त्यालाही सून्न करणारा असल्याने त्याने एकलव्य संघटनेचे प्रमुख योगेश सूर्यवंशी यांना फोन करुन घडला प्रकार सांगितला. सदरचा प्रकार अतिशय गंभीर आणि जाणीवपूर्वक गरीब आणि गरजू समाजाला लक्ष्य करुन केला जात असल्याचे अनेक दाखले असल्याने त्यांनीही लागलीच दरेवाडीत धाव घेतली.


हा प्रकार पठारभागातील विविध हिंदुत्त्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनीही दरेवाडीत जावून त्या कुटुंबाची भेट घेत त्यांना धीर दिला. यावेळी त्या 22 वर्षीय विवाहितेने गंगाराम पवारने बळजबरीने धर्मांतरण करण्याचा प्रयत्न केल्याची बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर तिच्या पतीसह जमलेल्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करीत घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दुपारी साडेचारच्या सुमारास चिंचपूरहून येवून वर्षभरापासून धर्म बदलण्यासाठी सतत त्रास देणार्‍या गंगाराम नवनाथ पवार विरोधात धार्मिक भावना दुखावणे, शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमक्या दिल्यावरुन भारतीय न्यायसंहितेच्या कलम 302, 352, 351 (2), (3) प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. या वृत्ताने पठारभागात खळबळ उडाली असून बळजबरीने धर्मांतरण करण्याच्या प्रकाराने रोष निर्माण झाला आहे.


गेल्या आठवड्यात सोमवारी (18 मार्च) सह्याद्री विद्यालयाजवळील एका फळविक्रेत्या महिलेलाही तिघांनी अशाचप्रकारे ख्रिश्‍चन धर्माचे गोडवे गावून संभ्रमित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्या महिलेलाही पैसा, नोकरी, मुलांचे शिक्षण आणि घर देण्याचे आश्‍वासन देत धर्म बदलण्याची ‘ऑफर’ देण्यात आली. त्यामुळे त्या महिलेचाही संताप अनावर होवून तिने आरडाओरड सुरु करताच त्या तिघाही धर्मप्रसारकांनी तेथून काढता पाय घेतला. मात्र त्या उपरांतही त्या रणरागिनीने त्यांचा पीच्छा पुरवल्याने जमलेल्या लोकांनी त्यांना इथेच्छ चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. त्या प्रकरणात दाखल तक्रारीवरुन शहर पोलीस ठाण्यात भारती शांतीलाल चितळे (वय 40), आशा धिरज चितळे (वय 30, दोघीही विठ्ठलनगर, लोणी) व जीवन वामन सावंत (वय 48, रा. अहिल्यानगर) या तिघांवर गुन्हा झाला होता. ही घटना ताजी असतानाच आता पठारभागातूनही महिलांना ‘लक्ष्य’ करुन त्यांचे धर्मांतरण घडवण्याच्या प्रयत्नाचा प्रकार समोर आल्याने तालुक्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.


गेल्याकाही दिवसांत संगमनेर तालुक्याच्या वेगवेगळ्या भागात ख्रिश्‍चन धर्मप्रसारकांनी धुमाकूळ घातल्याचे चित्र दिसत असून गोरगरीब, गरजू महिलांना हेरुन त्यांचे मत परिवर्तन करण्याचे प्रकार समोर येवू लागले आहेत. धक्कादायक म्हणजे या प्रकरणात समोर येणारे धर्मप्रसारक आरोपी एकाच भागातील असल्याने वेगवेगळ्या चर्चांनाही उधाण आले असून त्यांच्याकडून घडणार्‍या घटनांचा तपास करताना त्यांच्या मूळ गावातील स्थितीचे अवलोकन करण्याचीही गरज आहे. अशा वाढत्या प्रकारातून सामाजिक सौहार्दालाही नख लागण्याची शक्यता असल्याने पोलिसांनीही या घटनांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज आहे.

Visits: 50 Today: 3 Total: 391373

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *