दुचाकींचे अपघात रोखण्यासाठी तरुणाने लढविली नामी शक्कल टाकाऊ पासून गणेश आरणेने बनविले टिकाऊ ‘थ्री इन वन’ इंडिकेटर

महेश पगारे, अकोले
अलिकडे अनेकजण सर्रासपणे दुचाकीचा मोठ्या संख्येने वाहतुकीसाठी वापर करत आहे. जेवढी दुचाकींची संख्या वाढली आहे, तेवढी अपघातांची देखील वाढलेली आहे. रात्रीच्या वेळी होणारे अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वीरगावमधील (ता.अकोले) एका तरुण पठ्ठ्याने नामी शक्कल लढविली आहे. त्याने टाकाऊ पासून टिकाऊ ‘थ्री इन वन’ इंडिकेटर तयार केले आहे. यातून नक्कीच अपघातांचे प्रमाण कमी होईल, असा विश्वासही त्याने व्यक्त केलाय.

वीरगावमधील गणेश निवृत्ती आरणे हा तरुण म्हणजे नेहमीच धडपड करत आणि काहीतरी शोधण्यात मग्न असतो. त्यातूनच रोज कामावर दुचाकीवरुन ये-जा करताना त्याला अपघात झाल्याचे पाहायला मिळते. म्हणून आपण काहीतरी करावं आणि अपघात रोखावे म्हणून शक्कल लढवायचं ठरवलं. अखेर त्याच्या संशोधनाला सुरूवात झाली अन् ज्याप्रमाणे मोठ्या वाहनांना टेललँप असतो अगदी त्याचप्रमाणे दुचाकीला का असू नये? असा प्रश्न त्याला पडला. यातूनच बे्रक लाईट, पार्किंग लाईट आणि साईड इंडिकेटरची सुविधा दुचाकीच्या इंडिकेटरमध्ये टाकण्याची खटपट सुरू झाली.

दुचाकीच्याच जुन्या इंडिकेटरमध्ये गणेशने मोठ्या वाहनांप्रमाणेच बे्रक, पार्किंग आणि साईड इंडिकेटर एलईडी लाईटमध्ये बसविले. यासाठी केवळ त्याला सत्तर रुपयांचा खर्च आला आहे. यामुळे रात्रीच्या वेळी दुचाकीवरुन प्रवास करताना बिघाड झाला आणि दुचाकी लोटत असताना हे इंडिकेटर अचूक अंदाज देईल. त्यातून नक्कीच दुसर्या वाहनचालकाला याचा अंदाज घेता येईल आणि आपोआप अपघात कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास त्याने व्यक्त केलाय. या संशोधनाला पेटंट मिळावे म्हणून त्याने अर्ज देखील केला आहे. गणेशच्या या हुशारीचे दुचाकीचालकांनी कौतुक केले असून, वीरगावकर प्रत्यक्ष भेटून अभिनंदन करत आहे.
