विरोधात पडलेली मते भविष्यात धक्का देणारी ठरतील ः खताळ बाजार समिती निवडणूक; जनसेवा मंडळाकडून माजी मंत्री थोरातांवर टीका

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत सताधारी गटाचा विजय कसा झाला हे जनतेला चांगले माहीत आहे. जनसेवा मंडळाने निवडणुकीत उतरवलेले उमेदवार कोणत्याही संस्था, संस्थांचे कर्मचारी आणि पैशांचे पाठबळ नसलेल्या सामान्य कुटुबांतील होते. ही सर्व मंडळी केवळ विचारांची लढाई लढण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरली होती. त्यांना पडलेली मते भविष्यात प्रस्थापितांना धक्का देणारी ठरतील. लोकशाहीत निवडणुका, जय आणि पराजय या गोष्टी घडतच असतात, त्यामुळे या पराभवाने खचून न जाता नव्या उमेदीने काम करु आणि प्रवृत्तींच्या विरोधात सामान्यांच्या न्याय्य हक्कासाठी सुरु असलेला आमचा संघर्ष यापुढेही कायम राहील अशी ग्वाही जनसेवा मंडळाच्यावतीने युवा कार्यकर्ते अमोल खताळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनातून दिली आहे.

या संदर्भात माध्यमांना दिलेल्या पत्रकात अमोल खताळ यांनी संगमनेर बाजार समितीच्या निवडणुकीचा लेखाजोखा मांडताना माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरही घणाघाती टीका केली. आपल्याला राज्याचे नेते म्हणवून घेणार्यांना बाजार समितीसारख्या निवडणुकीत चार तास भर उन्हात बूथवर बसण्याची वेळ येणं यातच जनसेवा मंडळाच्या सामान्य उमेदवारांचा विजय असल्याचे ते म्हणाले. गेल्या अनेक वर्षांपासून ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांना आपल्या संपर्ण कुटुंबासह मतदान केंद्रावर थांबून राहावं लागणं म्हणजे आपल्याच कार्यकर्त्यांवरील अविश्वास वाढल्याचे लक्षण असल्याची टीकाही त्यांनी केली.

जनसेवा मंडळाची लढाई कोणा व्यक्ती विरोधात नाही तर ती प्रवृतीच्या विरोधात आहे. गेली अनेक वर्षे ठेकेदारांच्या माध्यमातून राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम संगमनेर तालुक्यात सुरु आहे. परंतु आता ठेकेदारी प्रवृतीला चाप बसवण्याचे काम महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरु असल्याने तालुक्यातील जनता आता उघडपणेे बोलू लागली आहे. कोणताही धाक व दडपशाही न जुमानता सूज्ञ मतदार प्रवृतीच्या विरोधातही मतदान करु शकतो हे चित्र या निवडणुकीतून स्पष्टपणे दिसून आल्याने भविष्यात प्रस्थसपितांना धक्का बसणार हे निश्चित असल्याचेही खताळ यांनी प्रसिद्धीपत्रकातून म्हंटले आहे. प्रस्थापितांच्या विरोधात उभ्या असलेल्या जनसेवाच्या सामान्य उमेदवारांना मतदारांनी पाठबळ दिल्याबद्दल त्यांनी आभारही मानले आहेत.

या पराभवाने उमेदवार आणि कार्यकर्ते खचलेले नाहीत तर मिळालेल्या मतांनी आमचा उत्साह द्विगुणीत झाला आहे. मतदारांचे हेच पाठबळ भविष्यातील संघर्षाला बळ देणारे ठरणार असून आमच्या सारख्या छोट्या कार्यकर्त्यांमुळे का होईना राज्यस्तरीय नेत्यांना बांधावर जावून मतदारांना भेटण्याची वेळ आल्याचेही प्रसिद्धीपत्रकातून सांगण्यात आले आहे. संगमनेर बाजार समितीच्या निवडणुकीत विरोधी उमेदवारांना पडलेली मते प्रस्थापित नेत्यांना धक्का देणारी असून आमचा उत्साह वाढवणारी असल्याचेही अमोल खताळ यांनी या पत्रकातून सांगितले आहे.
