पुणे-नाशिक महामार्गावर गुटखा वाहतूक करणारी कार पकडली कारसह अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त; दोघांना अटक, मंगळवारपर्यंत कोठडी
नायक वृत्तसेवा, घारगाव
गुजरातमधून अवैधरित्या गुटख्याची वाहतूक करणार्या कारला पुणे-नाशिक महामार्गावर आळेफाटा पोलिसांनी धाडसाने पकडले. या कारवाईत तब्बल 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई रविवारी (ता.23) पहाटे तीन वाजेच्या सुमारास आळेफाटा पोलिसांनी केली. आळेफाटा पोलिसांनी या कारवाईत एका कारसह शैलेश शशीकांत बनकर (वय 36, रा. रानमळा, कडूस, ता. खेड) आणि सचिन सखाराम सांडभोर (वय 35, रा. दोंदे, ता. खेड) यांना अटक केली आहे.
याबाबत आळेफाटा पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर कर्मचार्यांसह शासकीय वाहनातून रविवारी पहाटे पुणे-नाशिक महामार्गावर गस्त घालत होते. आळेखिंड येथून आळेफाट्याच्या दिशेने येत असताना पोलीस गाडी पाहून कारचालकाने (क्र. एमएच. 12, टीएस. 1943) पुण्याच्या दिशेने सुसाट पळविली. पुढे पाठलाग केला असता गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र कारला काही अंतरावर धाडसाने अडविले. अधिकची चौकशी केली असता गाडीमधील चालकाने आम्ही घाईत असून आम्हाला जाऊ द्या, अशी विनंती केली. कारची तपासणी केली असता त्यामध्ये खोके, मिक्स मोठे पोते आढळून आले. कार आळेफाटा पोलीस ठाण्यात आणून अधिकची चौकशी केली. या कारमध्ये गुटखा सापडला. पोलिसांनी हा गुटखा तसेच वाहतुकीसाठी वापरलेली कार असा एकूण 11 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस अंमलदार पद्मसिंह शिंदे यांच्या फिर्यादीवरून वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर, पोलीस हवालदार विनोद गायकवाड, लहानू बांगर, भीमा लोंढे, अमित मालुंजे, पोलीस अंमलदार पद्मसिंह शिंदे आदिंनी केली. दोन्ही आरोपींना अटक करुन न्यायालयात हजर केले असता मंगळवारपर्यंत (ता.25) पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर करीत आहेत.