पहाटे उपअधीक्षकांचा तर दुपारी शहर पोलिसांचा छापा! कारवाईबाबत संशय; शहर पोलिसांसमोर आरोपी मात्र पळाला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गुरुवारचा दिवस संगमनेर शहरातील दोन पोलीस केंद्रांच्या कर्तव्य परायणतेची परीक्षा घेणारा ठरला. यातील पहिल्या घटनेत पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने मोगलपुर्यात छापा घालून अपेक्षीत कारवाई केली, तर त्याच दिवशी दुपारी शहर पोलिसांनीही तत्परता दाखवून मदिनानगरमध्ये छापा घालीत साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पण नेहमीप्रमाणे शहर पोलिसांच्या कारवाईत एकाही आरोपीला अटक झाली नाही. त्यामुळे या कारवाईबाबत मात्र संशय निर्माण झाला आहे.

काल गुरुवारी (ता.20) पहाटे सव्वा वाजण्याच्या सुमारास पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांच्या पथकाने मोगलपुरा परिसरातील कत्तलखान्यावर छापा घातला होता. या कारवाईत पोलिसांनी सतराशे किलो गोवंशाच्या मांसासह 9 लाख 60 हजारांचा मुद्देमाल हस्तगत एका अल्पवयीन मुलासह सहाजणांवर गुन्हा दाखल केला व त्यातील दोघांना अटकही केली. या कारवाईने आपल्या कामकाजाबाबत संशय नको म्हणून गुरुवारीच भरदुपारी अडिच वाजता शहर पोलिसांच्या पथकाने मदिनानगरमध्ये छापा घालून चारशे किलो गोवंशाच्या मांसासह एका अलियान फोर्ड कंपनीचा कार असा एकूण साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला, मात्र या कारवाईत पोलीस दप्तरी आरोपी पसार झाल्याची नोंद करण्यात आली. त्यामुळे कारवाई होवूनही पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत संशय निर्माण झाला आहे.

याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी दुपारी एक इसम मदिनानगरमधील एका मोठ्या इमारतीच्या पाठीमागील आडोशाच्या जागी गोवंशाची कत्तल करीत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार तेथे पोलिसांनी छापा घातला असता नेहमीप्रमाणे आरोपी तेथून पळून गेला. या कारवाईत पोलिसांनी घटनास्थळावरुन साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस शिपाई विवेक जाधव यांनी फिर्याद दाखल केली असून त्यावरुन पोलिसांनी त्याच परिसरातील आमीन कादीर अन्सारी याच्या विरोधात भा.द.वी.कलमांसह महाराष्ट्र प्राणी संरक्षण व गोवंश हत्याबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन पुढील तपास पो.कॉ.सचिन उगले यांच्याकडे सोपविला आहे.

