किसान सभेच्या ‘लेटर टू पी. एम.’ मोहिमेला राज्यभर जोरदार प्रतिसाद

किसान सभेच्या ‘लेटर टू पी. एम.’ मोहिमेला राज्यभर जोरदार प्रतिसाद
हजारो पत्रे पाठवून केंद्राच्या शेतकरी विरोधी धोरणांचा केला तीव्र निषेध
नायक वृत्तसेवा, अकोले
सोमवारी (ता.16) बलिप्रतिपदा दिनी राज्यभरातील हजारो बळीराजांनी पंतप्रधानांना पत्र पाठवून केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा तीव्र निषेध करत जोरदार आंदोलन केले. किसान सभेच्या नेतृत्वाखाली संपन्न झालेल्या या आंदोलनात राज्यातील 21 जिल्ह्यांमधून हजारो पत्रे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविण्यात आली.

केंद्र सरकारने राज्यातील अतिवृष्टीच्या नुकसान मदतीत भरीव वाढ करावी, पीक विमा योजनेची रास्त अंमलबजावणी करावी, पीक विमा योजना शेतकर्‍यांना न्याय देणारी बनविण्यासाठी पावले उचलावीत, शेतकर्‍यांच्या सर्व पिकांना आधार भावाचे कायदेशीर संरक्षण द्यावे, किमान आधारभावाने शेतमाल खरेदी करण्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करून व्यवस्था उभाराव, शेतकर्‍यांची देशव्यापी कर्जमुक्ती करण्यासाठी केंद्रीय स्तरावर योजना करावी, सर्व शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, शेतकर्‍यांना व्यापार व तंत्रज्ञान स्वातंत्र्य द्यावे, कसत असलेल्या जमिनी शेतकर्‍यांच्या नावे कराव्यात, आदिवासी व वन निवासींना विस्थापित करणार्‍या जाचक इको सेन्सिटिव्ह धोरणात बदल करावेत, आदिवासी व वन निवासींना विस्थापित न करता त्यांच्या रास्त व न्याय्य विकासाची हमी देत वन्यप्राणी व मानव यांच्या सहजीवनाच्या तत्वाला केंद्रस्थानी मानत जैववैविध्य रक्षणाचे व पर्यावरण रक्षणाचे धोरण आखावे या मागण्यांचा आग्रह धरण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहून या लेटर टू पी. एम. मोहिमेत हजारो शेतकरी सहभागी झाले.

तालुका व गाव स्तरावर शेतकर्‍यांनी लिहिलेली पत्रे टपाल पेटीत टाकण्यासाठी किसान सभेच्यावतीने मिरवणुका काढण्यात आल्या. टपाल कार्यालय समोर निदर्शने करत ही पत्रे टपालात टाकण्यात आली. केंद्र सरकारने आपली शेतकरी विरोधी धोरणे तातडीने मागे घ्यावीत अशी मागणी यावेळी करण्यात आली. डॉ.अशोक ढवळे, जे. पी. गावित, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख व डॉ.अजित नवले यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. अकोले येथे सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, जुबेदा मणियार, कैलास वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली शहरातून मिरवणूक काढून टपालात पत्रे टाकण्यात आली.

Visits: 2 Today: 1 Total: 29533

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *