संगमनेरच्या ग्रामयात्रेतील तमाशाला साडेपाच दशकानंतर खंड! यात्रा कमिटीबाबत नाराजी; मानधन आणि पर्याय उभा करण्यात अपयश..


श्याम तिवारी, संगमनेर
संगमनेरचे ग्रामदैवत असलेल्या लक्ष्मणबाबा यांच्या यात्रेत दरवर्षी सादर होणार्‍या रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांच्या लोकनाट्य तमाशाच्या परंपरेला यंदा खंड पडणार आहे. गेल्या 54 वर्षांपासून अपवाद वगळता दरवर्षी या तमाशा मंडळाकडून अक्षय तृतीयेच्या दिनी कलाकारांची हजेरी लावली जाते. मात्र यात्रा कमिटीकडून होणारी उपेक्षा आणि मोबदल्यात मिळणारे तुटपूंजे मानधन या कारणास्तव या वर्षीपासून तमाशा फड मालकांनी आपल्या कलेचे सादरीकरण करण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे तब्बल साडेपाच दशकांपासून अव्याहत सुरु असलेल्या या पंरपरेला यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच खंड पडणार आहे. या यात्रेतील आकर्षणाचे केंद्र असलेला तमाशा रद्द झाल्याने त्याचा परिणाम भाविकांच्या उपस्थितीवरही होण्याची दाट शक्यता आहे.


विविध कथा आणि दंतकथेच्या वलयात संगमनेर नगर पालिकेच्या प्रांगणात विराजमान असलेल्या श्री लक्ष्मणबाबांच्या जीवनाबाबत संगमनेर व परिसरात वेगवेगळ्या मान्यता आहेत. बाबांना कोणी स्वातंत्र्य संग्रामातील भिल्ल समाजाचे प्रतिनिधीत्त्व करणारे यौद्धा म्हणून मानतात, तर कोणी लोकांच्या अडचणी आणि समस्या सोडवणारे अवलिया म्हणून त्यांच्याकडे पाहतात. लक्ष्मणबाबांची शेंदरी प्रतिमा धनुर्धारी असल्याने अनेकजण त्यांना प्रभु श्रीरामचंद्रांचे बंधू लक्ष्मण म्हणूनही पूजतात. पूर्वी संगमनेरचे ग्रामीण रुग्णालय पालिकेच्या आवारात होते. त्यावेळी अपघातात जखमी होवून आणलेले रुग्ण असोत, अथवा बाळंतपणासाठी दाखल झालेली महिला ज्यांनी ज्यांनी पालिकेच्या आवारातील लक्ष्मणबाबांच्या देवळात जावून आपली पीडा सांगितली त्यांना त्याचा अनुभव मिळाला. त्यामुळेच लक्ष्मणबाबांना संगमनेरचे ग्रामदैवत म्हणून मानले जाते.


कलाभूषण रघुवीर खेडकर यांच्या दिवंगत मातोश्री कांताबाई सातारकर यांनाही त्यांच्या जीवनातील एका प्रसंगातून लक्ष्मणबाबांची अनुभूती मिळाल्याचे सांगितले जाते. सन 1968-69 साली संगमनेरात आलेल्या सातारकर यांनी त्यावेळी प्रचंड संघर्ष केला. त्याकाळी दुसर्‍यांच्या तमाशा मंडळात काम करुन आपली उपजीविका चालवणार्‍या सातारकर यांनी लक्ष्मणबाबांसमोर नतमस्तक होवून आपल्या मालकीचा फड उभा राहील्यास दरवर्षी अक्षय तृतीयेच्या दिवशी होणार्‍या यात्रौत्सवात आपल्या कलेची हजेरी लावण्याचा नवस केला आणि वर्षभरातच तो सिद्ध झाल्याने 1969 सालापासून दरवर्षी त्यांनी राज्यातील अनेक ठिकाणच्या हजारों, लाखों रुपयांच्या सुपार्‍या टाळून आपल्या नवसाची पूर्ती केली ती गेल्यावर्षी 2022 पर्यंत कायम होती.


या 54 वर्षात दरवर्षी श्री लक्ष्मणबाबा यात्रा कमिटीकडून श्रीमती कांताबाई व रघुवीर खेडकर यांच्यासह त्यांच्या तमाशा मंडळातील कलाकारांना कपडे अथवा त्यासाठी ठराविक मानधन देण्याची पद्धत होती. मात्र नंतरच्या काळात जमा होणारा निधी आणि वाढत गेलेला खर्च यांचा ताळमेळ जुळविण्यात यात्रा कमिटी अपयशी ठरु लागल्याने दरवर्षी सातारकरांना देण्यात येणार्‍या मानधनाच्या रकमेवर त्याचा परिणाम होवू लागला. अर्थात सातारकरांचा नवस असल्याने गेल्या 54 वर्षात त्यांनी कधीही मानधनासाठी आग्रह धरल्याचे एकही उदाहरण नाही. मात्र दुर्दैवाने कोविड संक्रमणाच्या फेर्‍याने सातारकर कुटुंबावर आभाळ कोसळले आणि त्यात परिवारातील काही सदस्यांसह कुटुंबप्रमुख असलेल्या कांताबाई सातारकरही बाधित होवून त्यातच 25 मे 2021 रोजी त्यांचे निधन झाले.


श्रीमती सातारकर यांच्या निधनानंतरही त्यांचे सुपुत्र कलाभूषण रघुवीर खेडकर यांनी गेल्यावर्षी अक्षय तृतीयेला आपल्या आईने केलेल्या नवसाची पूर्ती म्हणून लक्ष्मणबाबांच्या चरणी आपली कला सादर केली, मात्र हा कार्यक्रम या यात्रेतील शेवटचा ठरला. यंदाच्या वर्षी रघुवीर खेडकर यांनी लक्ष्मणबाबा यात्रा कमिटीला आपला स्पष्ट नकार कळविला असून सन 1969 सालापासून कोविड संक्रमणाची दोन वर्ष वगळता अव्याहतपणे सादर होणार्‍या लोकनाट्य तमाशाला तब्बल 54 वर्षांनंतर यंदा खंड पडला आहे. त्यामुळे संगमनेर व पंचक्रोशीतील हजारों कलारसिकांचा यंदा हिरमोड होणार असल्याने त्याचा परिणाम संगमनेरच्या ग्रामदैवताच्या यात्रेतील गर्दीवरही होण्याची दाट शक्यता आहे.


वास्तवात पाहता श्रीमती सातारकर यांनी संगमनेरला आपलेसे करतांना गेल्या पाच-सहा दशकांच्या कालावधीत या शहराचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यासह दिल्ली, चंदीगड, कर्नाटक अशा राज्यापासून कितीतरी दूर असलेल्या ठिकाणांपर्यंत पोहोचवले. त्याबदल्यात संगमनेरकरांकडून मात्र खेडकर कुटुंबाची सतत उपेक्षाच झाली. शंभराहून अधिक कलाकारांचा भरणा असलेला राज्यातील सर्वात मोठा आणि आघाडीच्या या लोकनाट्य तमाशाच्या मालकीन जेव्हा पहिल्यांदा संगमनेरात आल्या त्यावेळी त्यांना भाड्याची खोली घेवून नेहरु गार्डनसमोर रहावे लागले. त्याकाळी तमाशात काम करणार्‍या व्यक्ति म्हणून त्यांना परिसरातील नागरिकही सुख-दुखाच्या कार्यक्रमात बोलावत नसे. पुढे डॉ.संतोष खेडलेकर या तरुण साहित्यिकाने सातारकरांच्या संघर्षावर आधारित पुस्तक लिहिल्यानंतर या परिस्थितीत काही प्रमाणात बदलही झाले, मात्र ते खुपच मर्यादीत होते.


कुटुंबातील सदस्यांसह तमाशात काम करणार्‍यांच्या संख्येतही मोठी वाढ झाल्याने नेहरु गार्डनजवळील भाड्याची खोली अपूरी वाटू लागली. संगमनेरचे नाव लोककलेच्या माध्यमातून खेडोपाडी नेणार्‍या लोककलेच्या या पोशीद्यांना शासन अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेकडून निवासासाठी दोन गुंठे जागेची अपेक्षा होती. मात्र वारंवार विनंती आर्जवं करुनही त्यांना कोठूनही दाद मिळाली नाही, त्यामुळे पदरमोड करुन त्यांनी सार्वजनिक शौचालयाच्या शेजारी असल्याने स्वस्तात मिळत असलेली जागा घेवून स्वतःच आपले घर बांधले. श्रीमती सातारकर यांच्या निधनानंतर त्यांचे पुत्र रघुवीर व त्यांच्या कन्या आजही लोककलेचा जागर करीत असून त्यांच्या फडात शंभराहून अधिक कलाकार काम करतात.


कोविड संक्रमणाच्या कालावधीत देशभरातील सार्वजनिक उत्सवांसह यात्रा-जत्रांवरही निर्बंध आले होते. त्यामुळे सलग दोन वर्ष तमाशा फड चालवणार्‍यांना पदरमोड करुन आपल्या कलाकारांना आणि त्यांच्या कुटुंबाला जगवावे लागले. रघुवीर खेडकर यांच्या तमाशा मंडळात शंभरावर अधिक माणसं असल्याने त्यांना सांभाळण्यात ते कर्जबाजारी झाले. त्यावेळी काही कलाकारांना कोविडची बाधाही झाल्याने त्यांना आर्थिक मदतही करावी लागली. त्यातच श्रीमती सातारकर यांच्यासह त्यांची कन्या आणि नातूही कोविडने हिरावला. या प्रचंड संकटातही लोककलेचा वारसा जोपासणार्‍या खेडकरांना कोणीही मदत केली नाही, मात्र त्याचे शल्य न बाळगता त्यांनी त्या स्थितीतही गेल्यावर्षी लक्ष्मणबाबांच्या दरबारी हजेरी लावली होती.


सन 1968 साली श्रीमती कांताबाई सातारकर यांनी लक्ष्मणबाबांना केलेला नवस त्यांनी हयातभर जोपासला. त्यांच्या निधनानंतरही गेल्या वर्षीपर्यंत ही परंपरा कायम होती. मात्र इतक्या कलाकारांचा दैनंदिन खर्च, कलाकार व सामानाच्या वाहतुकीसाठी होणारा डिझेल खर्च, रंगभूषा, खानपानावरील खर्च, कलाकारांचे मानधन अशा कितीतरी गोष्टींचा खर्च आता मोठ्या प्रमाणात वाढला, मात्र यात्रा कमिटीकडून मिळणारे मानधन अत्यंत तोकडे होत गेल्याने आणि येथील हजेरीसाठी दरवर्षी खेडकर लाखोंच्या सुपार्‍यांवर पाणी सोडत असल्याने यावर्षी त्यांनी अपूर्‍या मानधनावर तमाशाचे सादरीकरण करण्यात असमर्थतता दर्शविली. यात्रा कमिटीलाही त्यांची मनधरणी करण्यात अथवा अन्य पर्याय उपलब्ध करण्यात अपयश आले. त्यामुळे गेल्या 54 वर्षांपासून संगमनेरच्या ग्रामोत्सवाचे आकर्षण राहीलेला कांताबाई सातारकर सह रघुवीर खेडकर यांचा लोकनाट्य यंदापासून या यात्रेत सादर होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.


संगमनेरच्या कवी अनंत फंदी यांना तमाशा कलेचे ‘आद्य’ म्हणून ओळखले जाते. त्याकाळी त्यांना पुण्यश्‍लोक आहिल्यादेवी होळकर यांनी वर्षासन तर बडोद्याच्या गायकवाड संस्थानाने पालखीचा मान दिला होता. संगमनेरात फुलत असलेल्या महाराष्ट्राच्या या लोककलेला त्यावेळी राजाश्रय मिळाला. कवी अनंत फंदींची ती परंपरा जोपासणार्‍या रघुवीर खेडकर यांना मात्र तमाशा जगवण्यासाठी पदोपदी संघर्ष करावा लागतोय. संगमनेरचे नाव राज्यासह देशात पोहोचवणार्‍या खेडकरांना मात्र ना राजाश्रय मिळाला ना लोकाश्रय. त्यांची हिच खंत श्री लक्ष्मणबाबांच्या यात्रेतील साडेपाच दशकांची पंरपरा मोडतांना स्पष्टपणे दिसून आली आहे.

Visits: 112 Today: 1 Total: 1100612

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *