पोलिसांचा सहभाग असलेला देशातील एकमेव ग्रामोत्सव! पोलीस निरीक्षक भगवान मथुरे; जीवनात मिळालेला सर्वोच्च बहुमान..

श्याम तिवारी, संगमनेर
सकाळी सातची वेळ.. पोलीस कर्मचार्यांची लगबग.. चक्क पोलीस ठाण्याच्या आवारात बॅण्डवर वाजवणार्या भक्तीगीतांमुळे प्रसन्न बनलेले वातावरण.. अचानक शहर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांचे संपूर्ण शासकीय पेहरावात मात्र डोक्यावर भगवा फेटा बांधून झालेले आगमन.. आणि रंगीबिरंगी गोंडे, सोनेरी कडा अशा शाहीथाटात सजवलेला भगवा ध्वज हाती घेतलेल्या पोलीस कर्मचार्याची धावपळ.. प्रभारी अधिकार्यांकडून ध्वजाच्या स्वीकार आणि नंतर वाजत-गाजत पोलिसांनीच काढलेली भगव्या ध्वजाची शोभायात्रा.. हा सोहळा पहिल्यांदाच पाहणार्याच्या डोक्याला मुंग्या याव्यात.. स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजतागायत गेली 94 वर्ष अखंडपणे सुरु असलेली, गावच्या उत्सवात पोलिसांनाही सहभागी करुन घेणारी ही जगावेगळी परंपरा बहुधा देशभरात संगमनेर वगळता अन्यत्र नसावी.

संगमनेरच्या सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात सर्वात मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेला संगमनेरचा ‘रथोत्सव’. धर्म-पंथ, जात-पात असा कोणताही झेंडा हाती घेण्याचा अधिकार नसलेल्या, धर्म निरपेक्ष वागण्याची कडवी शिस्त असलेल्या पोलिसांकडून मिरवणुकीने वाजत-गाजत जावून स्वतःच्या हाताने विजय रथावर ‘ध्वज’ लावण्याची आणि त्यानंतरच रथोत्सवाला सुरुवात होणारी ही साडेनऊ दशकांची परंपरा. सन 1927 ते 1929 अशा सलग तीन वर्ष रंगारगल्लीतील भडंगबुवांच्या मशिदीपासून रथा पुढे नेता येणार नाही अशी भूमिका घेत वारंवार रथयात्रेत अडथळा निर्माण करणार्या ब्रिटीश राजवटीला धडा शिकवण्यासाठी संगमनेरच्या झुंझार महिलांनी 23 एप्रिल, 1929 रोजी ब्रिटीशांचा बंदी हुकूम मोडून पाचशे सशस्त्र पोलिसांचे कडे तोडीत मारुतीरायाची तसबीर रथात नेवून ठेवली.

विजेच्या चपळाईने घडलेल्या या प्रसंगाचा बोध होण्यापूर्वीच जमलेल्या शेकडो महिलांनी ‘महाबली हनुमान की.. जय!’ असा घोष करीत चंद्रशेखर चौकात ब्रिटीश पोलिसांनी जागेवरच अडवलेल्या रथाच्या चाकांना गती दिली. इतका मोठा सशस्त्र बंदोबस्त असतानाही घडलेल्या या नामुष्कीजनक प्रकाराने अपमानित झालेल्या अधिकार्यांनी त्यानंतर तत्काळ रंगारगल्लीत बैलगाड्या, सरकारी वाहने यांचे अडथळे उभारुन सोमेश्वर मंदिराजवळ पुन्हा रथ अडवला. यावेळी पोलीस आणि नागरिक यांच्यात प्रचंड हमरातुमरी माजली. गुलाल-बत्ताशे, खडीसाखर-खोबरे यांचा मारा सुरु झाला, मात्र पोलीस काही माघार घेईनात. तब्बल दोन महिने हा खेळ सुरु राहिला. या कालावधीत संगमनेरातील अबालवृद्ध रंगारगल्लीत जमा होत आणि रथात विराजमान मारुतीरायाची सकाळ-संध्याकाळ पूजा अर्चना, भजन-संकीर्तन करीत. इतका कालावधी लोटूनही लोकं ऐकत नाहीत, उलट दिवसोंदिवस रथासमोरील जमाव वाढतोय असे चित्र पाहून प्रशासन हादरले.

अखेर दोन महिन्यांनी पोलिसांनी सपशेल माघार घेत पारंपरिक मार्गाने रथ पुढे नेण्यास परवानगी दिली. मात्र संगमनेरकर दरवर्षीच्या या आडकाठीला वैतागलेले असल्याने जो पर्यंत रथयात्रेत पुन्हा अडथळा आणणार नाही अशी लेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत रथोत्सव सुरु होणार नसल्याची भूमिका संगमनेरकरांनी घेतली. गोंधळलेल्या ब्रिटीश पोलिसांनी तत्काळ ती मान्य करीत सरकारकडून यापुढे कधीही हनुमान जन्मोत्सवाच्या रथात अडथळा आणला जाणार नाही, उलट या उत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी शासनाच्यावतीने पोलीस दलाचे प्रमुख अधिकारी वाजतगाजत सन्मानाने भगवा ध्वज घेवून येतील व स्वहस्ते रथावर चढवून मारुतीयाची आरती करतील, रथाच्या पारंपरिक मार्गात कोणताही बदल केला जाणार नाही अशा आशयाच्या कलमांचा समावेश असलेला लेखी करारही करुन देण्यात आला. इतका मोठा बंदोबस्त असतानाही संगमनेरच्या महिलांनी आपल्या शक्तीचे आणि पुरुषांनी भक्तीचे प्रदर्शन घडविल्याबद्दल प्रातिनिधीक स्वरुपात झुंबराबाई अवसक (शिंपी) या महिलेचा साडीचोळी देवून सन्मान केला गेला.

ब्रिटीशांना देशातून जावून 75 वर्षे तर ही परंपरा सुरु होवून तब्बल 94 वर्षांचा काळ उलटला आहे. मात्र आजही त्यावेळी सुरु झालेली ही परंपरा जोपासली जाते. गेल्या वर्षी गोवंशाच्या रक्ताने हात माखलेल्या पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांचा हस्ते आलेला ध्वज स्वीकारणार नाही अशी भूमिका श्रीराम नवमी व हनुमान जयंती उत्सव समितीने घेतली होती. त्यामुळे या परंपरेत गेल्यावर्षी पहिल्यांदा एका दुय्यम अधिकार्याच्या हस्ते रथावरील ध्वज चढवण्यात आला. मात्र तो ध्वजही महिला पोलीस उपनिरीक्षक निकिता महाले यांनी वाजत-गाजत आणल्याने व विधीवत रथावर चढवल्याने या पराक्रमी परंपरेत रथ ओढण्यासह एका महिला पोलीस अधिकार्याच्या हस्ते ध्वज चढवण्याचाही इतिहास नोंदविला गेला.

प्रत्येक ठिकाणची काहीतरी संस्कृती असणे, परंपरा असणे ही समान गोष्ट आहे. पण, पोलिसांनीच एका धर्माचे प्रतीक असलेला ध्वज वाजतगाजत न्यायचा आणि तो सन्मानपूर्वक रथावर चढवून मारुतीरायाची आरती करायची, त्याशिवाय हा उत्सवच सुरु होत नाही हा इतिहास माझ्यासाठी खूप रोमांचकारी ठरला. गेल्या 32 वर्षांच्या माझ्या पोलीस सेवेत मी अनेक पोलीस ठाण्यांमध्ये काम केले, मात्र संगमनेरातील ही ऐतिहासिक परंपरा खूप पराक्रमी पार्श्वभूमीतून सुरु झाली आहे. या परंपरेचा भाग होण्याचे सौभाग्य माझ्या जीवनात मिळालेला सर्वोच्च बहुमान आहे.
– भगवान मथुरे
पोलीस निरीक्षक, संगमनेर शहर

