संगमनेरच्या रथोत्सवात अभूतपूर्व उत्साह! जागोजागी जंगी स्वागत; अबालवृद्धांच्या गर्दीतून घडले ग्रामोत्सवाचे दर्शन

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या अनेक शतकांपासून सुरु असलेल्या संगमनेरच्या मोठ्या मारुतीचा जन्मोत्सव यंदा अभूतपूर्व उत्साहात साजरा झाला. परंपरेनुसार सकाळी पोलीस दलाच्यावतीने येणारा मानाचा ध्वज रथावर चढल्यानंतर महिलांनी रथाचे दोर ओढून रथोत्सवाला सुरुवात केली. पारंपरिक मार्गावरुन निघालेल्या या शाही शोभायात्रेत विविध पारंपरिक वाद्यांचा समावेश होता. मिरवणूक मार्गावर काढण्यात आलेल्या रांगोळ्या, जागोजागी होणारे स्वागत आणि दर्शनासाठी संपूर्ण मार्गावर उसळलेली गर्दी यामुळे यावर्षीचा रथोत्सव अभूतपूर्व ठरला. दुपारी दोनच्या सुमारास रथ पुन्हा चंद्रशेखर चौकात पोहोचला आणि रथोत्सवाची सांगता झाली.

संगमनेरात हनुमान जन्मोत्सवानिमित्त निघणार्या रथाला मोठा पराक्रमी इतिहास आहे. गेल्या अनेक शतकांपासून या मंदिरात हा उत्सव साजरा होतो आणि त्या निमित्त रथयात्रेसह विविध धार्मिक कार्यक्रम होतात. बालमशेठ परदेशी व त्यानंतर कुंदनसिंह परदेशी, विनय गुणे, सोमनाथ पराई, कमलाकर भालेकर यांनी आजतागायत हा वारसा जोपासला आहे. त्यात यावर्षीच्या उत्सवाची नोंद झाली असून अतिशय दिमाखदार पद्धतीने आजची शोभायात्रा काढली गेली. संपूर्ण मिरवणूक मार्गावर नवजात बालकांना मारुतीरायाच्या चरणी टेकवण्यासाठी झालेली गर्दी, रथाच्या चाकावर फुटलेले हजारों नारळ, रुई आणि फुलांच्या अगणिक हारांमागे दडलेले मारुतीराया आणि मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी तरुणाई आणि अबालवृद्ध यामुळे ही मिरवणूक अभूतपूर्व ठरली.

मिरवणुकीच्या मार्गावर जागोजागी रथाचे जोरदार स्वागत होत होते, सुवासिनी रथात विराजमान मारुतीरायाची आरती करीत होत्या. अनेक ठिकाणी मिरवणुकीत भाविकांसाठी नाश्ता, थंडपेय व पाण्याची व्यवस्था केली होती, कोणी मिरवणुकीत फिरुन सर्वांना चॉकलेट, पाण्याच्या बाटल्याही देत होते. एकंदरीत मोठ्या कालावधीनंतर संगमनेरच्या या ऐतिहासिक रथोत्सवात गावकर्यांची संख्या लक्षणीय दिसल्याने यंदाचा हनुमान जन्मोत्सव अभूतपूर्व ठरला. पोलीस उपअधीक्षक संजय सातव, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वीज मंडळाचे डझनभर कर्मचारी रथयात्रे सोबत राहून टप्प्याटप्प्याने वीज प्रवाह खंडीत करीत होते व पुन्हा पूर्ववत करीत होते.
