वादग्रस्त फलक तातडीने हटवावा, अन्यथा 10 डिसेंबरला आम्ही काढू! भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांचा साई संस्थानला पत्रातून इशारा
नायक वृत्तसेवा, शिर्डी
साईबाबा संस्थानने भक्तांसाठी पोषाखासंदर्भात लावण्यात आलेला वादग्रस्त फलक तातडीने हटवावा, अन्यथा 10 डिसेंबरला लोकशाही मार्गाने आम्ही शिर्डीमध्ये येऊन हा फलक काढू, असा पुन्हा एकदा इशारा भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी संस्थानला दिला आहे.
याबाबत देसाई यांनी संस्थानाला तसे पत्र पाठवले आहे. तसेच शिर्डीतून आम्हांला अनेक धमक्या, काळे फासण्याची भाषा अनेकांकडून येत असल्यामुळे तेथे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास व आमच्या जीविताचे काही बरेवाईट झाल्यास त्यास साई संस्थान जबाबदार राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले असून त्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरात दर्शनासाठी येणार्या भाविकांनी भारतीय पोषाखात यावे, अशी विनंतीवजा सूचना साईबाबा संस्थानने भाविकांना केली आहे. यावरून मात्र चांगलाच वाद पेटला आहे. भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी तर थेट हा फलक संस्थानने काढला नाही तर आम्ही येऊन काढू, असा इशाराच दिला होता. मात्र अद्याप हा फलक हटवण्यात आला नाही. त्यामुळे आम्ही 10 डिसेंबरला हा फलक काढण्यास येणार असल्याचे देसाई यांनी लेखी पत्रच साई संस्थानला पाठवले आहे. या पत्राची प्रत देसाई यांनी राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, अहमदनगरचे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना देखील पाठवली आहे.
देसाई यांनी पत्रात म्हंटले आहे की, शिर्डी येथे देश-विदेशातून हजारो भक्त दररोज साईबाबांच्या दर्शनाला मोठ्या श्रद्धेने येत असतात. दर्शनाला येत असताना मंदिराचे पावित्र्य आपण कसे राखावे, याचे भान सर्व भक्तांना असते. शिर्डी संस्थानच्या माध्यमातून सर्व भक्तांनी भारतीय वेशभूषेतच मंदिरात दर्शनासाठी यावे, असा फलक लावण्यात आलेला आहे. हा फलक जाहीरपणे लावल्यामुळे तसेच त्यावर हा नियम लिहिल्यामुळे जरी संस्थानचे म्हणणे असेल की हे फक्त आवाहन आहे, तरी ती एक सक्ती आणि बळजबरीच आहे, असं या पत्रात नमूद केलं आहे. आपल्या देशात संविधान आहे आणि संविधानानुसार सर्वाना अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. कोणी काय बोलावे आणि कसे कपडे घालावेत हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आणि अध्यात्मिक ठिकाणी म्हणजेच मंदिरांमध्ये कोणीही इतरांना लज्जास्पद वाटेल असे कपडे कोणीही घालत नाही. यामुळे हा फलक लावण्यामागे नेमकी काय मानसिकता आहे किंवा काय अर्थकरण लपले आहे? हे सुद्धा समजून येणे गरजेचे आहे, असंही या पत्रात मांडलं आहे.
श्रद्धा आणि सबुरी साईबाबांनी दिलेली शिकवण आहे, आणि आम्ही सुद्धा साईबाबांचे भक्त आहोत. त्यामुळेच आपल्याला विनम्रपणे आम्ही विनंती करत आहोत की या फलकामुळे जर वाद होत असेल आणि भक्तांचा व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार साई संस्थानाच्या माध्यमातून हिरावून घेतला जात असेल, तर हा फलक आपण तातडीने काढावा, अशी मागणी या पत्रात केली आहे. अशा पद्धतीचा वादग्रस्त आणि ड्रेस कोड संदर्भात सक्ती करणारा फलक लावल्यामुळे संस्थानवर कायदेशीर कारवाई सुद्धा होऊ शकते. त्यामुळे संस्थानाने लावलेला आवाहनाचा फलक तातडीने काढावा. अन्यथा साई संस्थानने यात पुढाकार घेऊन मार्ग न काढल्यामुळे आम्हाला 10 डिसेंबर रोजी लोकशाही मार्गाने शांततेत कोरोनाचे सर्व नियम पाळून दुपारी एक वाजता शिर्डीत येऊन फलक काढावा लागेल याची नोंद घ्यावी. तसेच शिर्डीतून आम्हाला अनेक धमक्या, काळे फासण्याची भाषा अनेकांकडून येत असल्यामुळे तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास व आमच्या जीविताला काही बरेवाईट झाल्यास त्यास साई संस्थान जबाबदार राहील, असेही देसाई यांनी पत्रात स्पष्ट केले आहे.