येत्या सोमवारपासून जिल्ह्यालाही मिळणार ‘अनलॉक’ची सवलत? ऑक्सिजन खाटांची संख्या चाळीस टक्क्याहून खाली आल्यास जिल्हाधिकारी घेणार निर्णय
नायक वृत्तसेवा, संगमनेर
आजपासून राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये अत्यावश्यकसह अन्य व्यवसाय सुरु करण्यास परवानगी देण्यात आली असून दहा जिल्ह्यांमध्ये मात्र यापूर्वीच्या आदेशानुसार निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत ज्या जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर दहा टक्क्यांपेक्षा अधिक आहे किंवा तेथील चाळीस टक्क्यापेक्षा अधिक ऑक्सिजन खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत अशा जिल्ह्यांना कोणतीही सवलत मिळालेली नाही, त्यात अहमदनगर जिल्ह्याचाही समावेश आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर सध्या 8.46 टक्के असला तरीही जिल्ह्यातील 50 टक्के ऑक्सिजन खाटांवर रुग्ण असल्याने जिल्ह्यात केवळ अत्यावश्यक सेवांना मर्यादीत कालावधीत सुरु ठेवण्यास परवानगी आहे. मात्र या गोष्टींचा दर आठवड्याच्या शेवटी शुक्रवारी आढावा घेवून त्यात बदल झाल्यास अन्य जिल्ह्यांप्रमाणे सवलत देण्याचे अधिकारही आपत्ती व्यवस्थापन समितीला देण्यात आल्याने पुढील आठवठ्यात जिल्ह्यातही अनलॉकची सवलत मिळण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने यापूर्वी जाहीर केलेल्या लॉकडाऊनची मुदत 30 मे रोजी संपली. त्यानुसार राज्य मंत्रीमंडळाने टास्क फोर्स सोबत सल्लामसलत करुन कोणत्या जिल्ह्यांमध्ये व्यवहारासंबंधी वेळेच्या सवलती देता येतील याबाबत निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील ज्या जिल्ह्यांमधील रुग्ण समोर येण्याची सरासरी गती 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे आणि तेथील एकूण उपलब्ध ऑक्सिजन खाटांपैकी 40 टक्क्यांपेक्षा कमी खाटांवर रुग्ण आहेत अशा जिल्ह्यांना आजपासून (ता.1) मोठा दिलासा देण्यात आला असून तेथील अत्यावश्यकसह अन्य व्यवसाय सुरु करण्यासही परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबतच राज्यातील अशा 21 जिल्ह्यांमध्ये व्यवहार सुरु ठेवण्यासाठी वेळेची मर्यादाही वाढवून देण्यात आली असून आजपासून अशा जिल्ह्यातील व्यवहार सकाळी 7 ते दुपारी 2 वाजेपर्यंत खुले राहणार आहेत.
अहमदनगर जिल्ह्याच्या सद्यस्थितीबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली सोमवारी (ता.31) समितीची बैठक पार पडली. यावेळी राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दिलेल्या निर्देशांवर सांगोपांग चर्चा होवून शनिवारी (29 मे) संपणार्या आठवड्यातील कोविडचा पॉझिटिव्ह दर व त्यादिवशी जिल्ह्यातील एकूण ऑक्सिजन खाटांवर उपचार घेणार्या रुग्णांची संख्या यांचा आढावा घेण्यात आला. या संदर्भात शासनाने 30 मे रोजी दिलेल्या निर्देशानुसार अहमदनगर महापालिका क्षेत्राची लोकसंख्या 10 लाखांपेक्षा कमी असल्याने या क्षेत्रासह संपूर्ण जिल्हा एकच प्रशासकीय घटक म्हणून गणला गेला असून जिल्ह्याला एकच आदेश लागू होणार आहे.
त्या अनुषंगाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत 29 मे रोजीच्या जिल्ह्यातील कोविड स्थितीच्या आकडेवारीवर चर्चा करण्यात आली. त्यातून जिल्ह्यातील रुग्ण समोर येण्याचा सरासरी वेग नियमानुसार 10 टक्क्यांपेक्षा कमी म्हणजे 8.46 टक्के असला तरीही जिल्ह्यातील उपलब्ध असलेल्या ऑक्सिजन खाटांवरील रुग्णांची संख्या मात्र 40 टक्क्यांहून खूप अधिक म्हणजे 50 टक्के असल्याने ‘ब्रेक द चेन’चे नवीन नियम जिल्ह्याला लागू होत नसल्याचा निष्कर्ष या बैठकीतून निघाला. त्या अनुषंगाने जिल्हाधिकार्यांनी सोमवारी रात्री उशीराने नवीन आदेश जारी करतांना जिल्ह्याला कोणतीही सवलत दिलेली नाही. यापुढेही जिल्ह्यात फक्त अत्यावश्यक सेवांना सकाळी 7 ते 11 या कालावधीत सवलत देण्यात आली असून हा आदेश अहमदनगर महापालिका क्षेत्रासह संपूर्ण जिल्ह्याला लागू करण्यात आला आहे.
त्यासोबतच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीने जिल्ह्यातील कोविड स्थितीबाबत दर आठवड्याच्या शेवटी म्हणजे दर शुक्रवारी जिल्ह्याचा पॉझिटिव्ह दर आणि उपलब्ध ऑक्सिजन खाटांची संख्या यांचा आढावा घेवून या दोन्ही गोष्टी शासनाच्या ‘बेक द चेन’ अंतर्गत दिलेल्या निर्देशानुसार कमी झाल्यास त्यापुढील सोमवारपासून जाहीर केलेल्या सवलती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली येत्या शुक्रवारी (4) जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक होईल. त्या बैठकीत त्या दिवसापर्यंतचा जिल्ह्यातील कोविडचा पॉझिटिव्ह दर व उपलब्ध ऑक्सिजन खाटांचा आढावा घेतला जाईल व राज्य सरकारच्या निर्देशानुसार त्यात बदल झाल्यास अहमदनगर जिल्ह्यातही येत्या सोमवारपासून (ता.7) अन्य व्यवसाय सुरु ठेवण्यासह वाढीव वेळेची सवलत दिली जाईल अशी माहिती संगमनेरचे उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ.शशीकांत मंगरुळे यांनी दिली.
‘ब्रेक द चेन’ अंतर्गत राज्य सरकारने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांच्या निकषांत जिल्ह्यातील ऑक्सिजनच्या खाटांवर अधिक रुग्ण असल्याने जिल्ह्याला अनलॉकच्या सवलती मिळालेल्या नाहीत. मात्र त्याबाबत आठवड्याच्या शेवटी दर शुक्रवारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून आढावा घेवून निर्णय घेतला जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील रुग्ण समोर येण्याचा वेग नियमानुसार 10 टक्क्यांच्या कमी आहे, मात्र 50 टक्क्यांहून अधिक ऑक्सिजन खाटांवर रुग्ण असल्याने सध्यातरी जिल्ह्यात सकाळी 7 ते 11 यावेळेत केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. मात्र शुक्रवारी परिस्थितीनुरुप यात बदल होण्याची शक्यता आहे.
– डॉ.शशीकांत मंगरुळे
उपविभागाीय अधिकारी, संगमनेर