मवेशी आश्रमशाळेचा बोगस कारभार आला चव्हाट्यावर सुनीता भांगरेंनी मंगळवारपासून आमरण उपोषण करण्याचा दिला इशारा

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील राजूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत असलेल्या मवेशी येथील इंग्रजी व मराठी माध्यमाच्या शासकीय आश्रमशाळेचा बोगस कारभार चव्हाट्यावर आला आहे. शासन करोडो रुपये खर्च करुनही विद्यार्थ्यांना साध्या मुलभूत सुविधाही मिळत नसल्याने चांगलाच संताप व्यक्त होत आहे.

मवेशी आश्रमशाळेत पहिले ते बारावीपर्यंत तब्बल बाराशे विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. गेल्या तीन महिन्यांपूर्वी रवीना लहामटे या विद्यार्थिनीचा वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या तथा अगस्ति सहकारी साखर कारखान्याच्या संचालिका सुनीता भांगरे यांनी नुकतीच भेट दिली. त्यावेळी तेथील कामाचा आणि सुविधांचा आढावा घेत दुरावस्था दिसल्याने अधिकारी, मुख्याध्यापक व शिक्षकांची चांगलीच झाडाझडती केली.

या आश्रमशाळेतील मुला-मुलींचे वसतिगृह पाहिले असता स्वच्छतागृहाची दयनीय अवस्था दिसली. कोपर्यात कचरा साचलेला होता. एवढेच नाही तर मुलींच्या शौचालयाला चक्क दरवाजेच नसल्याची खेदजनक बाब समोर आली. शासन आश्रमशाळांसाठी करोडो रुपयांचा खर्च करत असल्याचे सांगते, इथे मात्र केवळ कर्मचार्यांच्या पगारावरच उधळपट्टी होत असल्याचेच यानिमित्तने दिसून आले. या भेटीदरम्यान काही विद्यार्थ्यांशी चालू वर्गामध्ये संवाद साधला असता नववीच्या विद्यार्थ्याला चक्क मराठी देखील वाचता येत नसल्याचा गंभीर प्रकारही दिसला. या सर्व बाबी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी राजेश पाटील यांच्या निदर्शनास आणून देत संबंधित मुख्याध्यापकांना सोमवारपर्यंत निलंबित न केल्यास मंगळवारपासून प्रकल्प कार्यालयावर विद्यार्थी व पालकांना घेऊन आमरण उपोषण करणार असल्याचा इशाराही सुनीता भांगरे यांनी दिला आहे.
