पिंपरी निर्मळमध्ये लाळ्या-खुरकूताने आणखी तीन जनावरे दगावली पशुधन विभागाने तातडीने औषधे व मदत देण्याची पशुपालकांची मागणी

नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील जिरायत भागातील पिंपरी निर्मळ येथील अनेक गायींना लाळ्या-खुरकूताचा प्रार्दुभाव झाला असून मृत जनावरांची संख्या 10 वरून 13 वर गेली आहे. पशुधन विभागाने तातडीने गावातील बाधित गोठ्यांना भेटी देवून उपचारांसाठी आवश्यक औषधे व मदत द्यावी, अशी मागणी पशुपालकांमधून होत आहे.

राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ हे गाव निळवंडेच्या जिरायती टापूतील आहे. शाश्वत पाटपाण्याची सोय नसल्याने शेतीला जोडधंदा म्हणून पशुपालन व दुग्ध व्यवसाय केला जातो. गावात जवळपास चार हजारांवर लहान-मोठे पशुधन असून जवळपास पंधरा हजार लिटर दूध उत्पादन केले जाते. मात्र गेल्या काही दिवसांपासून गावात लाळ्या-खुरकूताच्या आजाराने थैमान घातले आहे. गावातील बहुतांश गोठ्यांमध्ये या आजाराचा संसर्ग झाला आहे. या आजारामुळे गावातील शेतकर्‍यांची जवळपास तेरा लहान-मोठी जनावरे दगावली आहेत. या आजारावरील औषोधोपचारांचा खर्चही मोठा आहे.

पशुधन आजारी पडल्याने दूध उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम झाला असून मोठ्या औषधोपचाराच्या खर्चाबरोबर दूध उत्पादनाचा फटकाही शेतकर्‍यांना बसत असल्याने त्यांना दुहेरी आर्थिक फटका बसत आहे. बाभळेश्वर उपकेद्रांचे पशुधन अधिकारी डॉ. भालेराव यांनी गावातील बाधित गोठ्यांना भेटी दिल्या. मात्र उपचारासाठी आवश्यक औषधे आमच्याकडे नसल्याचे सांगितले. यामुळे मृत जनावरांची संख्या वाढत असल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढत आहे. प्रशासनाकडून शेतकर्‍यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी व पशुपालकांमधून होत आहे.

Visits: 11 Today: 1 Total: 79826

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *