बुधवारच्या धक्क्यानंतर संगमनेरकरांना आज मिळाला काहीसा दिलासा..! शहरातील अवघ्या सहा जणांसह तालुक्यातील एकोणचाळीस जणांचे अहवाल पॉझिटिव्ह..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून तालुक्यातील कोविड प्रादुर्भावाचा वेग काहीसा मंदावल्याचे चित्र दिसत असताना, बुधवारी शहरासह तालुक्यातील रुग्ण संख्येत वाढ झाल्याने संगमनेरकरांचा अपेक्षाभंग झाला होता. मात्र आज तालुकावासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. शहरातील सरासरी रुग्णसंख्येत मोठी घट होऊन आज अवघ्या सहा जणांचे तर तालुक्यातील तेहतीस जणांचे अहवाल पॉझिटिव आले आहेत. आज रॅपिड अँटीजेन चाचणीतून 25 तर खासगी प्रयोगशाळेतून 14 जणांचे अहवाल प्राप्त झाले. एकूण रुग्ण संख्येत आज 39 जणांची भर पडल्याने संगमनेर तालुका 36 व्या शतकाच्या दारात 3 हजार 596 वर जाऊन पोहोचला आहे.
सप्टेंबरमध्ये विविध कारणांनी तालुक्यातील कोविडचा प्रादुर्भाव वाढल्याचे दिसत होते. एकीकडे ग्रामीण भागातील संक्रमण वाढत असताना, दुसरीकडे शहरातील रुग्णसंख्येला मात्र ओहोटी लागल्याचेही निरीक्षणावरून लक्षात आले. गेल्या महिन्यात प्रमाणे या महिन्याच्या सुरुवातीला शहरासह काही प्रमाणात ग्रामीण भागालाही दिलासा मिळण्यास सुरुवात झाली. ती मंगळवार पर्यंत कायम होती. मात्र कालच्या बुधवारी शहरासह तालुक्यातील रुग्णसंख्या अचानक वाढून आकडा वर गेल्याने संगमनेरकरांच्या चिंता वाढल्या होत्या. मात्र कालची उसळी आज शमल्याचे चित्र दिसल्याने संगमनेरकर काहीसा सुखावला आहे.
आज शहरातील सहा जणांचे स्राव चाचणी अहवाल पॉझिटिव प्राप्त झाले. त्यात शहरातील जनतानगर परिसरातील 37 वर्षीय तरुणासह 35 वर्षीय महिला, मालदाडरोड परिसरातील 74 वर्षीय महिला, कुरणरोडवरील 35 वर्षीय तरुण, मारवाडी गल्लीतील 60 वर्षीय इसम, गणेश नगर मधील 44 वर्षीय महिला व संगमनगर मधील 50 वर्षीय इसमाचा समावेश आहे. त्यासोबतच तालुक्यातील 33 जणांचे अहवालही आज पॉझिटिव्ह प्राप्त झाले. त्यात आश्वी खुर्द मधील 73 वर्षीय इसमासह 67 वर्षीय महिला, झरेकाठी येथील 51 वर्षीय इसम, हंगेवाडी येथील 32 वर्षीय महिलेसह 20 वर्षीय तरुण, रहिमपूर येथील 50 वर्षीय इसम,
जोर्वे येथील 68, 43 व 40 वर्षीय महिलेसह 15 वर्षीय मुलगा, उंबरी बाळापूर येथील 60 वर्षीय इसमासह 23 वर्षीय तरुण, प्रतापपूर येथील 28 वर्षीय महिला, कोकणगाव येथील 67 वर्षीय इसम, तळेगाव दिघे येथील 50 वर्षीय महिला, साकुर येथील 51 वर्षीय महिलेसह 38 वर्षीय तरुण, निमोण मधील 19 वर्षीय तरुण, घुलेवाडी येथील 55, 27 व 23 वर्षीय महिला, निळवंडे येथील तीस वर्षीय तरुण, सोनुशी येथील 63 वर्षीय महिला, दाढ बुद्रुक येथील 45 वर्षीय तरुण, वडगाव लांडगा येथील 45 वर्षीय तरुण,
तसेच, आज शहरालगतच्या सुकेवाडी परिसरात कोविडचा मोठा संसर्ग झाल्याचे दिसून आले. येथील सात जणांचे अहवाल एकाच वेळी पॉझिटिव प्राप्त झाले आहेत. त्यात 40, 21 व 17 वर्षीय तरुणांंसह 46, 40 व 38 वर्षीय महिला तसेच 12 वर्षीय बालिका संक्रमित असल्याचे आढळून आले आहे. तालुक्यातील तेहतीस व शहरातील सहा अशा एकूण एकोणचाळीस जणांची आजही भर पडल्याने तालुक्यातील बाधितांची संख्या 36 व्या शतकाच्या दारात 3 हजार 596 वर जाऊन पोहोचली आहे.