कोपरगाव शहरात वाहतुकीचे वाजले ‘तीन तेरा’!
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
शहरातील मुख्य रस्त्यांवर बेशिस्तपणे उभ्या केलेल्या वाहनांमुळे इतर वाहनांना जाण्यास मोठा अडथळा निर्माण होत आहे. परिणामी मुख्य मार्गावर वाहतुकीची कोंडी पहावयास मिळते आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे सोईस्कररित्या दुर्लक्ष होत असल्याने वाहतूक कोंडीला नागरिक पुरते हैराण झाले आहेत.
कोपरगाव शहरातील सुदेश चित्र मंदिर ते बस स्थानक या मुख्य रस्तावर चारचाकी वाहनचालक आपली वाहने रस्त्याच्या कडेला अथवा निम्म्या रस्त्यावरच उभी करून बाजारपेठेत खरेदीचा आनंद घेतात. मात्र त्यांच्या या बेशिस्तपणामुळे दुचाकीस्वार व पादचार्यांना मोठा मनःस्ताप सहन करावा लागत आहे. या गंभीर बाबीकडे वाहतूक पोलिसांचे मात्र सोईस्कररित्या दुर्लक्ष होत असल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे आता तरी वाहतूक पोलिसांनी जागे होऊन शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवावा, असा सूर नागरिकांसह वाहनधारकांतून उमटत आहे.