राज्य सहकारी शिखर बँक घोटाळा; अजित पवारांसह 69 जणांना ‘क्लीन चीट’

राज्य सहकारी शिखर बँक घोटाळा; अजित पवारांसह 69 जणांना ‘क्लीन चीट’
25 हजार कोटींच्या कथित घोटाळ्याप्रकरणी दाखल झाला होता गुन्हा
मुंबई, वृत्तसंस्था
महाराष्ट्र राज्य सहकारी (शिखर) बँकेच्या 25 हजार कोटी रूपयांच्या कथित घोटाळ्या प्रकरणी अजित पवार यांना दिलासा मिळाला आहे. मुंबई पोलिसांनी अजित पवार यांच्यासह 69 जणांना क्लीन चीट दिली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून न्यायालयालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणी अजित पवारांसह 69 जणांना क्लीन चीट मिळाली आहे.


25 हजार कोटी रूपयांच्या कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशी अहवालात तत्कालिन संचालक मंडळावर ठपका ठेवण्यात आला होता. त्यानंतर 2011 मध्ये रिझर्व्ह बँकेनं बरखास्त केलेल्या संचालक मंडळात अजित पवार, हसन मुश्रीफ यांसह बड्या नेत्यांचा समावेश होता. या कथित घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांसह 70 जणांवर कलम 420, 506, 409, 465 आणि 467 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. यामध्ये शिवसेनेच्या आनंदराव अडसूळ, भाजपात असलेल्या विजयसिंह मोहिते पाटील यांसह अन्य पक्षातील नेत्यांच्या नावाचा समावेश होता.


आघाडी सरकारच्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांच्या कुरघोडीच्या राजकारणाचे एक केंद्र म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचा वापर केला गेला. यामध्ये 25 हजार कोटींची कर्जे नियमबाह्य पद्धतीने वितरीत केल्याचा आरोप करण्यात आला होता. हा कथित घोटाळा उघड झाल्यानंतर 2011 मध्ये रिझर्व्ह बँकेने राज्य सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त केले होते आणि चौकशीचे आदेशही दिले होते. घोटाळ्यावेळी जे मंत्री आणि बँकेचे अधिकारी होते त्या सर्वांची नावे एफआयआरमध्ये दाखल करण्यात आली होती. अशा एकूण 300 च्यावर मंत्री आणि अधिकार्‍यांची नावे यात आहेत.


कसे झाले राज्य सहकारी बँकेचे नुकसान?
संचालक मंडळाने नाबार्डच्या सूचनांचे उल्लंघन केलं,
नऊ साखर कारखान्यांना 331 कोटींचा कर्जपुरवठा,
गिरणा, सिंदखेडा कारखाना, सूतगिरण्यांना 60 कोटींचे कर्ज,
केन अ‍ॅग्रो इंडियाची थकहमी रद्द झाल्याने 119 कोटींचा तोटा
24 साखर कारखान्यांना विनातारण कर्ज, 225 कोटींची थकबाकी
22 कारखान्यांकडील 195 कोटी रूपयांचे कर्ज असुरक्षित
लघु उद्योगांना दिलेल्या कर्जामुळे सव्वा तीन कोटींचे नुकसान
कर्जवसुलीसाठी मालमत्ता विक्री करूनही 478 कोटींची थकबाकी
खासगी पद्धतीने मालमत्ता विक्री, 37 कोटींचे नुकसान
8 थकबाकीदारांच्या मालमत्ता विक्रीत 6.12 कोटींचा तोटा.

Visits: 15 Today: 1 Total: 116955

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *