अवकाळीसह ढगाळ हवामानाचा पिकांना फटका शेतकर्यांवर महागडे औषधे फवारण्याची दुर्दैवी वेळ
![]()
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्यासह पठारभागात गेल्या दोन दिवसांपासून ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच ढगाळ हवामान राहत असल्याने कांदा, डाळिंब, द्राक्षासह इतर पिकांना मोठा फटका बसला आहे. यामुळे शेतकर्यांना महागडी औषधे खरेदी करुन फवारणी करण्याची वेळ आली आहे.

एकामागून एक संकटांनी शेतकर्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे. तरीही शेतकरी मोठ्या हिंमतीने पिके घेत आहे. सध्या शेतकर्यांनी मिळेल त्या भावाने गावठी कांद्याची रोपे खरेदी करून लागवडी केल्या आहेत. तर काही शेतकर्यांचे लाल कांदा काढण्याचे काम सुरू आहे. मात्र ठिकठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी बरसात केल्याने आणि सतत ढगाळ हवामान राहत असल्याने पिकांवर प्रतिकूल परिणाम झाला आहे. यामुळे शेतकर्यांना महागडी औषधे खरेदी करुन फवारणी करण्याची वेळ आली आहे.

यावर्षी मान्सूनने सुरुवातीला हुलकावणी दिली. दीर्घकाळ प्रतीक्षा केल्यानंतर समाधानकारक पाऊस झाला. यामुळे खरीप हंगाम बहरला. मात्र पुन्हा दमदार हजेरी लावल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. खरीपाची पिकेही हातात येतील की नाही अशी भीती निर्माण झाली होती. आता पुन्हा अवकाळी पाऊस पडत असल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. रब्बी पिके ऐन बहरात आलेली असताना अवकाळी आणि ढगाळ वातावरणामुळे प्रतिकूल परिणाम झाला आहे.

सध्याच्या वातावरणामुळे कांदा रोपांवर बुरशी आली आहे. यामुळे रोपांमध्ये मर होवू लागली आहे. त्याचबरोबर ढगाळ हवामानामुळे डाळिंब, द्राक्षे, कांदे आदी पिकांवर मव्याचा व करप्याचा प्रादुर्भाव वाढणार आहे.
– राहुल कान्होरे (प्रगतिशील शेतकरी-आंबीखालसा)
