निष्क्रिय पोलीस निरीक्षकांच्या बदलीनंतरही घरफोड्या सुरुच! पठारावरील गुन्हेगारी अनियंत्रित; खमक्या पोलीस अधिकार्‍याची नितांत गरज


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर तालुक्यातील विविध पोलीस ठाण्यात अतिशय निष्क्रिय कारकीर्द ठरलेल्या पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांची जिल्ह्याबाहेर बदली झाली. मात्र त्यांच्या निष्क्रियतेतून जन्माला आलेली पठारावरील गुन्हेगारी आजही कायम असून शुक्रवारी साकूरमधील हिरेवाडीत चोरट्यांनी उच्छाद घातला. या घटनेत नानू खेमनर यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी रोख रक्कम व चांदीच्या पट्ट्या असा एकूण 20 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबविला. नेहमीप्रमाणे घारगाव पोलिसांनी या घटनेची नोंद करीत सोपस्कार उरकले. गेल्या काही वर्षांपासून पठारभागात घडत असलेल्या एकामागून एक चोर्‍या व घरफोड्या आजही कायम असून त्यातील एकाही प्रकरणाचा उलगडा करण्यात घारगाव पोलीस सतत अपयशी ठरले आहेत.

याबाबत घारगाव पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदरची घटना शुक्रवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास साकूर नजीकच्या हिरेवाडीत घडली. या घटनेत चोरट्यांनी नानू खेमनर यांच्या बंद असलेल्या घराचे कुलूप तोडून घरात उच्छाद घातला. यावेळी घरातील सगळ्या सामानाची यथेच्छ उचकापाचक करीत चोरट्यांनी कपाटातील 14 हजार 500 रुपयांच्या रोख रकमेसह सुमारे पाच हजार रुपये किंमतीच्या चांदीच्या पट्ट्या असा एकूण 19 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल घेवून पोबारा केला. याप्रकरणी नानू खेमनर यांच्या फिर्यादीवरुन घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांची संगमनेर तालुक्यातील संपूर्ण कारकीर्द अतिशय निष्क्रिय आणि वादग्रस्त ठरली. घारगाव पोलीस ठाण्यात रुजू होण्यापूर्वी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत असताना तालुक्यातील गुन्हेगारी घटना, चोर्‍या, घरफोड्या आणि दरोड्याच्या अनेक घटना घडल्या. त्यांच्या येथील कार्यकाळात हप्तेखोरीसाठी वाळू तस्करांचा पोलिसांकडून पाठलाग सुरु असताना देवगावजवळ वाळूतस्करांचे वाहन निळवंडे धरणाच्या खोदलेल्या कालव्यात पडून त्यात तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर निमोण परिसरातील एका जोडप्याने आंतजातीय विवाह केल्याचे कारण पुढे करीत त्यांना बेकायदा पोलीस ठाण्यात बसवून ठेवले होते. त्यावरुन तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरुन त्यांची येथून बदलीही करण्यात आली होती.

या घटनेतून काहीतरी बोध घेवून ते आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करतील व त्यांना आपल्या जबाबदारीचीही जाणीव होईल असे अपेक्षित धरुन तत्कालीन पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यांना घारगाव पोलीस ठाण्याची सूत्रे सोपविली. मात्र तेथेही निष्क्रियतेचीच पाटी मिरवत त्यांनी गुन्हेगारांना अभय तर नागरिकांना धाकात ठेवण्याचे आपले सूत्र राबविले. त्यामुळे रवींद्र तायडे, वसंत तांबे यासारख्या अधिकार्‍यांनी बसवलेली घारगाव पोलीस ठाण्याची संपूर्ण घडी विस्कटली आणि संपूर्ण पठार भागातील गुन्हेगारी अनियंत्रित झाली.

पोलीस निरीक्षक पाटील यांच्या कारकीर्दीत पठारावरील डोळासण्याच्या काळ भैरवनाथांचे मंदिर दोनवेळा फोडले गेले, साकूरमध्ये गायीच्या कत्तलीवरुन जातीय तणाव निर्माण झाला, खून, चोर्‍या, दरोडे, घरफोड्या यासारख्या घटना तर नियमितपणे घडतच राहिल्या. मात्र त्यांच्या संगमनेर तालुका व घारगाव अशा दोन्ही पोलीस ठाण्यांमधील संपूर्ण कारकीर्दीत त्यांनी एकाही घटनेचा तपास लावला नाही. त्यांची हिच निष्क्रियता संगमनेर तालुका व घारगाव पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांसाठी पोषक बनल्याने या दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आजही गुन्हेगारांचे वर्चस्व दिसून येते. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी घारगावला खमक्या पोलीस निरीक्षकांची वर्णी लावण्याची मागणी आता पठारभागातून होत आहे.

Visits: 15 Today: 1 Total: 82668

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *