लष्कारातील जवानाचा तरुणीवर शिर्डीसह इतर ठिकाणी अत्याचार शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल; फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध

नायक वृत्तसेवा, शिर्डी
नाशिक जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तरुणीची शेजारी असलेल्या मैत्रिणीशी ओळख होती. तिच्या पतीकडे वारंवार येत असलेला व लष्करात नोकरीस असलेल्या तरुणाची ओळख झाली. त्यातून प्रेमसंबंध तयार झाले. त्याने तिला शिर्डीत व अज्ञात ठिकाणी घराचे कुलूप उघडून लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केल्याची फिर्याद संबंधित तरुणीने दिल्यावरून वाईबोती (ता. येवला) येथील आरोपी मनोज बाळासाहेब पवार याच्याविरुद्ध शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

यातील फिर्यादी तरुणी नाशिक जिल्ह्यातील रहिवासी आहे. तिच्या शेजारी एक मैत्रीण असून तिचा पती लष्करात नोकरीस आहे. तिच्या घरी तिचे येणे जाणे होते. त्या मैत्रिणीच्या घरी तिच्या पतीच्या ओळखीचा लष्करात नोकरीस असलेल्या मनोज पवार याचे येणे-जाणे होते. त्यातून सदर तरुणीची त्याच्याशी ओळख झाली होती. तो येथे वारंवार भेटीला येत होता. त्याचीही सदर फिर्यादी तरुणीशी ओळख झाली होती. जुलै 2022 दरम्यान ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. त्यांनी पुढे जाऊन आपल्या भ्रमणध्वनीचे आदान-प्रदान केले.
![]()
त्यातून व्हाट्सअॅपवर संपर्क वाढला. त्याने त्यातून तरुणीस लग्नाची मागणी घातली होती. तो वारंवार लग्नाबाबत विचारात होता. तो व मी एकाच जातीचे असल्याने व लष्करात नोकरीस असल्याने होकार कळवला होता. प्रेमाच्या आणि लग्नाच्या आणाभाका घेतल्याने आपण त्यावर विश्वास ठेवला होता. तो 8 फेब्रुवारी रोजी सुट्टीवर आला होता. त्याने आपल्या लग्नास घरचे लोक तयार नाहीत, अशी बतावणी करून आपल्याला पळून जाऊन लग्न करण्याचे आमिष दाखवले व आळंदी येथे जाऊन लग्न करू, असे आश्वासन दिले. त्यावर मनमाड रेल्वे स्थानकावर बोलावले होते. त्यानंतर शिर्डीत आणले. येथे काही दिवस राहू व नंतर आळंदी येथे जाऊन लग्न करू, असे आश्वासन दिले. मात्र येथील एका हॉटेलमध्ये नेऊन त्याने बळजबरीने आपल्याशी लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध ठेवले होते. त्यानंतर दुसर्या दिवशी ओमनी गाडी घेऊन आला व त्याने अन्य ठिकाणी रात्री 9 वाजेच्या सुमारास घेऊन गेला. मात्र त्या गाडीच्या काचा काळ्या असल्याने ते ठिकाण मला ओळखू आले नाही. तेथे एका घराचे कुलूप उघडून त्याने तेथे चार दिवस ठेऊन बाहेरून जेवणाचा डबा आणून लग्नाचे आमिष दाखवून माझ्यावर शारीरिक अत्याचार केला असल्याचे म्हटले आहे.

त्यानंतर 14 फेब्रुवारी रोजी चाकण येथे त्याच्या गायत्री नामक मैत्रीणीच्या घरी घेऊन गेला होता. घरी कागदपत्रे राहिले आहे ते मी घेऊन सायंकाळपर्यंत येतो असे सांगितले. मात्र तो वारंवार फोन करूनही आला नाही. आपण 15 फेब्रुवारीपर्यंत वाट पाहिली मात्र तो आला नाही. 17 फेब्रुवारीला आपण पुन्हा एकदा फोन केला असता त्याने मला फोन करून सांगितले की, माझ्या घरचे लग्नास तयार नसून मला तुझ्याशी लग्न करता येणार नाही. तू परत फोन करू नको असे म्हणाल्याने आपण घरी न जात पुन्हा शिर्डीस येऊन आरोपी मनोज पवार याच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे. त्यावरुन शिर्डी पोलिसांनी त्याच्यावर भादंवि कलम 376, 376 (2) (एन) 343, 347 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी पोलीस करीत आहेत.
