जलजीवन मिशन अंतर्गत शेवटच्या घटकाला पाणी देणार ः तनपुरे राहुरीमध्ये 14 गावांचा आढावा; अधिकार्‍यांना केल्या विशेष सूचना

नायक वृत्तसेवा, राहुरी
शासनाची जलजीवन मिशन पाणी योजना ही महत्वाकांक्षी योजना असून गावातील शेवटच्या घटकापर्यंत पाणी देण्याचा प्रयत्न असून त्यादृष्टीने तालुक्यातील 14 गावांचा आढावा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नुकताच पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत घेतला आहे. यासाठी सर्व्हे सुरु झाला असून सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडून अडचणी जाणून घेतल्या.

राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी शासनाच्या जल जीवन मिशन अंतर्गत तालुक्यातील बैठकीस पुरवठा योजनेत तालुक्यातील 14 गावांचा पाणी योजनेचा सर्व्हे सुरु असून त्याबाबत गावचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी व नागरिक यांनी बसून त्याबाबतच्या अडचणी समजून घेण्यासाठी पंचायत समितीच्या सभागृहात अडचणी समजून मार्गदर्शन केले. तालुक्यातील प्रादेशिक पाणी योजनेत गावे वगळता जी 14 गावे आहेत त्यातील ब्राह्मणगाव भांड, चांदेगाव, चिखलठाण, चिंचोली, जांभळी, करजगाव, कोळेवाडी, कुरणवाडी म्हैसगाव, कोल्हार खुर्द, सात्रळ, तांभेरे, वावरथ, टाकळीमियाँ या राहुरी-नगर-पाथर्डी व श्रीरामपूर मतदारसंघातील तालुक्यातील 32 गावांसह जी गावे येतात त्या गावांतील प्रत्येक माणसाला शेवटच्या घटकापर्यंत 2024 पर्यंत पाणी देण्याची केंद्र व राज्य सरकार यांची एकत्रित योजना असून यासाठी भरपूर प्रमाणात निधी प्राप्त होणार आहे.

या निधीचा योग्यप्रकारे विनियोग व्हावा यासाठी पंचायत समितीचे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी, अभियंता सर्व्हे करण्यासाठी येणार आहे. त्यांना त्याबाबत योग्य ते सहकार्य करून ज्या अडी-अडचणी आहेत त्या मांडव्यात, असे आवाहन राज्यमंत्री तनपुरे यांनी केले. सदरचा निधी प्रत्येक गावासाठी चालू आर्थिक वर्षातच उपलब्ध होऊन त्या कामाची निविदा सुद्धा निघणार असून प्रत्येक गावाने व्यवस्थित नियोजन करावे.

शासनाच्या या जलजीवन मिशन संदर्भात आत्तापर्यंत 4 ते 5 बैठका घेतल्या असून तालुक्यातील ज्या पाणी योजना प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेत समाविष्ट आहेत, त्या सोडून म्हणजे बारागाव नांदूरसह 14 गावे, कुरणवाडीसह 17 गावे, मुसळवाडीसह 9 गावे, दवणगावसह गावे तसेच ब्राह्मणीसह 6 गावे व वांबोरीसाठी स्वतंत्र पाणी योजनेचा प्रस्ताव असून त्याचा सर्व्हे सुरु आहे. या व्यतिरिक्त ज्या गावांचा या योजनेत समाविष्ट नाही, त्यांचा सर्व्हे सुरु आहे. तालुक्यातील मुळा धरणानजीकची वावरथ, जांभळी, शेरी, चिखलठाणसह काही गावे ही आदिवासी पट्ट्यातील असून त्यांना पाण्याचा उद्भभव असल्याने तिथे पाण्याचा स्तोत्र शाश्वत असल्याने अडचण नाही. पण तालुक्यातील तांभेरे येथील नागरिकांच्या पाण्याबाबत कायम असणार्‍या तक्रारी लक्षात घेऊन सर्व्हे करण्यात यावा. राज्यातील ज्या गावांच्या पाणी योजनांचे बिल थकीत असेल, त्या पाणी योजनांचा वीजेचा पुरवठा पूर्ववत सुरु करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेला असल्याने तालुक्यातील खडांबे खुर्द व बुद्रुक, धामोरी खुर्द व बुद्रुक, वरवंडी बाभुळगाव या 6 गावांचा गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पाणी पुरवठा बंद आहे, तो सुरु करण्याच्या सूचना अधीक्षक अभियंता महावितरण यांना भ्रमणध्वनीद्वारे दिल्या असल्याचे शेवटी राज्यमंत्री तनपुरे यांनी सांगितले.

या बैठकीस पंचायत समितीचे उपसभापती प्रदीप पवार, रवींद्र आढाव, बाळासाहेब लटके, जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुरेश निमसे, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, सहाय्यक गटविकास अधिकारी अनंत परदेशी, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे उपअभियंता एस. एस. गडढे, शाखा अभियंता डी. व्ही. परदेशी, प्रकाश पाटील, गणेश हारदे, रामदास बाचकर, डॉ.जालिंदर घिगे, डॉ.वारुळे, श्रीकांत बाचकर, प्रभाकर हरिश्चंद्रे, डॉ.सुभाष काकडे, डॉ.राजेंद्र बानकर, विष्णू निकम, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष धीरज पानसंबळ आदी उपस्थित होते.

Visits: 99 Today: 1 Total: 1099499

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *