बसस्थानकाच्या जागेवरुन संगमनेरच्या शिवजयंती उत्सवाला गालबोट! प्रशासनाकडून संवेदनशील क्षेत्र घोषित; पोलिसांचा मांडव पाहून दोन गट एकमेकांवर धावले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शिवजयंती सोहळा साजरा करण्यासाठी बसस्थानकाच्या आवारातील जागा मिळावी यासाठी सुरु झालेल्या शाब्दीक संघर्षाला आज वादाचे गालबोट लागले. गेल्याकाही वर्षात विविध सण-उत्सवांसह राजकीय व सामाजिक आंदोलनांचे केंद्र ठरलेल्या या परिसरात शिवमंदिर उभारण्यासाठी काँग्रेसकडून तर, किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यासाठी महायुतीकडून परवानगी मागण्यात आली होती. मात्र दोन्ही बाजूकडून एकाच जागेची मागणी झाल्याने प्रशासनाकडून मधला मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु असतानाच आज सकाळी पोलिसांनी सावलीसाठी टाकलेला मांडव सत्ताधारी गटाचाच असल्याचे समजून काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यातून महायुतीच्या कार्यकर्त्यांनीही वादग्रस्त ठिकाणी धाव घेत त्याला प्रत्यूत्तर दिल्याने गेल्या आठवड्याभरापासून सुरु असलेल्या सूप्त संघर्षाला थेट वादाचे गालबोट लागले. जागेच्या मागणीवरुन वाद निर्माण होत असल्याने प्रशासनाने आज सकाळीच हा संपूर्ण परिसर ‘संवेदनशील’ असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे या परिसरात बंदोबस्तही तैनात असल्याने दोनगट एकमेकांवर चालून जाताच पोलिसांनी हस्तक्षेप करीत दोघांना वेगळे करीत शांतता निर्माण केली. सध्या बसस्थानकावर मोठ्या संख्येने फौजफाटा तैनात असून कोणत्याही गटाला परिसरात प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.

नूतनीकरण झाल्यानंतर आकाराला आलेल्या संगमनेर बसस्थानकाच्या दर्शनीभागात वाहनतळासाठी मुबलक जागा सोडण्यात आल्याने विविध संघटनांसह राजकीय पक्षांसाठी हा परिसर आंदोलनं, सामाजिक व राजकीय कार्यक्रम आणि सोहळ्यांचे केंद्र ठरला आहे. त्यातच यंदा पहिल्यांदाच संगमनेर विधानसभा मतदारसंघात परिवर्तन घडल्याने शहरातील राजकीय संघर्षातही वाढ झाल्याने बसस्थानकाचा परिसर चांगलाच चर्चेत आला आहे. त्यातूनच यापूर्वी तीथीनुसारच्या शिवजयंती उत्सवावर शिवसेनेसह हिंदुत्त्ववादी संघटनांचा पगडा असतानाही काँग्रेसने पहिल्यांदाच हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेत याच परिसरात शिवमंदिराचा देखावा उभारण्यासाठी परवानगी मागितली होती. मात्र त्याचवेळी शिवसेनेकडूनही पारंपरिक मिरवणुकीसह बसस्थानकावर किल्ल्याची प्रतिकृती उभारण्यासाठी जागेची मागणी झाल्याने बसस्थानकाचा परिसर यंदाच्या शिवजयंती उत्सवाच्या केंद्रस्थानी आला आहे.

जागेची मागणी करुन जवळपास महिना उलटत असतानाही प्रशासनाकडून परवानगी बाबत कोणताही निर्णय होत नसल्याने कार्यकर्त्यांची चलबिचल वाढली होती. त्यामुळे गेल्या रविवारी (ता.9) आमदार सत्यजीत तांबे यांनी कार्यकर्त्यांसह बसस्थानकाच्या आवारात जावून शिवमंदिर उभारण्याच्या कामाचा शुभारंभ करताना नारळ वाढवल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त केला गेला. त्यातून वादंग निर्माण झाल्याने पोलिसांनी जो पर्यंत परवानगीचा निर्णय होत नाही, तो पर्यंत कोणालाही या परिसरात कोणतेही कृत्य करण्यास मनाई केली. या दरम्यान काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (ता.11) सायंकाळी प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांची भेट घेत मंदिर उभारण्यासाठी वेळ लागणार असल्याने परवानगीबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. त्यावर सायंकाळपर्यंत निर्णय घेतला जाण्याची शक्यता असताना प्रशासनाने आज (ता.12) सकाळी दोन्ही गटांना बसस्थानकाच्या परिसरातील जागा देण्यास असमर्थतता दाखवताना सदरचा परिसर संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केला.

प्रशासनाच्या या निर्णयानंतर वादग्रस्तभागातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली. त्यातच सध्या कडक उन्हाळा जाणवत असल्याने बंदोबस्तावरील पोलिसांसाठी प्रशासनाने त्याच ठिकाणी मांडवही घातला. मात्र हाच मांडव आजवर सूप्तपणे सुरु असलेल्या संघर्षात तेल ओतून गेला आणि त्यातून निर्माण झालेल्या गैरसमजातून संतप्त झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत महायुतीला परवानगी दिल्याबाबत आगपाखड करण्यास सुरुवात केली. सदरचा प्रकार महायुतीच्या कार्यकर्त्यांना समजल्यानंतर त्यांनीही बसस्थानकावर धाव घेतली. त्यामुळे रविवारप्रमाणे पुन्हा दोन्ही गट समोरासमोर आल्याने प्रचंड घोषणाबाजी सुरु होवून अगदी शिवीगाळ करीत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकारही घडले.

दोन गटात वाद सुरु झाल्याचे समजताच पोलीस उपअधिक्षक कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी दोन्ही गटांना बाजूला करीत सदरचा परिसर रिकामा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे सुमारे तासभर सुरु असलेल्या या राजकीय वादावर काही काळासाठी पडदा पडला. बदललेल्या राजकीय स्थितीत पहिल्यांदाच साजर्या होत असलेल्या शिवजन्मोत्सवासाठी जागेच्या मागणीवरुन वाद निर्माण होण्याचा अंदाज येताच प्रशासनाने सदरचे क्षेत्र कोणालाही न देता ते संवेदनशील म्हणून घोषित केले. त्यामुळे येणार्या दिवसांत त्यावरुन संगमनेरातील राजकीय आखाडा तापणार असून दोन्ही आमदार आज सायंकाळपर्यंत संगमनेरात दाखल होणार असल्याची माहिती मिळाली आहे. तूर्त बसस्थानकाच्या वादग्रस्त जागेवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असून शांतता व सुव्यवस्थेचा विचार करता या ठिकाणी कोणालाही देखावा उभारण्याची परवानगी मिळण्याची शक्यता दुरावली आहे.

तीथीनुसार साजर्या होणार्या संगमनेरच्या शिवजयंती सोहळ्याला मोठा इतिहास आहे. मात्र यावेळी पहिल्यांदाच महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोघांनीही हा उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेत एकाच जागेची मागणी केल्याने वाद निर्माण झाला आहे. त्यातून तोडगा काढण्यासाठी प्रशासनाने समन्वयाचाही प्रयत्न केला. मात्र त्यात यश येत नसल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेचा विचार करुन अखेर संगमनेर बसस्थानकाचा परिसर ‘संवेदनशील क्षेत्र’ म्हणून घोषित केला गेला असून कोणालाही कोणताही कार्यक्रम करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

महायुती आणि महाविकास आघाडीत सुरु असलेल्या या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ आज अर्थसंकल्पी अधिवेशन सोडून संगमनेरात येत आहेत. सायंकाळी त्यांच्या निवासस्थानी महायुतीच्या कार्यकर्त्यांची बैठक होणार असून त्यानंतर आमदार खताळ प्रशासनाशी सविस्तर चर्चा करणार आहेत. आमदार सत्यजीत तांबेही रात्री उशिराने शहरात दाखल होणार असून त्यांच्याकडून गुरुवारी कार्यकर्त्यांसह प्रशासनाची भेट घेतली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन दिवस संगमनेरचा शिवजन्मोत्सव चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

