संगमनेरात पुन्हा एकदा जळीतकांड; दारासमोर उभी असलेली वाहने लक्ष्य! विकृतांचे कृत्य; कासारवाडी रोडसह जेधे कॉलनीत एका रिक्षासह दोन दुचाकी पेटवल्या..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरलगतच्या दाट लोकवस्तीत पुन्हा एकदा विकृतीचे दर्शन घडायला सुरुवात झाली असून त्याचा प्रत्यय आज पहाटे संगमनेरकरांनी अनुभवला. कोणातरी अज्ञात इसमाने पहाटेच्या सुमारास घोडेकर मळ्याच्या परिसरासह जेधे कॉलनीत घराच्या दारासमोर उभ्या असलेल्या एका प्रवाशी रिक्षासह दोन दुचाकी वाहने पेटवून दिली. यात एक दुचाकी आगीत पूर्णतः भस्मसात झाली असून रिक्षासह एका महाग÷या दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. असाच प्रकार गेल्या वर्षीही पालिकेच्या क्रीडा संकुलाजवळील वसाहतीत घडला होता, त्याचा तपास अद्यापही प्रलंबित असतांना आता पुन्हा एकदा शहरातील विकृतीने डोके वर काढल्याने घराच्या दारापुढे वाहने लावणार्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

याबाबत संगमनेर शहर पोलीस ठाण्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार सदरचा प्रकार आज (ता.13) पहाटे तीन वाजण्याचा सुमारास तीन वेगवेगळ्या ठिकाणांवर घडला. याबाबत घोडेकर मळ्यात राहणार्या जय तपेंद्रबहाद्दूर सुनार या तरुणाने अज्ञात इसमांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार आज पहाटे 2 ते 3 वाजण्याच्या सुमारास त्याच्या राहत्या घरासमोर उभी असलेली त्याची ज्युपीटर मोटार सायकल (क्र.एमच.एच.17/सी.एल.7242) कोणीतरी अज्ञात विकृताने पेटवून दिली. सदरची गोष्ट आज सकाळी सव्वापाच वाजण्याच्या सुमारास त्याच्या लक्षात आली. या जळीतकांडात त्याची दुचाकी पूर्ण जळून खाक झाली आहे.

याबाबत या तरुणाने आसपास चौकशी करुन त्या अज्ञात विकृतांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता असाच प्रकार घोडेकर मळ्यापासून अलीकडे काही अंतरावरील पवार हॉस्पिटलजवळही घडल्याचे त्याच्या लक्षात आले. येथे राहणार्या कपील दिलीप शिंदे यांची प्रवाशी रिक्षाही सदरच्या विकृतांनी पेटवून दिल्याचे समोर आले. या जळीतकांडात सदर रिक्षाचे मोठे नुकसान झाले असून हातावर पोट असलेल्या शिंदे यांच्या रोटीरोटीचा प्रश्न यामुळे उभा राहीला आहे. पवार हॉस्पिटलचा परिसर व घोडकर मळा या दोन्ही वसाहती कासारवाडी रस्त्यावर एकमेकांच्या लगत असल्याने एकाच विकृताने हे जळीतकांड केल्याचे भासत असतांना काही वेळातच हा गैरसमज असल्याचे स्पष्ट झाले.

या भागापासून सुमारे एक किलोमीटर अंतर असलेल्या जून्या गावठाणातील जेधे कॉलनी परिसरातही असाच प्रकार घडल्याची वार्ता येवून धडकली. येथे राहणार्या आकाश बाळु जेधे या तरुणाची घराच्या दारासमोर उभी असलेली महागडी पल्सर 220 (क्र.एम.एच.17/बी.डब्ल्यु.4824) ही दुचाकीही पेटवून दिल्याचे समोर आले. विशेष म्हणजे ही तिनही वाहने या प्रकरणातील फिर्यादी जय सुनार याच्या मित्रमंडळींच्या समूहातील आहेत. त्यामुळे सदरचा प्रकार पूर्ववैमनस्यातून घडला असल्याचीही दाट शक्यता असून पोलीस त्या दृष्टीनेही तपास करीत आहेत. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात भा.द.वी.कलम 435 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना.विजय खाडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

गेल्यावर्षी पालिकेच्या क्रीडा संकुलासमोरील अतिशय गजबजलेल्या भागातील अभंग मळ्यातही असाच प्रकार घडला होता. येथे राहणार्या भाजपा ओबीसी मोर्चाचे शहराध्यक्ष संपत गलांडे यांच्या घरासमोर पत्र्याच्या शेडमध्ये लावलेल्या टाटा सफारी या अलिशान चारचाकी वाहनासह दोन दुचाकी वाहने अज्ञाताने पेटवून दिली होती. त्या जळीतकांडात गलांडे यांचे सुमारे 11 लाखांहून अधिक नुकसान झाले होते, त्याबाबत दाखल प्रकरणाचा तपास वर्ष उलटूनही अंधारात असतांना आता पुन्हा एकदा ‘त्या’ विकृतीने डोके वर काढल्याने घरासमोर वाहने उभी करणार्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

