म्हाळुंगी नदीवरील खचलेल्या पूलाची होणार चौकशी! जावेद जहागिरदार यांची तक्रार; जिल्हाधिकार्यांचे नगरपालिकेला आदेश..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये प्रवरानदी परिसराकडे जाणारा मोठा पूल एकाबाजूने अचानक खचला होता. अवघ्या दीड-दोन दशकांपूर्वी बांधलेला हा पूल अचानक खचल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त करण्यासह मानवी चुकांमुळेच हा पूल खचल्याचा गंभीर आरोप केला होता. भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस जावेद जहागिरदार यांनी याबाबत थेट अहमदनगरच्या जिल्हाधिकार्यांकडेच लेखी तक्रार करीत सदरचा पूल पालिकेच्या गटाराच्या कामातून झालेल्या चुकांमुळे खचल्याचे सांगत पालिकेचे पदाधिकारी, अधिकारी व ठेकेदारांची सखोल चौकशी करुन जबाबदारी निश्चित करण्याची आणि दोषींवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी केली होती. त्यावर जिल्हाधिकार्यांनी पालिकेच्या मुख्याधिकार्यांना आदेश बजावल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

सदरची घटना गेल्या वर्षी 13 ऑक्टोबर रोजी घडली होती. त्याबाबत जावेद जहागिरदार यांनी जिल्हाधिकार्यांना पाठविलेल्या तक्रारीत त्यांनी स्वामी समर्थ मंदिर ते संतोषी माता मंदिरादरम्यान सुमारे 20 वर्षांपूर्वी पूल बांधण्यात आल्याचे सांगत मानवी चुकांमूळे त्याची गंभीर क्षती झाल्याचे नमूद केले आहे. संगमनेर नगरपरिषदेने भूमिगत गटार योजनेतील गटारीचे पाईप क्रॉसिंग करताना ठेकेदार व संबंधित अधिकारी यांच्या निष्काळजीपणामुळे व ठेकेदाराशी मिलीभगत असल्या कारणाने या कामातून पूलाच्या पायालाच धक्का बसूनही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले.

गटारीचे पाईप टाकण्यासाठी पूलाच्या पायालगत खोदकाम करण्यात आले. त्यामुळे स्वामी समर्थ मंदिराकडील पूलाची बाजू कमकुवत बनली होती. यावर्षीच्या पावसाळ्यात म्हाळुंगी नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने व तो दीर्घकाळ टिकून राहिल्याने ठेकेदाराने खोदलेला व पाईप टाकून नंतर बुजवलेला खड्डा उघडा पडला. त्याचा परिणाम पूलाच्या एकाबाजूचा भरावच वाहून गेल्याने या पूलाचे खांब खाली बसले आणि त्यातूनच मोठी वर्दळ असलेला हा पूल खचला. या घटनेला पालिकेच्या बांधकाम विभागातील वरीष्ठ अधिकार्यांसह पालिकेचे पदाधिकारी व संबंधित ठेकेदार जबाबदार आहेत.

सदर पूल कशामुळे खचला हे समोर आलेले असतानाही पालिकेकडून आजवर कोणतीही कारवाई न झाल्याने जहागिरदार यांनी जिल्हाधिकार्यांना कारवाईचे साकडे घालताना बांधकाम विभागामार्फत या पूलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यातून या दुर्घटनेला कारणीभूत असलेल्या पालिकेच्या पदाधिकार्यांसह, बांधकाम विभागातील अधिकारी व संबंधित ठेकेदाराची जबाबदारी निश्चित करुन त्यांच्यावर शासकीय मालमत्तेचे जाणीवपूर्वक नुकसान केल्याच्या कारणाने फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली होती.

4 जानेवारी रोजी रजिस्टर पोस्टाने पाठविलेल्या या तक्रार अर्जाची जिल्हाधिकार्यांनी गंभीर दखल घेतली असून सदर पूलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करुन हा पूल नेमका का खचला याबाबतचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या पूलाखालून गटारीचा पाईप नेण्यासाठी आग्रह करणार्या पालिकेच्या ‘त्या’ पदाधिकार्यासह बांधकाम विभागातील वरीष्ठ अधिकारी व ठेकेदाराचे धाबे दणाणले आहेत. या वृत्ताने पालिका वर्तुळात खळबळही उडाली आहे.

