सत्यजीत तांबेंनी घेतली पद आणि गोपनीयतेची शपथ! उपसभापती नीलम गोर्‍हेंनी दिली शपथ; समर्थकांची सभागृहातच घोषणाबाजी


नायक वृत्तसेवा, संगमनेर
नाट्यमय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अचानक आपल्या वडिलांचा अधिकृत अर्ज बाजूला सारुन आपलीच अपक्ष उमेदवारी दाखल करीत राज्य काँग्रेसला धक्का देणार्‍या आणि त्यानंतर आपण काँग्रेसचेच म्हणत निवडून येणार्‍या सत्यजीत तांबे यांनी आज (ता.8) विधान परिषदेचे नवनिर्वाचित सदस्य म्हणून शपथ घेतली. विधान परषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे गेल्या दीड दशकांपासून प्रतिनिधीत्व करणार्‍या डॉ. सुधीर तांबे यांचा कार्यकाळ मंगळवारी संपला, त्यामुळे त्यांच्या जागी निवडून आलेल्या सत्यजीत तांबे यांना आज शपथ देण्यात आली.


गेल्या दीड महिन्यापासून नाशिक पदवीधर मतदारसंघात विविध घडामोडी घडल्या. त्यातून काँग्रेस अंतर्गत गटबाजीचेही पदोपदी दर्शन घडले. एकीकडे या मतदारसंघात अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठबळ देत शिवसेनेने (ठाकरे गट) परस्पर त्यांना पाठींबा जाहीर केल्याने महाविकास आघाडीतील घटक असलेल्या राष्ट्रवादी व काँग्रेसला नाईलाजास्तव शिवसेनेच्या सुरात सूर मिसळावा लागला. मात्र प्रत्यक्षात प्रचार सुरु असतांना आघाडीतील कोणत्याही नेत्याने पाटील यांच्या प्रचारासाठी एकही सभा घेतली नाही.

दुसरीकडे गेल्या दीड दशकांपासून काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या या मतदारसंघात शिवसेनेने परस्पर अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिल्याने आघाडीत काहीसा बेबनावही निर्माण झाला होता. त्यामुळे राष्ट्रवादी व काँग्रेस या दोन्ही पक्षाचे मतदारसंघातील अनेक नेते व कार्यकर्ते सत्यजीत तांबे यांचाच प्रचार करीत असल्याचे लपून राहिले नाही. त्यातच तांबे भाजपाच्या दावणीला बांधले गेल्याच्या चर्चाही जोमाने पुढे आल्याने त्यांना भाजपाचाही छुपा पाठिंबा मिळाल्याचे बोलले जाते. त्याचा परिणाम सत्यजीत तांबे यांनी या मतदारसंघात अपक्ष उमेदवार म्हणून विजय संपादन केला. या मतदार संघाचे विद्यमान लोकप्रतिनिधी डॉ. सुधीर तांबे यांचा विधान परिषदेतील कार्यकाळ मंगळवारी (ता.7) संपला. त्यामुळे 2 फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होवून विजयी झालेल्या राज्यातील तीन शिक्षक व दोन पदवीधर मतदारसंघातील पाचही नवनिर्वाचित सदस्यांना विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी आज विधान परिषदेच्या सभागृहात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यामुळे तांबे आता आजपासून आमदार सत्यजीत तांबे झाले आहेत. यावेळी सभागृहात उपस्थित तांबे समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी केल्याचेही दिसून आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *