अल्पवयीन मुलीवर पाच वर्षांपासून नराधमाचा अत्याचार! जमलेले लग्नही मोडले; संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अत्याचारासह ‘पोक्सो’तंर्गत गुन्हा..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मूळच्या कोपरगावच्या मात्र शिक्षणासाठी संगमनेर तालुक्यात आपल्या काकांकडे राहणार्‍या एका अल्पवयीन विद्यार्थीनीला धमकी देत एकाने तब्बल पाच वर्ष अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलगी अवघ्या चौदा वर्षांची असतांना या नराधमाची वक्रदृष्टी तिच्यावर पडली, तेव्हापासून फोटो व्हायरल करण्याची धमकी देत त्याने वारंवार तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत अत्याचार केले. सदरील मुलगी वयात आल्यानंतर तिचे लग्नही जमले होते, मात्र संबंधित नराधमाने तिच्या भावी पतीशी संपर्क साधून त्याला धमकी दिल्याने ते मोडले. त्या नराधमाचा वाढता त्रास असह्य झाल्याने अखेर एकोणावीस वर्षीय पीडितेने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी पेमगिरी येथील विनोद दत्तू गडकरी या नराधमाविरोधात अत्याचारासह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्‍या कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे.


याबाबत तालुका पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सदर प्रकरणातील पीडित मुलगी चौदा वर्षांची असतांना 2018 साली पेमगिरी येथील शहागडावर फिरण्यासाठी गेली होती. त्यावेळी आरोपी विनोद गडकरी याने निष्पाप आणि निरागस असलेल्या पीडितेसोबत काही फोटो काढले होते. त्यानंतर काही महिन्यांनी त्यावेळी काढलेले फोटो दाखवित त्या नराधमाने ‘मी सांगेल तसे न केल्यास तुझे फोटो व्हायरल करील’ अशी धमकी देत तिच्यावर दबाव आणला व ऑगस्ट 2019 मध्ये तिला पेमगिरीनजीच्या ठाकरवाडी रस्त्यावरील धबधब्याजवळ नेवून तिच्यावर अत्याचार केला.


त्यानंतर दर दोन-तीन महिन्यांनी तो अशाच पद्धतीने त्या विद्यार्थीनीला फोटो व्हायरल करण्याची धमकी द्यायचा व ठाकरवाडीनजीकच्या धबधब्याजवळील डोंगरावर नेवून तिच्यावर शारीरिक अत्याचार करायचा. हा प्रकार सुरु असतांनाच सदरील पीडितेने महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर अन्य व्यावसायीक अभ्यासक्रमाचीही तयारी सुरु केल्याने तिचा संगमनेरातील वावर वाढला. त्याचाही गैरफायदा घेत विनोद गडकरी नावाच्या या पिसाटाने गेल्या महिन्याच्या 25 तारखेला महाविद्यालयातून बसस्थानकाकडे निघालेल्या पीडितेला बाजार समितीजवळ अडवून पुन्हा त्याच फोटोची धमकी दिली आणि बळजोरीने आपल्या दुचाकीवर बसवून घुलेवाडी फाटा येथील ‘कॅफे’ या गोंडस नावाने विद्यार्थ्यांना वाममार्गावर नेणार्‍या ‘राजरोस’ केंद्रावर नेवून तेथे तिच्यावर पुन्हा अत्याचार केले.


या दरम्यान पीडित मुलीचे लग्न जमले. त्याची माहिती मिळताच नराधम विनोद गडकरी याने पीडितेच्या भावी पतीचा क्रमांक मिळवून शहागडावर काढलेले फोटो त्याला पाठवले व फोन करुन सदर मुलीशी लग्न केल्यास हातपाय तोडण्याची धमकी दिल्याने पीडितेचे जमलेले लग्न मोडले. यासर्व घटनाक्रमाने हिंमत वाढलेल्या त्या पिसाटाने सोमवारी (ता.19) पीडितेला फोन करुन आपल्या दोघात घडलेल्या प्रकाराची कोठेही वाच्चता केल्यास अथवा तक्रार दिल्यास तुझ्या कुटुंबाला ठार मारील अशी धमकी दिली. मात्र वारंवार घडणार्‍या या प्रकाराला कंटाळलेल्या त्या मुलीने अखेर हिंमत करुन सगळा प्रकार आपल्या आईसह काकांना सांगितला आणि अखेर त्या सर्वांनी विनोद दत्तू गडकरी या नराधमाविरोधात कायदेशीर कारवाईचा निर्णय घेतला.


त्यानुसार पीडित मुलीने आज (ता.22) तालुका पोलीस ठाण्यात येवून परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक शिरीष वमणे यांची भेट घेत घडला प्रकार सांगितला. यावेळी संगमनेर उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरेही उपस्थित होते. या प्रकरणी पीडितेची फिर्याद दाखल करुन पोलिसांनी पेमगिरीत राहणार्‍या विनोद दत्तू गडकरी या नराधमाविरोधात भारतीय दंडसंहितेच्या कलम 376, 376 (2) (जे), 506 सह बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणार्‍या कायद्याचे कलम 4, 8 व 12 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून आरोपी गडकरी याचा शोध सुरु केला आहे. या घटनेने संगमनेर तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून ‘त्या’ नराधमाच्या तत्काळ मुसक्या आवळून त्याच्यावर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

गेल्या काही वर्षात संगमनेर शहर व परिसरात ‘कॅफे सेंटर’ या गोंडस नावाने सुरु झालेल्या असंख्य केंद्रांमध्ये काय चालते हे देखील या घटनेतून उघड झाले असून घुलेवाडी फाट्यावरील अशाच ‘कॅफे’मध्ये नेवून या प्रकरणातील पीडितेवर अत्याचार झाल्याचा उल्लेख फिर्यादीत आला आहे. विद्यार्थ्यांना वाममार्गाला लावणार्‍या अशा ठिकाणांबाबतही पोलिसांनी भूमिका घेण्याची गरज असून या प्रकरणात घुलेवाडी फाट्यावरील ‘त्या’ कॅफेच्या चालकास सहआरोपी करण्याची गरज आहे. असे घडल्यास संगमनेरात मोठ्या प्रमाणात सुरु झालेल्या अशा अश्‍लिल चाळ्यांच्या केंद्रांना चाप बसेल अशी अपेक्षा संगमनेरकरांना आहे.

Visits: 113 Today: 1 Total: 1101947

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *