नेवाशातील मोहिनीराजांच्या यात्रेस सोमवारपासून प्रारंभ पाच दिवस यात्रा चालणार; पहिल्याच दिवशी भाविकांची मोठी गर्दी
नायक वृत्तसेवा, नेवासा
तीर्थक्षेत्र नेवासा नगरीचे ग्रामदैवत श्री मोहिनीराजांच्या मुख्य पाच दिवसांच्या यात्रेस सोमवारपासून (ता.6) प्रारंभ झाला. यावेळी दुपारी काढण्यात आलेल्या उत्सवमूर्ती पालखी मिरवणुकीचे सर्वधर्मीय बांधवांच्यावतीने फटाक्यांची आतिषबाजी करीत उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. सदरची उत्सवमूर्ती ही पाच दिवस दर्शनासाठी प्रवरा नदीकाठी असलेल्या श्री मोहिनीराज मंगल कार्यालयात परंपरेनुसार ठेवण्यात येणार आहे.
सोमवारी पहाटेच्या सुमारास मानाप्रमाणे तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांच्या हस्ते श्री मोहिनीराजांच्या उत्सव मूर्तीस सपत्नीक अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी श्री मोहिनीराज मंदिरास भेट देत उत्सवमूर्तीचे दर्शन घेतले. यावेळी देवस्थानच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. दुपारी दीड वाजता मोहिनीराज मंदिरापासून उत्सव मूर्ती पालखी मिरवणुकीस प्रारंभ झाला अग्रभागी बदामबाई धनराजशेठ गांधी विद्यालयाच्या मुलींचे लेझीम पथक मुख्याध्यापक विश्वनाथ नानेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पारंपारिक वेशभूषा करत मिरवणुकीत सहभागी झाले होते. त्यामागे बैलगाडीमधील तुर्काबाद खराडी येथील सनई चौघडा वाद्य पथक, हनुमान भजनी मंडळाचे महिला व पुरुष भाविकांचे भजनी पथक सहभागी झाले होते.
पालखी मिरवणूक मार्गावर जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक रवीकिरण महागावे यांनी रांगोळ्या काढल्या होत्या. त्यामुळे पालखी मार्ग सुशोभित झाला होता. मिरवणुकीत सहभागी झालेल्या भाविकांना नळकांडे परिवार, पालखी मार्ग मित्रमंडळ यांच्यावतीने लिंबू शरबत तर कैलास परदेशी यांच्या निवासस्थानी सब्जा शरबतचे वाटप करण्यात आले. यावेळी वास्तूशिल्पकार राजेंद्र परदेशी यांच्यावतीने मान्यवरांचा शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. यात्रा कमिटीच्यावतीने वडापावचे वाटप करण्यात आले. सलीम शेख यांच्यावतीने शाबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. सदरची पालखी जुन्या कोर्ट गल्लीत आली असता मुस्लीम समाजातील युवकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत पालखीचे हार घालून स्वागत केले. यावेळी हिंदू-मुस्लीम बांधव उपस्थित होते. मिरवणूक पालखी मार्गावर मनसेचे पदाधिकारी दीपक परदेशी व संगीता परदेशी यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात येऊन शरबतचे वाटप करण्यात आले. पालखी मिरवणूक प्रसंगी पोलीस निरीक्षक विजय करे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता.
श्री मोहिनीराज मंगल कार्यालयात उत्सव मूर्ती पालखी आली असता उत्सवमूर्तीची परंपरेनुसार स्थापना करण्यात आली. येथे पाच दिवस महाप्रसादाच्या पंगती बसणार आहे. यावेळी पहिल्या पंगतीचे मानकरी जवानमल हिरालाल गांधी जैन ट्रस्ट पदाधिकार्यांच्यावतीने उत्सवमूर्तीची पूजा करण्यात येऊन महाप्रसादाचा पहिला नेवैद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर महाप्रसाद पंगतीस प्रारंभ करण्यात आला. यावेळी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.