संगमनेरच्या स्थानिक लोकप्रतिनिधींचा ‘खेळणं’ म्हणून वापर! माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची टीका; द्वेषाच्या राजकारणाची सुरुवात संगमनेरातून..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
वारकरी संप्रदायात राजकारण करण्यासाठी काही तथाकथित महाराज घुसले आहेत, त्यांच्याकडून कीर्तन सोडून राजकारणावरच अधिक भाष्य केले जात आहे. घुलेवाडीत सुरु असलेल्या कीर्तनातही असाच प्रकार सुरु असताना एका तरुणाने अभंगावर बोलण्याची विनंती केल्याचा राग धरुन महाराजांनी त्याला अपशब्द वापरुन अपमानीत केले, त्यातून गोंधळ उडाल्याने माणसं उठून गेली आणि कीर्तन बंद पडले. या दरम्यान कोणीही कोणावर धावून गेले नाही किंवा शिवीगाळ अथवा वाहनाची तोडफोड झाली नाही. मात्र पोलिसांनी दबावातून संबंध नसलेल्या तरुणांवरही गंभीर कलमांन्वये गुन्हे दाखल केले. यातून तालुक्यात अस्थिरतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न दिसत असून त्यासाठी अशाप्रकारचे तथाकथित महाराज आणि स्थानिक लोकप्रतिनिधींचा कोणीतरी ‘खेळणं’ म्हणून वापर करीत असल्याचा गंभीर आरोप करुन माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी एकाच तिरातून अनेक लक्ष्य भेदले.

गेल्या शनिवारी (ता.16) घुलेवाडीतील मारुती मंदिरात राजगुरुनगर येथील कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम सुरु होता. त्या दरम्यान रात्री साडेदहाच्या सुमारास एका तरुणाने उभे राहून ‘महाराज अभंगावर बोला..’ असे सांगितल्याने काहीसा गोंधळ निर्माण झाला. त्यावर
महाराजांनी त्याला प्रत्युत्तर दिल्यानंतर एकमेकांच्या दिशेने धावाधाव झाल्याने वातावरण तापले आणि गदारोळ होवून कीर्तनाचा कार्यक्रम अर्ध्यावरच थांबवावा लागला. घडल्या प्रकरणात कीर्तनकारांशी शाब्दीक चकमक उडालेल्या तरुणासह त्याच्या सहकार्यांचा संबंध माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याशी जोडला गेल्याने घुलेवाडीच्या धार्मिक सोहळ्यात राजकारणाचा प्रवेश झाला. या प्रकरणात चौघांसह आठ ते दहा अज्ञातांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला.

या घटनेत राजकारण आल्याने सोमवारी विविध हिंदुत्त्ववादी संघटनांनी सकल हिंदू समाजाच्या बॅनरखाली एकत्र येवून बसस्थानकासमोर रास्तारोको केले. या आंदोलनात भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले यांच्यासह आमदार अमोल खताळही सहभागी होते. त्यामुळे घुलेवाडीसारख्या शहराच्या संलग्न उपनगरीय गावात घडलेला हा प्रकार थेट राज्यपातळीवर पोहोचला. दोन्ही प्रमुख वक्त्यांनी माजीमंत्री बाळासाहेब
थोरात यांच्यावर हिंदूद्रोही असल्याचे गंभीर आरोप करीत राहुल गांधी यांच्याकडून कथित एजन्सीच्या अहवालावरुन सदरचा प्रकार माजीमंत्र्यांनीच घडवून आणल्याचा गौप्यस्फोटही भोसले यांनी केला होता. यासर्व घडामोडींमुळे माजीमंत्री थोरात काहीसे बँकफूटवर गेल्याचे दिसत असतानाच संग्रामबापू भंडारे यांच्या वक्तव्यातील पाच सेकंदाचा भाग असलेला व त्यात महाराज थोरात यांच्या नावाचा उल्लेख करीत नथुराम होण्याची धमकी देत असलेला व्हिडिओ व्हायरल झाला.

अवघ्या पाच सेकंदाच्या या व्हिडिओने बाजी पालटली आणि बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या चाळीस वर्ष राजकीय कारकीर्द अनुभवणार्या ज्येष्ठ नेत्याबद्दलच्या वक्तव्याचा राज्यभरातून निषेध होवू लागला. राज्यपातळीवरील काँग्रेसच्या पहिल्या फळीतील नेत्यांनीही या वक्तव्या विरोधात जाहीर भूमिका घेतल्याने माजीमंत्री थोरात यांना पुन्हा फ्रन्टफूटला खेळण्याची संधी मिळाली आणि त्यांनी पत्रकार परिषद घेत पहिल्याच चेंडूवर षटकार मारताना एकाच तिरातून अनेकांवर निशाणा साधला. यावेळी त्यांनी भोसले यांच्या राज्यस्तरीय वक्तव्याचाही समाचार घेत त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले.

‘यशोधन’ या त्यांच्या सहकारी संस्था कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत शनिवारी (ता.16) घुलेवाडीच्या मारुती मंदिरापासून सुरु झालेल्या या विषयाच्या प्रत्येक पैलूवर त्यांनी भाष्य केले. संविधानाच्या मूलभूत तत्वांचे ज्ञान पाजळत अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा दाखला देणार्या संग्रामबापू भंडारे
यांच्यावर जोरदार पलटवार करताना राजकारणासाठी वारकरी संप्रदायात घुसघोरी करणार्यांना संविधानावर बोलण्याचा अधिकार नसल्याची घणाघाती टीका त्यांनी केली. अशाप्रकारचे महाराज आणि स्थानिक लोकप्रतिनिधी कोणाच्या तरी हातचे खेळणे होवून तालुक्यात अस्थिरता निर्माण करीत असल्याचा गंभीर आरोप करीत त्यांनी एकाच तिरातून महाराजांसह नाव न घेता मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील व आमदार अमोल खताळ यांच्यावरही निशाणा साधला.

भंडारे महाराज यांच्या कथित ‘नथुरामा’च्या वक्तव्याने पलटवाराची संधी मिळून राज्यव्यापी सहानुभूती प्राप्त झाल्याने माजीमंत्री थोरात यांनी तथाकथित महाराज असा उल्लेख करीत सदरचे महाराज राज्यभर अशाच प्रकारचे वक्तव्य करीत फिरतात असा आरोप त्यांनी केला. आपल्या तत्वांसाठी, विचारांसाठी अशाप्रकारे कोणाकडून मरण मिळणार असेल तर, अशा बलिदानाला आपण तयार असल्याचे सांगत थोरात यांनी बाजी पालटली. आपण महात्मा गांधी नाहीत, मात्र विचारांसाठी बलिदान देण्याची वेळ आल्यास आपली तयारी असल्याची पृष्टीही त्यांनी सोबत जोडली.

तुषार भोसले यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेत ज्ञानोबा-तुकोबाचा गजर करण्यात थोरातांच्या पिढ्या खपल्याचे मोठे वक्तव्य त्यांनी केले. तालुक्यातील विविध गावांमध्ये होणार्या अखंड हरिनाम सप्ताहातील सहभागाचा उल्लेख करीत देशातील सर्वात मोठ्या गंगागिर महाराजांच्या सप्ताहाचे सातवेळा तालुक्यात आयोजन झाल्याचा दाखलाही त्यांनी दिला. आपण ‘पक्के हिंदू’ आहोत, वारकरी
संप्रदायाची पताका खांद्यावर असलेले भागवत धर्माचे उपासक आहोत, फक्त आम्हाला कोणाचा द्वेष करता येत नाही, मानवता हाच आमच्यासाठी मोठा धर्म असल्याचे आपण मानतो. कोणी चुकला तर, त्याला शिक्षा झालीच पाहिजे या विचाराचे आहोत, द्वेषाचे राजकारण आपणास कधीही जमले नाही असे म्हणत त्यांनी भोसले यांच्या ‘हिंदूद्रोही’ या विधानालाही तितक्याच जोरकसपणे उत्तर दिले.

निवडणुकांच्या कालावधीत दंगली घडवल्या की मतांचे विभाजन होते हे सूत्र सत्ताधार्यांना अवगत झाल्याने वातावरण बिघडवून मतं मिळवण्याचा प्रकार विधानसभा निवडणुकीपासून सुरु झाला. त्यावेळी ज्या प्रकारचे आरोप करुन एका वर्गाला भडकावले गेले होते. त्या आरोपांचे नंतर काय झाले हे आजवर समोर आलेले नाही. आताही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका समोर असल्याने राज्यात पुन्हा द्वेषाचे, अस्थिरता निर्माण करण्याचे राजकारण सुरु झाले आहे, त्याची सुरुवात संगमनेरमधून झाल्याचे गंभीर आरोपही माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पत्रकार परिषदेतून केला. त्यांच्या या आरोपांवर मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यासह आमदार अमोल खताळ व तुषार भोसले काय उत्तर देतात याची उत्कंठा निर्माण झाली आहे.

आपली राज्यघटना संत परंपरेच्या विचारातूनच आली आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करताना काही पथ्य पाळली पाहिजेत. राज्य घटनेच्या
मूलभूत तत्वांना धक्का लागेल असे वक्तव्य कीर्तनातून घडू नये. कीर्तनकारांना वारकरी संप्रदायाची पार्श्वभूमी असते. त्यांना हरीभक्त परायण म्हणून ओळखले जाते, त्यांनी कीर्तनात राजकारणावर बोलू नये असे संकेत असतात. राज्य घटनेच्या तत्वांविरोधात बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही, असे सांगत कीर्तनकार संग्रामबापू भंडारे यांच्या ‘अभिव्यक्ति’ स्वातंत्र्यावरील वक्तव्याचा धागा पकडून माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अशा महाराजांना राज्यघटनेवर बोलावे इतका अधिकार नसल्याचे सांगत त्यांची ‘खिल्ली’ही उडवली.

