आणखी किती बळी जाण्याची वाट पाहणार? ठेकेदाराला वाचवण्याच्या नादात सामान्यांचा मात्र जातोय जीव..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अर्धवट कामांसोबत चार वर्षांपूर्वी सुरू झालेल्या पुणे- नाशिक महामार्गाच्या तक्रारी काही केल्या संपण्याचे नाव घेईनात. वारंवार आंदोलने, निवेदने, त्यातील काहींशी तडजोडी घडूनही या महामार्गावर सामान्य प्रवाशांचा जीव मात्र सुरक्षित होवू शकला नाही. नपुसक व्यवस्थेतून माज चढलेल्या ठेकेदाराच्या अवकृपेने मागील चार वर्षात दोनशेहून अधिक निष्पापांचे बळी घेणार्‍या या महामार्गावर मंगळवारी (ता.21) सायंकाळी आणखी दोघांच्या रक्ताचा सडा पडला. बहुतेक रोजच घडणार्‍या अशा घटनेतील आणखी एक असे म्हणत आज-उद्यात या दोन्ही घटनाही पचून जातील, मात्र आणखी किती बळी जाण्याची वाट पाहणार हा प्रश्न मागे राहणार आहे.

काही वर्षांपूर्वी अस्तित्त्वात असलेला जुना पुणे- नाशिक महामार्ग सततचे अपघात म्हणून ‘मृत्यूघंटा’ नावाने कुप्रसिद्ध ठरला होता. त्यात दोन्ही महानगरांदरम्यान घाट रस्त्यांची मोठी संख्या, केवळ दुहेरी मार्गिका आणि सतत वाढत गेलेली वाहनांची संख्या यामुळे हा महामार्ग दिवसभरात दोन-चार वेळा तुंबायचा, त्यातून सुटका होण्यासाठी प्रवाशांना तासन्तास तिष्ठावे लागत. प्रवासाचा, वाहतुकीचा वेळ वाढून खर्चही वाढायचा. त्यातूनच चौपदरीकरणाचा विषय पुढे येवून सुरुवातीला खेड ते सिन्नरपर्यंतचा नवीन महामार्ग निर्माण करण्यात आला. यासाठी ‘बांधा-वापरा-हस्तांतरीत करा’ या तत्त्वाने मॉन्टोकार्लो कंपनीने आणखी दोन सह कंपन्यांसह या मार्गाची उभारणी केली.


रस्त्याचे काम सुरू असताना संगमनेरकरांसह या महामार्गावरुन नेहमी प्रवास करणार्‍या प्रवाशांना हायसे वाटत होते. आपली समस्या संपली, आपला प्रवास सुखकर झाला असे वाटू लागले. 2017 पर्यंत या तीनही कंपन्यांनी 70 टक्के रस्त्याचे काम पूर्ण केल्याने महामार्ग प्राधिकरणाच्या नियमानुसार राहिलेले काम पुढील कालावधीत सुरू ठेवून सदरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला करुन त्यावर टोल वसूल करण्याची परवानगी मिळते. त्यानुसार संबंधित ठेकेदार कंपनीने त्या शर्थीवर 1 जानेवारी 2017 रोजी सदरचा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला. मात्र त्यानंतर अपवाद वगळता राहीलेली 70 टक्के कामे त्याने पूर्णच केली नाहीत. त्यात अनेक ठिकाणचे सर्व्हिस रोड (उपरस्ते), अंडर बायपास, ओव्हर बायपास, सुरक्षा भिंती या गोष्टींचा समावेश होता.

नवा चौपदरी रस्ता सुरु झाल्याने या मार्गावरील वाहनांचा वेग निश्चितच वाढला. त्यामुळे सुरुवातीपासूनच अपघातांची संख्या वाढू लागली. पण नवा रस्ता त्यात चौपदरी असे समजून त्यावेळी या गंभीर गोष्टीकडे दुर्लक्ष झाले. वास्तविक यातील काही अपघात वेगातून घडले हे खरे, मात्र सगळेच त्या कारणाने घडले नव्हते याकडे कोणाचेच लक्ष गेले नाही. ठेकेदाराने जेथे जेथे उणीवा अथवा अर्धवट कामे ठेवली होती अशाच भागात अपघातांची संख्या अधिक होती हे देखील त्यावेळी दुर्लक्षित झाले. अगदी नाशिकहून संगमनेरच्या दिशेने येताना नियमाप्रमाणे नकाशात दर्शविलेला मात्र आजपर्यंत कधीच अस्तित्त्वात
न आलेला उपरस्ता असेल किंवा पठारावरील आंबी फाट्यासह रस्ता ओलांडणार्‍यांची संख्या अधिक असलेल्या याच परिसरातील चार-सहा ठिकाणी लोखंडी उड्डाणपूल निर्माण होणार होते. पण आजपर्यंत त्यांचाही मागमूस लागला नाही. त्याचा फटका सामान्यांना बसत राहीला आणि त्यांचे जीवही जातच राहिले.

ठेकेदाराच्या या उणीवा सामान्यांना दिसत नसल्या तरीही संगमनेरातील काही संघटनांच्या पदाधिकार्‍यांना, काही कथीत नेत्यांसह सामाजिक, राजकीय कार्यकर्ते व चक्क काही पत्रकारांना मात्र अगदी स्पष्ट दिसत होत्या. त्या-त्या घटनांच्यावेळी झालेली आंदोलने हे सांगण्यास पुरेशी ठरतील. यातील अनेक आंदोलने तर ‘आर्थिक’ तडजोडीने संपली. अर्थात सगळ्याच आंदोलनांना तसे म्हणता येणार नाही, काही आंदोलनातून सामान्यांच्या अपेक्षाही काहीअंशी फळाला आल्यात हे देखील खरं, पण ते व्यापक मात्र नव्हतं. यावरुन सामान्य माणसाचा जीव किती स्वस्त होतोय हे देखील वेळोवेळी समोर आलं, मात्र तरीही सामान्यांचे डोळे उघडायलाच तयार नसल्याने ठेकेदार निवांत होऊन डबल पैसे कापतोय, झालेच एखादे आंदोलन तर ठेकेदाराचा अनुभवही दांडगाच आहे आणि त्याला पाठिशी घालणार्‍यांची संख्याही दांडगीच आहे.

त्यामुळे अशा छोट्या-मोठ्या घटना घडतच राहतील. त्या श्रृंखलेत मंगळवारी (ता.21) सायंकाळी पठारावरील वरुडी पठार फाट्याजवळ संगमनेरातील तरुण वयातील विधीज्ञ शंतनू वैद्य यांचा आणि त्यानंतर काही वेळातच कर्जुले पठार येथील अनिल अरगडे यांचा त्या परिसरातील अपघाती मृत्यू झाला. सरत्या वर्षाच्या शेवटी एकाच दिवशी, काही क्षणांच्या अंतराने आणि एकाच ठिकाणी दोघा निष्पापांच्या मृत्यूने अवघा तालुका शहारला असेल. मात्र निर्ढावलेल्या व्यवस्थेच्या नजरेत या मृत्यूंची आणखी एक घटना म्हणूनच नोंद झाली असेल. या दोघांच्या मृत्यूने गेल्या वर्षभरातील या एका मार्गावरील बळींची संख्याही 43 झाली आहे.

Visits: 186 Today: 1 Total: 1109403

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *