समर्पण वृत्तीने काम करणार्‍या शिक्षकांमुळे संगमनेरचा नावलौकिक ः नागणे विविध स्पर्धांमध्ये सुयश मिळविणार्‍या विद्यार्थ्यांचा संगमनेरात गौरव


नायक वृत्तसेवा, संगमनेर
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांत शिकणार्‍या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड गुणवत्ता आहे. तिला पैलू पाडण्यासाठी संगमनेर तालुक्यातील शिक्षक गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे यांच्या मार्गदर्शनाखाली समर्पण वृत्तीने काम करत आहे. त्याचीच पोहोच पावती म्हणून हा सन्मान सोहळा येथे संपन्न होत असल्याचे गौरवोद्गार गटविकास अधिकारी अनिल नागणे यांनी काढले.

शिष्यवृत्ती, नवोदय व विविध गुणदर्शन स्पर्धेत यश मिळविणार्‍या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संगमनेर महाविद्यालयातील साईबाबा सभागृहात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून काजळे ज्वेलर्सचे संचालक राजेंद्र काजळे, चाणक्य मंडळ पुणेच्या विश्वस्त रोहिणी गुट्टे व शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष शिक्षण तज्ज्ञ संजय मालपाणी उपस्थित होते. यावेळी डॉ. संजय मालपाणी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. 33 कोटी सूर्यनमस्कार स्पर्धेत संगमनेर शिक्षण विभागाने दिलेल्या योगदानाचा आवर्जून उल्लेख केला. खेलो इंडिया स्पर्धेत संगमनेर तालुका भारतात प्रथम आला. याचे श्रेय तालुक्यामध्ये जे चांगले शैक्षणिक वातावरण तयार झाले आहे, त्याला जाते असे ते म्हणाले. ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी ओंकारनाथ मालपाणी योगासने स्पर्धा घेण्याची घोषणा त्यांनी केली.

प्रास्ताविक करताना गटशिक्षणाधिकारी सुवर्णा फटांगरे यांनी संगमनेर पंचायत समिती शिक्षण विभागाच्या गुणवत्तेचा उंचावत चाललेल्या आलेखाचा आढावा घेतला. या यशस्वी वाटचालीत मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व जिल्हा शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या मार्गदर्शनाबरोबर गटविकास अधिकारी अनिल नागणे व शिक्षणतज्ज्ञ डॉ. संजय मालपाणी देत असलेल्या प्रोत्साहनाचा मोलाचा वाटा असल्याचा आवर्जून उल्लेख केला. यापुढेही सर्वांच्या सहकार्याने ही यशस्वी घोडदौड सुरूच असेल असेही त्यांनी नमूद केले.

नवोदय पात्र हर्षल भालेराव या विद्यार्थ्याने आपले मनोगत व्यक्त केले. जिल्हास्तरावर निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी प्रातिनिधीक स्वरूपात वेशभूषा स्पर्धेचे प्रात्यक्षिक सादर केले. अध्यक्षपदाची सूचना शिक्षण विस्तार अधिकारी मंदा दुर्गुडे यांनी मांडली. अनुमोदन केंद्रप्रमुख अशोक गोसावी यांनी दिले. सूत्रसंचालन सोमनाथ घुले व अक्षय खतोडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रुपेश वालझाडे, भास्कर हासे, दीपाली रेपाळ, नीता सावंत, अनिता नेहे, स्वाती भोर, सुनील ढेरंगे, दिगंबर फटांगरे, पोपट काळे, संजय लिमकर, सोमनाथ पोंदे, किरण कटके, बाळासाहेब गुंजाळ, शिवाजी आव्हाड, अशोक शेटे आदिंसह शिक्षक, पंचायत समिती शिक्षण विभाग व दिव्यांग समावेशित विभाग यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी शिक्षण विस्तार अधिकारी दीपक त्रिभुवन, केंद्रप्रमुख अशोक गोसावी, दशरथ धादवड, यशवंत आंबेडकर, अलका साखरे, प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालिका सरस्वती घुले, छायाचित्रकार सतीष खताळ आदी उपस्थित होते. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना काजळे ज्वेलर्सकडून सन्मानचिन्ह तर शिक्षक बँकेचे संचालक भाऊराव राहिंज व संचालिका सरस्वती घुले यांच्याकडून प्रमाणपत्र मिळाले.

Visits: 188 Today: 1 Total: 1786105

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *